काँग्रेसवाला जनसंघवाल्याची कार हरवतो तेव्हा…

नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅन्व्हासवर चमकवण्याचे काम डॉ भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झाले. पारतंत्र्याच्या काळापासून हिरे घराण्याकडे सत्तेची सूत्रे राहिली.

एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या भाऊसाहेब हिरे यांचा वारसा व्यंकटराव हिरे, बळीराम हिरे, पुष्पा हिरे यांनी पुढे चालवला.

व्यंकटराव हिरे हे वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात मंत्री राहिले होते. त्यांचे सुपुत्र डॉ. प्रशांत हिरे देखील पुढे राजकारणात आले, मंत्री देखील झाले. त्यांनीच इंटरनेटवरील कोरा येथे सांगितलेला एक गंमतीशीर किस्सा.

गोष्ट असेल १९७३ सालची.

प्रशांत हिरे अणि त्यांचे मित्र व्यवसायाच्या कारणास्तव दर मंगळवारी नाशिकहून मुंबईला जात असत. प्रत्येकाकडे कार होत्या. आलटून पालटून एकेकाच्या गाडीची पाळी असायची.

हा किस्सा घडला त्यावेळी प्रशांत हिरे यांचे मित्र धनंजय वडनगरे यांच्याकडे अँँबेसिडर कार होती. धनंजय यांचे काम लवकर आटपल्याने ते मेट्रो थिएटरला रिकरनिएशन ॲाफ पिटर प्राऊड हा सिनेमा पाहण्यासाठी गेले तर त्यांची कार घेऊन प्रशांत हिरे आपल्या बहीणीला भेटण्यासाठी सोफिया काॅलेजला गेले.

जाताना रस्त्यात पेडर रोडवर काही सामान घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली, तिथेच जागा बघून कार पार्क केली.

त्या काळात तेथे तीन कारचे पार्किंग आणि शेजारी पोलीस बीट ची खोली होती. गाडीत बहिणीला देण्यासाठी वेफर्स, चिवडा, बिस्कीटे कागदाच्या पिशव्यांत भरून ठेवली होती.

दुसरे काही सामान आणायला प्रशांत हिरे रस्ता ओलांडून पलीकडे गेले. २ मिनीटांत परत आले तर कार गायब. बीट मधील पोलीसला विचारणा केली तर तो म्हणाला,

तुम्ही ठेवली व कोणी नेली त्याला मी काय करणार. आता गांवदेवी चौकीत चला तक्रार नोंदणी करा.

प्रशांत हिरे यांना पोलीस स्टेशन मध्ये थोडा वाईटच अनुभव आला,मात्र त्यांनी मी माजी मंत्र्याचा मुलगा आहे हे सांगितल्यावर उपकार केल्याप्रमाणे तक्रार नोंदणी केली.

वरून ठाणे अंमलदार म्हणाले,

साहेब तीन महिन्याने येउन कार सापडत नाही ह्याचे प्रमाणपत्र घेउन जावा. विमा कंपनी भरपाई देईल. चोरीच्या कार फार कमीच परत मिळतात.

प्रशांत हिरे यांना टेन्शन आले. गाडी तर मित्राची होती, आता त्याला उत्तर कसे द्यायचे.

अशावेळी अचानक त्यांना शरद पवारांची आठवण आली. शरद पवार तेव्हा मंत्री होते. त्यांच्याशी हिरे कुटुंबाची कौटुंबिक संबंध होते. या परीक्षेच्या घडीला पवारच मदत करतील याची त्यांना खात्री होती.

प्रशांत हिरे तडक शरद पवारांच्या घरी रामटेक वर पोहचले. तिथे दारातच त्यांची भेट नाशिकचे आ. विनायकदादा पाटील यांच्याशी झाली. प्रशांत हिरे यांची तक्रार ऐकून ते त्यांना थेट शरद पवारांच्याकडे घेऊन गेले.

शरद पवारांनी सगळा घटनाक्रम नीट ऐकून घेतला. त्यानंतर म्हणाले,

प्रशांत गाडी तुझीच होती ना ?

हिरे यांनी सांगितलं की गाडी मित्र वडनगरेंची होती.

शरद पवार चमकले. गाडीचे मालक दादासाहेब वडनेरे हे तर जनसंघाचे नेते होते. त्यांनी मग हसत हसत तत्कालीन डि सी पी त्यागी यांंना फोन केला व म्हणाले

‘त्यागी फार मोठा प्राॅब्लेम झालाय, आमच्या काँग्रेसवाल्याच्या मुलाने जनसंघ वाल्याची गाडी हरवली आहे.”

डिवायएसपी यांना त्यांनी सगळी कथा सांगितली, प्रशांत हिरे कोण आहेत हे सांगितलं आणि पुन्हा एकदा जोरात हसुन म्हणाले,

त्यागी कार परत नाही मिळाली तर परवा विधान सभेत गंमत होईल.

हे सगळं झाल्यावर डॉ. हिरे यांना शरद पवारांनी घरी जा, गाडी सकाळ पर्यंत मिळेल अस सांगितलं.

प्रशांत हिरे आपल्या फ्लॅटवर पोहोचायच्या आधी दोन पोलीस जीप , एक सिनियर इंस्पेक्टर व दोन पी आय त्यांची पोहोचायची वाटच पहात होते. हिरे यांच्या कडून गाडीचा नंबर व इतर अधिक माहिती घेउन ते गेले.

जाताना ते पोलिस हिरे यांना म्हणाले,

मी तुमच्या वडिलांचा कॉलेजमधला बॅचमेट आहे आणि त्या नात्याने मी तुमचा काका लागतो. तुमची गाडी नक्की मिळेल, काही काळजी करू नका.

आणि अगदी चमत्कार झाल्याप्रमाणे वडनेरे यांची अँँबेसिडर पुढच्या दिवशी सापडली आणि दुपार पर्यंत कोर्ट ॲार्डर होउन कार हिरे यांच्या ताब्यात देखील आली !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.