आमदारांना ढेकूण चावला म्हणून रेल्वेचा अख्खा डब्बाचं काढून टाकला

हा किस्सा पार ६ – ७ वर्षांपूर्वीचा आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे एका कामानिमित्त सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईला जात होत्या. एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लास डब्यातून त्या प्रवास करत होत्या. माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या म्हणून त्यांना स्पेशल सर्व्हिस दिली जात होती. या प्रवासा दरम्यान विश्रांती म्हणून त्यांनी झोपण्याची तयारी केली.

रेल्वेनं मोहोळ स्टेशन पार केलं आणि त्या झोपी गेल्या. तासाभरात कुर्डूवाडी स्टेशन जवळ त्यांना काहीतरी चावल्यासारखे वाटलं. त्यांनी दूर्लक्ष करत कूस बदलली. मिनिटभरातचं पुन्हा त्यांना डंख बसल्यासारखं वाटलं.आता चावलेल्या जागी खाजवायला लागली, त्यांची झोप पुरती उडाली. स्वच्छ पांढर्‍या शुभ्र आपल्या बिछान्यावर त्या उठून बसल्या. त्यांनी अटेंडंटला हाक मारली.

आता व्हीआयपी प्रवासी असतील तर कटाक्षानं जागा राहिलो तर फायदा होतो हे रेल्वे कर्मचाऱ्यांना चांगलचं माहीत होतं. हाक ऐकताच तो अटेंडंट लगबगीने गेला. प्रणिती त्याला म्हणल्या, ‘ काहीतरी चावतयं, यावर अटेंडंटनं अंदाज बांधला की,

बहूतेक ढेकूण असावा.

झालं. आता ढेकूण शब्द ऐकताचं प्रणिती यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मुंबईतल्या सेंट झेवियर्ससारख्या कॉलेजमधून पदवी घेतलेल्या आणि इंग्रजी माध्यमात शिकलेल्या प्रणिती यांना ढेकणचा तिटकारा होता. संपूर्ण लहानपण चांगल्या घरात गेलेल्या प्रणिती यांनी ढेकूण त्यांनी चित्रातच पाहिला असावा.

पण आता थेट अनुभव आला होता. चिडलेल्या प्रणिती शिंदेंनी अटेंडंटवरचं आपला सगळा राग काढला. आता अटेंडंट असला तरी तो माणूसचं तोही आतल्याआत चिडत काहीतरी पुटपुटून लागला.

प्रणिती शिंदेंचा संतापाचा पारा आणखी वाढला. तेव्हा रेल्वे कुर्डूवाडी स्टेशन सोडून काही किलोमीटर पुढे आली होती. रागावलेल्या आमदार बाईंनी सरळ रेल्वेची साखळीचं ओढली. कर्कश्य आवाज करत ब्रेक मारून रेल्वे उभी राहिली.

एस सी फर्स्ट क्लास डब्यातून कोणीतरी साखळी ओढल्याचं रेल्वे कर्मचार्‍यांच्या ध्यानात आलं होतं. ते आले. त्यांना आमदार बाईंनी सांगितलं,

‘माझ्या बिछान्यात ढेकूण शिरलाय, शोधा त्याला. ‘

बाईंचा महत्व साऱ्यांनाच ठाऊक होतं, सगळेजण निमूटपणे ऐकून शोधू लागले. सगळ्यांनी ढेकूण शोध – शोध शोधला. पण ढेकूण काही मिळाला नाही. शेवटी ती बेडशीट बदलली, सगळ्या डब्यात केमिकल फवारणी करण्यात आली.

प्रणिती शिंदे सारख्या आमदारांना हा अनुभव आला म्हणल्यावर सर्वसामान्य प्रवाशाना याचा किती त्रास होत असेल हा प्रश्न देखील होता. एक आमदार म्हणून नाही तर सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून शिंदेनी रेल्वे कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली.

 त्यावेळी सुशीलकुमार केंद्रात मोठ्या पदावर होते. त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि सोलापूर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत ही खबर पोहोचवली. रेल्वे विभागानं तो डबाचं रेल्वेगाडीला जोडणं बंद केलं.

फक्त प्रणिती शिंदेच नाही तर पुढच्या आठवड्यात काही साध्या प्रवाशानी देखील ढेकूण सापडला म्हणून रेल्वेची चेन ओढली होती. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील ढेकूण प्रकरणात प्रणिती शिंदेंवर टीका करणाऱ्या विरोधकांना आपले शब्द मागे घ्यावे लागले होते.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.