आणि शांत सज्जन प्रसादने पाकिस्तान्यांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला.

१९९६चा  वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होत होता. होम ग्राउंड वर दक्षिण आशियाई टीमची कामगिरी जबरदस्त होत होती. त्याकाळात भारताचा सचिन ,पाकिस्तानचा सईद अन्वर, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या अफाट फॉर्म मध्ये होते. त्यांच्याच कामगिरी या तिन्ही टीम क्वार्टर फायनल मध्ये पोहचल्या होत्या. आता मात्र खरी परीक्षा सुरु होणार होती.

९ मार्च १९९६, चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर.

पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीत जाण्यासाठी एकमेकाच्या आमोरासमोर होते.

मोहम्मद अझरूद्दीनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग निवडली. पाकिस्तानचा कप्तान वसीम आक्रम या महत्वाच्या सामन्यात इंज्युरीमुळे बाहेर होता. त्याच्या ऐवजी कप्तानी आमीर सोहेलला देण्यात आली होती.

भारताची सुरवात चांगली झाली. सिद्धू आणि सचिनने ९० धावांची ओपनिंग केली. पण सचिन ३१ रन्सवर आउट झाला. त्याच्या पाठोपाठ मांजरेकर, अझर, कांबळी प्रत्येकी वीस, पंचवीस रना जोडून पॅव्हेलीयनमध्ये परतले. सिद्धू एका साईडला उभा राहून किल्ला लढवत होता. पण अजय जडेजा आल्यावर चित्र पालटल. त्याने चौकार आणि षटकारांची उधळण करत अवघ्या २५ चेंडूत ४५ धावा बनवल्या. सिद्धूची सेंच्युरी थोडक्यात चुकली. भारताने पाकिस्तानपुढे २८८चे टार्गेट ठेवले.

पाकिस्तान मागचा वर्ल्ड कप किंक्ले होते मात्र तेव्हाही त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी त्याचा वचपा काढण्यासाठी आमीर सोहेल आणि सईद अन्वरची सलामीची जोडी मैदानात उतरली. त्यांनी आल्यापासून भारतीय फास्ट बॉलर्सची पिटाई सुरु केली. लोकल बॉय श्रीनाथला तर खूप धुतला. त्यामुळे अझरूद्दीनने सातव्याच ओव्हरला अनिल कुंबळेच्या हातात बॉल दिला. तरीही हे वादळ थांबल नाही.

फक्त दहा ओव्हर मध्ये अन्वर आणि सोहेलच्या जोडीने ८४ धावा कुटल्या होत्या. पाकिस्तानची स्थिती मजबूत झाली होती. तसं बघायला गेलं तर बेंगलोरचं पब्लिक सुसंस्कृत मानलं जात मात्र त्यांनीही श्रीनाथ आणि प्रसादच्या विरुद्ध घोषनेबाजी सुरु केली होती.

अखेर श्रीनाथलाचं पहिलं यश मिळालं. त्याने सईद अन्वरला जाळ्यात पकडलं. तो ४८ धावावर बाद झाला आणि मॅचचं चित्र पालटू लागलं. पुढचा आलेला फलंदाज इजाज अहमद आल्यापासून अडखळत खेळू लागला. मगाशी ज्या प्रसादची पिटाई सुरु होती तोचं प्रसाद आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये राउंड द विकेट येऊन पाक फलंदाजांना अडचणीत आणु लागला.

पाकिस्तानचा कॅप्टन आमीर सोहेलच्या लक्षात आलं की मॅचचा मोमेंटम घालवून चालणार नाही.  त्याची नुकतीच फिफ्टी झाली होती. त्याने वेंकटेश प्रसादवर प्रेशर आणायचं ठरवलं. प्रसादला त्याने पुढे येऊन कव्हर्समधून जोरदार फटका मारला. बुलेटच्या वेगाने तो बॉल सीमापार गेला. पण तेवढ्याने सोहेल शांत बसला नाही, फॉलोथ्रू मधून येऊन त्याने प्रसादला बाउन्ड्री लाईनकडे बॅट दाखवून धमकी दिली की,

“तेरे हर बॉल को ऐसेही मारुंगा”

वेंकटेश प्रसाद हा शिडशिडीत साधा सरळ खेळाडू होता. तो कधी स्वताहून कधी वादात अडकायचा नाही किंवा त्याने कधीही कोणाला स्लेजही केले नव्हते. पण शांत व्यक्तीची खोड काढायची जुनी पाकिस्तानी सवय सोहेललाही होती. त्याने मुद्दामपणे प्रसादचा केलेला अपमान करोडो प्रेक्षकांना टीव्हीवर दिसत होता. प्रसाद त्याला तोंडाने प्रत्युत्तर देणारं नाही हे ही सगळ्यांना माहित होते  

पण प्रसादच्या डोक्यात आपल्यावर सोहेलने उगारलेली बॅट, त्याने केलेली शिवीगाळ जात नव्हती. तो रनअप घेण्यासाठी निघाला. अझर सचिन वगैरे त्याला काहीतरी सांगत होते पण त्याच त्या कडे लक्ष नव्हत. काही तरी मनाशी दृढ करून तो बॉल टाकायला धावला. सोहेलला वाटत होते की आता एक बाउन्सर पडणार, तो त्याच तयारीत होता.

पण वेंकटेश प्रसादने त्याला सुपर यॉर्कर मारला. सोहेलला तो बॉल दिसला देखील नाही. त्याने हवेत बॅट फिरवली आणि इकडे विजेच्या वेगाने त्याची ऑफ स्टंप उडून पडली. सुरवातीला तर काही क्षण एकदम सन्नाटा पसरला आणि लगेच अख्खं स्टेडियम नाचू लागलं. प्रसादने जादू केली होती. आमीर सोहेल कधीही विसरणार नाही असं उत्तर त्याला मिळालं.

अख्ख्या भारताच्या वतीने त्याने अपमानाचा बदला घेतला होता. अमीर सोहेल पॅव्हेलीयन मध्ये परतू पर्यंत टाळ्यांचा आणि घोषणांचा गडगडाट सुरु होता. हाच तो क्षण जेव्हा मॅच भारताच्या बाजूने फिरली होती. प्रसादनेच इजाज अहमद, इंझमाम उल हक अशा महत्वाच्या विकेट घेतल्या. भारताने हा सामना जिंकला होता. 

कोणताही भारतीय फन आयुष्य भर हा सामना विसरू शकणार नाही. वर्ल्डकप सारख्या महायुद्धात पाकिस्तानचा माज ठेचला आणि ते सगळ्या जगाने लाइव्ह बघितलं. ज्याला पप्पू समजलं तो वेंकटेश प्रसाद पाकिस्तान्यावर भारी पडला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.