बाबासाहेब पुरंदरेंच्या मुलानेच अब तक छप्पन मधला अंडरवर्ल्ड डॉन साकारला होता

अब तक छप्पन मधला एन्काउंटर स्पेशालिस्ट साधू आगाशे (नाना पाटेकर) बायकोला बाजारात सोडायला कार मधून निघालाय.  दोघांच्या सांसारिक गप्पा सुरु आहेत. सोबतच नाना फोनवर देखील बोलतोय. फोन थेट दुबईला सुरु आहे.

दुबईमधला डॉन जमीर फोनवर बोलतोय. फोनची सुरवात एकमेकांची अगदी आई बहीण काढण्यापासून होते. पण अचानक डॉनचा सूर बदलतो. अगदी काकुळतीत येऊन तो नानाला साधू साब थोडा बहुत तो देखने का ना असं म्हणत असतो. नाना सुद्धा अगदी स्वॅगमध्ये त्याला म्हणतो,

तू भाईगिरी बंद कर और मै ठोकना बंद कर देता हुं.

अगदी सहज दोन दोस्त एकमेकांना शिव्या घालत बोलत आहेत असं वाटावं असा हा संवाद मुंबईचा सर्वात मोठा डॉन आणि एका साध्या पोलीस ऑफिसरमध्ये आहे असं सांगितलं तर कस वाटेल ? राम गोपाल वर्माने मुंबईच्या अंडरवर्ल्डवर जे सिनेमे बनवले त्या यादीतला हा शेवटचा भारी चित्रपट.

असं म्हणतात की हा डॉन खुद्द दाऊद इब्राहिम वर बेतलेला होता. चलाख बुद्धीचा आतल्या गाठीचा क्षणाक्षणाला आपलं रूप बदलणारा हा मुंबईचा डॉन जमीर थंड डोक्याने जे काही करत असतो ते बघून नाही म्हटलं तरी मनात धडकी भरते.

अनेकांना प्रश्न पडतो की पण हा रोल केला होता कोणी ?

तो रोल करणारा एक मराठी अभिनेता होता. त्याच नाव प्रसाद पुरंदरे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे धाकटे चिरंजीव. 

अनेकदा मोठ्या व्यक्तींच्या मुलांची तुलना त्यांच्या आईवडिलांच्या कर्तृत्वाशी केली जाते. असं म्हणतात की मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत छोटी रोपे वाढत नाहीत. आपल्या पालकांच्या इमेजशी तुलना होण्याचं भय या मुलांना नेहमी असत. पण बाबासाहेब पुरंदरेंच्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वापेक्षाही वेगळं कार्य करून प्रसाद पुरंदरेंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली हे हि तितकंच खरं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संशोधकी वृत्तीचे बाळकडू आणि सोबतच वडील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच वरदहस्त असा उत्तुंग वारसा प्रसाद यांना जन्मापासून लाभला. शिवशाहीच्या संस्कारात त्यांची जडणघडण झाली. 

पुण्याच्या भावे हायस्कुलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. तेव्हापासून प्रसाद यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. पुण्यातलं नाटकांचं वातावरण, महाविद्यालयीन स्पर्धा यातून ते घडत गेले. ‘पडघम’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’ अशा मोठ्या नाटकांमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारल्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पाठिंबा त्यांना होताच.

मराठ्यांच्या इतिहासातील साहसाची परंपरा त्यांच्या रक्तात देखील भिनली होती. त्यांना मोटारसायकल रेसिंग, रायफल शूटिंग, ग्लायडींग अशा साहसी खेळांचा छंद होता. यातूनच त्यांनी १९९२ साली नॅशनल एज्युकेशन फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. 

याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साहसी खेळांचे प्रशिक्षण सुरु केले. आधुनिक मराठी तरुणांना शिवछञपतींच्या इतिहासाशी जोडण्यासाठी त्यांनी कात्रज ते सिंहगड ट्रेकिंग स्पर्धा, एन्ड्युरो स्पर्धा यांचं आयोजन ते करू लागले. वडिलांसोबत गिर्यारोहणातून पायाखाली घातलेला सह्याद्री आणि शिवशाहीचा वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ते प्रयत्नशील होते.

सोबत अभिनयाची आवड होतीच. यातूनच त्यांच्यावर रामगोपाल वर्मा यांची नजर गेली आणि त्याने त्यांना आपल्या महत्वाकांक्षी अशा अब तक छप्पन या सिनेमात संधी दिली. प्रसाद पुरंदरे यांनी या रोलचं सोनं केलं. नाना पाटेकर सारख्या तगड्या अभिनेत्याच्या डोळ्यात डोळे घालून उभं राहायला देखील धाडस लागतं. प्रसाद पुरंदरे यांनी ते आव्हान अगदी लीलया पेललं आणि समीक्षकांनी देखील त्यांचं कौतुक केलं.

 हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.