प्रणवदांच्या बंगाली ऍक्सेंटने घोळ घातला आणि पत्रकारांना उपाशी पोटी परतावं लागलं

माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी म्हणजे काँग्रेस पक्षातील अँग्री यंग व्यक्तिमत्व. बंगालच्या मातीत असणारी बंडखोरी त्यांच्या देखील रक्तात वाहत होती. वेळ पडली तर आपल्याच पक्षातल्या नेत्यांशी पंगा घ्यायला देखील ते पुढे मागे पाहायचे नाहीत. त्यांच्या याच वादळी स्वभावामुळे काँग्रेसने त्यांना पंतप्रधान बनू दिलं नाही. तरीही ते पक्षाचे संकटमोचक म्हणूनच कार्यरत राहिले.

मुखर्जी धूर्त आणि अनुभवी नेते म्हणून प्रसिद्ध होते, तसेच ते श्रद्धाळूही होते. या श्रद्धाळू पणातूनच त्यांनी आपल्या घरी काही पत्रकारांना भजनाला बोलावलं आणि पत्रकारांना वाटलं भोजनाला. आणि त्यातून हा गंमतीदार किस्सा घडला.

जेव्हा प्रणव मुखर्जी यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली तेव्हा ते सेंट्रल हॉलमध्ये विमनस्कपणं येऊन बसत. पाईपमध्ये तंबाखू भरत. त्यातून अधूनमधून धूर काढीत. त्यामुळे त्यांच्यात राजकीय धुगधुगी आहे, याचा सुगावा लागे.

प्रत्येक बंगाली माणसासारखी त्यांची दुर्गामातेवरही श्रद्धा होती. दरवर्षी ते बंगालमधील आपल्या घरी दुर्गापूजेच्या निमित्तानं जात असत. खरं तर नंतरच्या काळात बंगालमध्ये काँग्रेसलाही भवितव्य राहिलं नाही आणि मुखर्जींनाही. पण त्यांची दुर्गाभक्ती काही कमी झाली नाही.

प्रणव मुखर्जी इंग्रजी किंवा हिंदी बंगाली ढंगानं बोलत. एकदा मुखर्जी यांनी काही पत्रकारांना दुपारी भोजनास घरी बोलावलं. सारे जण आता खास बंगाली पदार्थ चाखायला मिळणार, या आनंदात होते. पण प्रणवदांच्या बंगाली शब्दोच्चारानं सारा घोटाळा केला.

त्यांनी भोजनाला नव्हे तर भजनाला बोलावले होते. पण ‘भोजन’ असा बंगाली पद्धतीचा उच्चार केल्यानं पत्रकारांची फसगत झाली होती व ‘भूखे भजन न होय गोपाला.’ यामुळं भजन न ऐकताच पत्रकारांनी तेथून काढता पाय घेतला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.