प्रशांत किशोर वगैरे आत्ता आले, त्यांनी १९६९ साली इलेक्शन कॅम्पेन मॅनेजर म्हणून सुरवात केलेली

प्रणव कामदाकिंकर मुखर्जी उर्फ आपल्या सगळ्यांचे लाडके प्रणबदा. ११ डिसेंबर १९३५ रोजी त्यांचा जन्म बंगालच्या मिरती या गावी झाला. आईवडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते. गांधीवादी, सुरवातीपासून कॉंग्रेसचे अनुयायी. प्रणबदाच्या वडिलांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दोन वेळा विजय देखील मिळवला होता. राजकारणाच बाळकडू प्रणबदा यांना घरातूनच मिळाल.

प्रणबदा शाळा कॉलेजमध्ये देखील प्रचंड हुशार होते.

राज्यशास्त्र व इतिहास विषयात त्यांनी खास बंगाली तैल बुद्धी. तसाच तडकफडक मिजास. प्रणबदा कलकत्ता विद्यापीठातून एलएलबी झाले. पोस्टाच्या डेप्युटी जनरलच्या ऑफिसात क्लार्क म्हणून नोकरीला लागले. पण त्यांना आवड होती राजकारणाची, त्यात चाललेले डाव-प्रतिडाव या बुद्धीबळाच्या खेळाची. प्रणबदांनी कारकुनीच्या नोकरीचा राजीनामा दिला.

कलकत्त्याच्या विद्यानगर कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्सचा लेक्चरर म्हणून नवी नोकरी सुरु केली. देशेर डाक (मातृभूमी ची हाक) या वर्तमानपत्रात पत्रकारिता देखील केली.

पण त्यांना पहिला ब्रेक मिळाला १९६९ साली. 

एकेकाळचे दिग्गज कॉंग्रेसी, जवाहरलाल नेहरूंचे खास मित्र, माजी संरक्षण मंत्री व्ही.के.कृष्णमेनन हे अपक्ष म्हणून बंगालच्या मिदनापूर येथे लोकसभेची पोटनिवडणूक लढत होते. ही निवडणूक कॅम्पेन सांभाळायला त्यांना कोणीतरी हवा इलेक्शन मॅनेजर हवा होता. तरुण प्रणब मुखर्जी यांच्या रुपात त्यांना तो मिळाला.

या निवडणुकीत कृष्णमेनन यांचा कॉंग्रेसच्या उमेदवाराने लाखभर मतांनी मोठा पराभव केला. प्रणबदा यांची पहिलीच राजकीय खेळी वाया गेली होती.

पण या हाय प्रोफाईल पराभवातूनच त्यांच्यासाठी पुढच्या संधीची आयुष्यभरासाठी कवाडे खुली झाली.

कृष्णमेनन यांचे इलेक्शन कॅम्पेन सांभाळणारा तरुण प्रचंड हुशार आहे, त्याच्यात बरच टॅलेंट आहे ही चर्चा साक्षात इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी प्रणब मुखर्जी यांना कॉंग्रेसमध्ये आणलं.

इथून प्रणबदा यांची गाडी सुसाट सुटली.

कॉंग्रेस म्हणजे सबुरी, संयमचे दुसरे नाव. लोकांचे म्हातारपण ओलांडते पण वरच्या फळीत संधी मिळत नाही. ती प्रणबदा यांना अवघ्या ३५ व्या वर्षी मिळाली. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेण्यात आलं.

राज्यसभेत त्यांची चमक पाहून इंदिरा गांधीनी पुढच्या चारच वर्षात प्रणब मुखर्जी यांना केंद्रात औद्योगिक विकास राज्यमंत्री बनवलं.

आणिबाणीच्या धामधूमीचा काळ. प्रणब मुखर्जी यांच्या कार्यक्षमतेने इंदिरा गांधी इम्प्रेस झाल्या होत्या. गांधी घराण्याच्या खास वर्तुळात त्यांना संधी मिळाली. प्रणबदा यांना याचा फायदा झाला आणि तोटाही झाला.

पुढे जेव्हा आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचा पराभव झाला तेव्हा त्यांच्या सगळ्या निष्ठावंत सहकाऱ्यांवर सल्लागारांवर आणिबाणीच्या चुकीचे खापर फोडण्यात आले. नव्या जनता सरकारने प्रणब मुखर्जी यांचीही जस्टीस शाह कमिशनच्या अंतर्गत चौकशी लावली.

पण प्रणब मुखर्जी या अग्नीपरीक्षेतून तलावून सुलाखून बाहेर पडले.

१९८० साली अनपेक्षितपणे इंदिरा गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करून त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या. त्यांचे कॉंग्रेसचे अनेक जुनेजाणते सोबती पक्ष सोडून गेले होते. कॉंग्रेसचे अनेक तुकडे झाले होते. तरीही इंदिरा गांधी या नावाच्या करिष्म्यावर परत जनतेने शिक्कामोर्तब केला होता.

जे मोजके सहकारी इंदिरा गांधींच्या वाईट काळातही त्यांच्या सोबत उभे राहिले यात प्रणब मुखर्जी यांचा समावेश होता. त्यांची भारतीय अर्थकारणावरची पकड, त्यांचा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास, त्यांचे व्यवहार चातुर्य यामुळे प्रणबदा यांची भारताच्या अर्थमंत्रीपदी निवड केली.

झटक्यात प्रणव मुखर्जी हे नाव देशाच्या राजकारणात इंदिराजींच्या खालोखाल दोन नंबरच्या स्थानाला जाऊन पोहचलं.

साधारण याच काळात नव्या गांधीचा उदय होत होता. राजीव गांधी.

इंदिरा गांधी यांचे हे थोरले चिरंजीव राजकारणापासून दूर होते. त्यांचा धाकटा भाऊ संजय गांधी इंदिराजींचा वारसदार म्हणवला जात होता. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि इंदिरा गांधी यांनी राजीव यांना राजकारणात आणलं. दिल्ली येथे एशियाड गेम्स भरवणे, इंदिराजीना राजकीय मदत म्हणून राजीव गांधी कार्यरत होते मात्र पुढे जाऊन मोठे पद भूषवावे एवढी त्यांची महत्वाकांक्षा नव्हती.

अशातच १९८४ उजाडले. अमृतसर येथील सुवर्णमंदिरात लपलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी इंदिरा गांधीनी ऑपरेशन ब्ल्यूस्टार ही लष्करी कारवाई केली. याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या शीख बॉडीगार्डसनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

ही घटना घडली तेव्हा राजीव गांधी आणि प्रणब मुखर्जी प.बंगाल मध्ये कोलाघाट इथे दौऱ्यावर गेले होते.

राजीव गांधी यांना या हल्ल्याविषयी कळाल तेव्हा ते वेगाने दिल्लीला परत निघाले. इंदिराजींचे निधन झाले आहे हे त्यांना बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू अथवा बंगालचे राज्यपाल यांनी सांगितली नाही.

दिल्लीला परतणाऱ्या विमानात राजीव गांधी व प्रणव मुखर्जी एकत्र होते. विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या रेडियोवर राजीव गांधी यांनी इंदिराजींच्या हत्येची बातमी पहिल्यांदा ऐकली. ते पूर्णपणे हादरून गेले.

प्रणव मुखर्जी यांच्यासाठीही हा मोठा धक्का होता. इंदिरा गांधी यांचे स्थान त्यांच्या आयुष्यात एखाद्या मार्गदर्शक वडीलधाऱ्या व्यक्ती प्रमाणे होते. विमानाच्या स्वच्छतागृहात गेल्यावर त्यांचा बांध सुटला. रडून त्यांचे डोळे लाल झाले होते. विमानाच्या सर्वात मागच्या सीटवर बसून प्रणबदा डोळे चोळत बसले.

२४ अकबर रोड या आपल्या पुस्तकात रशीद किडवाई यांनी या प्रसंगाचे वर्णन केलेले आहे.

त्यात ते सांगतात की राजीव गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांना काळजीवाहू सरकार स्थापन करण्याविषयी तांत्रिक माहिती विचारली तेव्हा मुखर्जी यांनी मंत्रीमंडळातील जेष्ठतेचा क्रम सांगितला.

प्रणब मुखर्जी यांनी राजीव गांधींना आव्हान दिले आहे असा समज सगळीकडे पसरला. प्रणव मुखर्जी इंदिराजींच्या मंत्रीमंडळातला सर्वात जेष्ठ मंत्री असल्यामुळे पंतप्रधान पदाचा अधिकार सांगत आहेत अस सगळी कडे बोलल गेलं.

पंतप्रधानाचे सचिव पीसी अलेक्झांडर यांच्या मते उलट प्रणव मुखर्जी यांनी राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाला अनुमोदन दिले होते.  

जे काहीही घडल असेल पण प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात असलेल्या कॉंग्रेसी नेत्यांनी त्यांच्याबद्दल प्रचंड अपप्रचार केला. राजीव गांधी यांच्या मनात प्रणव मुखर्जींबद्दल आशंका निर्माण करण्यात आली. यामुळेच राजीव गांधी यांनी काळजीवाहू सरकार ऐवजी थेट स्वतःच शपथ घेतली.

राजकारणातला कोणताही अनुभव नसणारे राजीव गांधी पंतप्रधान बनले.

त्यांनी प्रणबदा यांना मंत्रीमंडळात स्थान दिले नाहीच शिवाय त्यांना पक्षातून निलंबित केले. प्रणबदा यांच्या आजवर वेगाने दौडत असलेल्या राजकीय कारकिर्दीला खीळ बसला. त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला.

पण इंदिरा गांधींचा हा चाणक्य स्वबळावर निवडणुका लढवताना मात्र सपाटून अयशस्वी ठरला.

१९८८ साली त्यांनी पडती बाजू घेत आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करून टाकला आणि राजकीय विजनवासात गेले. १९९१ साली लोकसभा निवडणूक प्रचारावेळी राजीव गांधींची तमिळी अतिरेक्यांनी हत्या केली.

सहानुभूतीच्या लाटेत कॉंग्रेसची सत्ता आली.यावेळी पुन्हा पंतप्रधान कोण हा प्रश्न समोर आला.

शरद पवार, अर्जुनसिंग, एन.डी.तिवारी, सीताराम केसरी अशी अनेक दिग्गज मंडळी स्पर्धेत होती. आपण अचानक प्रणव मुखर्जी यांच्या प्रमाणेच निवृत्त झालेले पी व्ही नरसिंहराव शड्डू ठोकून मैदानात आले. 

कॉंग्रेसच्या निवडून आलेल्या खासदारांनी मतदान केले. नरसिंहराव यांच्या बाजूने बहुमत आलं. प्रणवदा खासदार नव्हते त्यामुळे त्याचा विचार झाला नाही. मात्र नरसिंहराव यांच्याशी त्यांचे संबंध चांगले होते.

नरसिंहराव यांनी प्रणबदा यांना तुमचा योग्य सन्मान करणार असे आश्वासन दिले.

मात्र ऐनवेळी त्यांना अर्थमंत्री करण्याऐवजी डॉ.मनमोहनसिंग या राजकारणाबाहेरच्या व्यक्तीला ते पद दिल. प्रणबदांची नेमणूक नियोजन आयोगावर करून टाकली. प्रणबदा यांनी हा विश्वासघात पचवला. पुढे रावांनी त्यांना आपल्या पंतप्रधानपदाच्या शेवटच्या काळात परराष्ट्रमंत्रीपद दिल.

पुढे पुन्हा कॉंग्रेसची सत्ता गेली.

कॉंग्रेसमध्ये पुन्हा पक्षांतर्गत सत्ता बदल होत होते. सीताराम केसरी यांच्या हातात पक्ष गेला. पण त्यांच्या कारभाराला कंटाळून सोनिया गांधी यांना राजकारणात आणलं गेलं. राजीव गांधीच्या नंतर सोनियाजींचा देखील प्रणब मुखर्जी यांच्यावर विश्वास उरला नव्हता मात्र पक्षासाठी ते करत असलेलं काम बघून त्यांना परत संधी दिली गेली.

सोनिया गांधींना पक्ष चालवण्यासाठी प्रणबदांच्या सारखा जुना अनुभवी नेता हवा होता. २००४ साली कॉंग्रेस पुन्हा सत्तेत आली. सोनिया गांधींचा विदेशीपणाचा मुद्दा पुन्हा वर आला. त्यांनी पंतप्रधानपद नाकारलं. जेष्ठ्त्वाच्या नाते प्रणब मुखर्जी यांचाच या पदावर नंबर होता मात्र वीस वर्षांपूर्वी जे झाल होत ते सोनिया गांधी पूर्णपणे विसरल्या नव्हत्या.

त्यांनी मुखर्जी यांच्या ऐवजी मनमोहन सिंग यांना पसंती दिली.

एकेकाळी मनमोहन सिंग यांची रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून निवड प्रणबदा यांनीच केली होती, त्याच मनमोहन सिंग यांच्यामुळे प्रणबदा यांचं १९९१ साली अर्थमंत्रीपदाची संधी गेली होती आणि आज त्याच्याच मुळे पंतप्रधान पद देखील हुकलं.

डॉ.मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात प्रणबदा यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. पुढे अर्थमंत्रालय, परराष्ट्र व्यवहार वगैरे मंत्रिपद सांभाळले. पण त्यांचे पंतप्रधानाच्या खालोखाल दोननंबरचा मंत्री हे स्थान अढळ राहिले.

मनमोहन सिंग यांचं युपीए सरकारचे संकटमोचक म्हणून प्रणबदा यांनी काम पाहिलं.

अनेकदा अवघड परिस्थितीत सरकार तारुन नेले. प्रणबदांची कणखर मनोवृत्ती, कम्युनिस्टांपासून ते विरोधकांपर्यंत प्रत्येकाशी असलेला संवाद राजकीय चातुर्य या सगळ्याचा फायदा मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाला झाला.

२०१२ साली प्रणबदा यांना पुन्हा पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती.

त्याकाळी अण्णा आंदोलन जोरात होतं. एकामागोमाग एक घोटाळे उघड होत होते. कॉंग्रेसवर देशभरातून जोरदार टीका होत होती. मनमोहनसिंग यांचे सरकार निष्क्रिय व मौनी आहे असे म्हटले जात होते.

अशावेळी त्यांना राष्ट्रपतीपदी पाठवून निष्कलंक प्रणब मुखर्जी यांच्या कणखर हाती पंतप्रधानपद सोपवण्यात येईल अशी चर्चा जोर पकडली होती.

मात्र १९८४ सालचे प्रणब मुखर्जी यांच्या बद्दलचे गैरसमज पुन्हा आडवे आले आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना पंतप्रधान न करता राष्ट्रपती पदाच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकवले. प्रणब मुखर्जी पुढे राहुल गांधी यांच्या युवराजपदाला आडकाठी करतील म्हणून सोनिया गांधीनी हा निर्णय घेतला अस दबक्या आवाजात बोलल गेल.

अशा प्रकारे योग्यता असून, संधी चालून आली तरी प्रणबदा यांना अनेकवेळा पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली.

मागच्या वर्षी त्यांना भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला होता. गेली पन्नास वर्षे भारताच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूत राहून अनेक स्थित्यंतरे अनुभवणाऱ्या, त्याचा भाग असणाऱ्या या भीष्माचार्याचे ३१ ऑगस्ट २०२० रोजी दुर्दैवी निधन झाले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.