प्रणबदांपुढे महाराष्ट्राच्या नेत्यांची अवस्था अंदाज अपना अपनामधल्या अमर-प्रेम सारखी झाली..

गोष्ट आहे २००३ सालची. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. युतीच्या शासनाला हरवून सत्तेत आलेल्या या आघाडी सरकारला चालवणे बरंच कसरतीचा काम होतं. विरोधी पक्षाचे नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी असे दिग्गज नेते आपल्या भाषणांनी सभागृह घुमवत होते.

अविश्वास ठराव, आमदारांची फुटाफुटी असे अनेक महादिव्य पार करत विलासरावांचं सरकार चाललं होतं.

अचानक एक दिवस दिल्लीतून बॉम्ब पडला. विलासरावांची गच्छंती करायची.

कारण तर विशेष काही नव्हतं. विलासरावांच्या विरुद्ध मोठे आरोप नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीला चांगलं जुळवून घेतलंय याचा दिल्लीकरांना प्रॉब्लेम होता. विलासराव आपल्या कारभाराबद्दल सिरीयस नाहीत, त्यांच्या मुलाच्या सिनेमाकडे त्यांचं लक्ष आहे वगैरे वगैरे कारणे देत भाकरी पलटवायचं चाललं होतं.

पण काँग्रेसच्या संस्कृती नुसार असा तडकपडकी निर्णय घेतला जात नाही. आम्ही लोकशाही पद्धतीचा वापर करत आमदारांची चाचपणी करतो आणि मुख्यमंत्री ठरवतो असा सांगायला तरी त्यांचा दावा असतो.

दिल्लीत निर्णय झाला होता तरी विलासराव देशमुख यांचं भवितव्य ठरवण्यासाठी हायकमांड तर्फे प्रणब मुखर्जी, गुलाम नबी आझाद आणि महाराष्ट्राचे प्रभारी वायलर रवी मुंबईला आले. त्यांच्या आगमनामुळे मुंबई काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन एखाद्या जत्रेप्रमाणे गजबजून गेले. मंत्री,आमदार, कार्यकर्ते, पत्रकार यांचा गोतावळा जमा झाला होता.

काँग्रेसमधले वेगवेगळे गटतट ऍक्टिव्ह झाले होते. आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी सगळ्यांची चढाओढ लागली होती. कित्येकजण शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत होते.

प्रणब मुखर्जींच्या टीमला दोन दिवसात निर्णय घ्यायचा होता. त्यांनी एका पाठोपाठ एक आमदारांची मुलाखत घेण्यास सुरवात केली.

विलसराव देशमुख यांनी देखील आपला मोर्चा बांधला होता. त्यांच्या समर्थकांमध्ये सगळ्यात पुढे होते आघाडी सरकारला पाठिम्बा दिलेले १२ अपक्ष आमदार. या अपक्ष आमदारांच्या टेकूवरच काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार उभं होतं. विलासरावांनी या अपक्ष आमदारांना आपल्याशी घट्ट बांधून ठेवलं होतं.

त्याकाळी केंद्रात भाजपच सरकार होतं. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. शिवसेना त्यांच्या एनडीएचा भाग होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची संधी ते कित्येक दिवस शोधत होते. काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांना त्यामुळे मोठं महत्व प्राप्त झालं होतं.   

का कुणास ठाऊक प्रणब मुखर्जी त्या दिवशी अत्यंत खराब मूडमध्ये होते.

११ तास सलग त्यांची मिटिंग चालली. त्या दिवशी त्यांनी दोन वेळा तिथे जमलेल्या पत्रकारांची खरडपट्टी काढली होती. एखाद्या शालेय विद्यार्थ्यांना दंगा केल्या बद्दल हेडमास्तर रागवतात असे दृश्य त्यावेळी पत्रकार आणि प्रणब मुखर्जी यांच्यात दिसत होते.

अखेर विलासराव देशमुखांच्या समर्थक आमदारांना भेटायला बोलवण्यात आलं. हर्षवर्धन पाटील त्यांचं नेतृत्व करत होते. यात उल्हास पवार, रामकृष्ण मोरे, बाळासाहेब शिवरकर अशा अनेक आमदारांचा समावेश होता. हर्षवर्धन पाटील आणि मंडळी जय्यत तयारी करून आली होती. त्याच आवेशात ते सगळे प्रणब मुखर्जीच्या भेटीला मिटिंग रूम मध्ये गेले.

इकडे बाहेर पत्रकार एकदम सज्ज झाले. जोरदार खडाजंगी होणार, अपक्ष आमदारांचा दबाव वापरून विलासरावांचे मुख्यमंत्री शाबूत राहणार असं वाटत होतं. पण मिटिंग १५ मिनिटात आटोपली. हर्षवर्धन पाटील आणि सगळे आमदार बारीक तोंड करून मिटिंग रूममधून बाहेर आले.

त्यांनी एका वाक्यात पत्रकारांना सांगितलं,

“आमची मते आम्ही काँग्रेस हायकमांडला कळवली आहेत. “

जवळपास ११ तास वाट बघितल्यावर फक्त हे एका वाक्याच उत्तर. काही खळबळ नाही, काही ड्रामा नाही. साधी दोन ओळींची बातमी देखील होणार नव्हती.

टीव्ही पत्रकार सुहास जोशी तेव्हा तिथे हजर होते. त्यांनी एका आमदाराला बाजूला नेलं आणि नेमकं काय झालं असं विचारलं. नाव सांगण्याच्या अटीवर तर ते म्हणाले,

 विलासरावांचं मुख्यमंत्रीपद गेलं

सुहास जोशी यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,

“पण तुम्ही तर प्रणब मुखर्जींना सांगणार होता ना की विलासरावांच्या शिवाय हे सरकार टिकूच शकणार नाही म्हणून.”

या वर आमदार हसत हसत म्हणाले, तुम्ही अंदाज अपना अपना सिनेमा पाहिला आहे काय? त्यात आमीर खान आणि सलमान खान परेश रावल यांच्याकडे पोरीचा हात मागायला जातात. भेटायला जाताना ते फुशारक्या मारत जातात पण आत गेल्यावर परेश रावल त्यांना बोलायला देखील न देता त्यांची सगळी हवा काढून टाकतो. अगदी तसंच आमचं झालं. आम्ही काही बोलायच्या आधीच प्रणबदां म्हणाले,

“मी आजवरच्या आयुष्यात काँग्रेसमधले ३२ मुख्यमंत्री बदलले आहेत, हा ३३ वा असणार आहे. आता बोला तुम्हाला काय बोलायचे आहे ?”

असं म्हटल्यावर कुठल्याही आमदाराच बोलायचं धाडसच झालं नाही. ते सगळे आमचा सरकारला पाठिंबा आहे असं म्हणत  गपगुमान परत आले.

अखेर विलासराव देशमुख यांचं सरकार गेलं आणि त्या जागी सुशीलकुमार शिंदे आले. कोणतेही बंड न होता हे सत्तांतर घडलं. यामागे प्रणब मुखर्जी यांचा दरारा कारणीभूत ठरला.

सन्दर्भ- “The Pranab Mukherjee I had known was the true Congress high command” dailyo.in

हे ही वाच भिडू 

 

 

1 Comment
  1. देवीदयाल मोही says

    नमस्कार भीडू बंधुनों,
    खूपच मजेशीर तरीही माहितीपूर्ण लेख असतात. ट्विट वर क्लिक केले की दो-चार तरी वाचल्या शिवाय सुटत नाही. बाळासाहेबांचा काळ तर जणूं डोळ्यासमोर उभा राहतो. बाळासाहेबांनी आमंत्रित केल्यानुसार भिन्द्रनवाला मुंबई ला आलेला आठवतो.शक्य असेल तर प्रकाश पाडावा ही विनंती.
    आपला एक सहभीडू,
    जय महाराष्ट्र 🙏🏻

Leave A Reply

Your email address will not be published.