जगनमोहन रेड्डी सत्तेत आले ते केवळ ‘पदयात्रेमुळे’, तेच आत्ता प्रशांत किशोर करणार

निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर हे नवीन पक्ष निर्माण करतात की काय, या चर्चा सुरु होत्या… २ मे ला प्रशांत किशोर यांनी एक ट्विट केलं होतं, त्यावरून या चर्चा रंगल्या होत्या. 

मात्र काल ५ मे ला प्रशांत किशोर यांनी आपल्या या नवीन प्रचारमोहिमेबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे. बिहारची राजधानी पटनाच्या ज्ञानभवनमध्ये प्रशांत किशोर यांनी आपली राजकीय रणनीती जाहीर केली आहे. आपल्या ‘जन सूराज’बद्दल बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, 

“मी सध्यातरी कोणताही नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीये. मात्र, येत्या तीन महिन्यांत बिहार बदलण्याचा विचार करणाऱ्या १७ हजार लोकांशी संवाद साधणार आहे. त्यांच्याकडून समजून घेतल्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्याची गरज आहे की नाही, हे ठरवणार आहे.”

शिवाय प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून चंपारण इथून ३ हजार किलोमीटरची पदयात्रा काढून ते लोकांना भेटणार आहेत.

प्रशांत किशोर यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात झालेल्या अशा पदयात्रा आठवल्या तर शरद पवार आणि राजाराम बापू यांच्या पदयात्रा डोळ्यांसमोर येतात. 

तर देशपातळीवर झालेल्या पदयात्रा आणि त्यातही अलीकडच्या काळातील आठवायला गेलं तर वायएसआर रेड्डी यांचे पुत्र आणि सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची पदयात्रा आठवते.

२०१९ साली जगनमोहन रेड्डी यांनी पदयात्रेच्याच जोरावर आंध्रची सत्ता मिळवली होती…

खरं तर याची प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती. जगनमोहन रेड्डी यांचे वडील आणि काँग्रेस नेते वायएसआर रेड्डी यांनी २००३ मध्ये कडक उन्हात राज्यभरात १६०० किलोमीटरची पदयात्रा काढली होती. त्यामुळे ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले. 

वायएसआर यांना या मेहनतीचे फळ मिळालं आणि २००४ मध्ये आंध्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीतही प्रचंड यश मिळालं आणि केंद्रात सरकार स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या २७ जागा काँग्रेसनं जिंकल्या. 

या पदयात्रेमुळे राज्य तसंच केंद्रात वायएसआर मोठ्या ताकदीने उदयास आले. पाच वर्ष राज्य सरकार चालवणारे वायएसआर आंध्रात काँग्रेसपेक्षाही अधिक शक्तिशाली बनले.

२००९ मध्ये वायएसआर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची तयारी करू लागले. मात्र यावर्षी एका दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

वायएसआर यांच्या निधनानंतर पक्षाचे इतर आमदार जगन मोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करू लागले, पण काँग्रेस अध्यक्षांना हे पद पक्षाचं काम करणाऱ्या व्यक्तीला द्यायचं होतं. 

कारण आंध्रमध्ये रेड्डी कुटुंब ताकदवान होत होतं तर काँग्रेस कमकुवत. 

जगन मोहन यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी सोनिया गांधी यांची भेट घेतली, पण त्यांचं काही जमलं नाही. मात्र इथे परिस्थिती अशी झाली की, १७७ पैकी १७० आमदारांनी जगन मोहन रेड्डी यांना पाठिंबा दिला. तरी काँग्रेसने बंडखोरीकडे दुर्लक्ष करून ‘रोसय्या’ यांना राज्याचे नवीन मुख्यमंत्री केलं.

या निर्णयामुळे जगन मोहन रेड्डी चांगलेच संतापले आणि त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होत त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना झाली.

२०१२ मध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. या पोटनिवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि १८ पैकी १५ जागा जिंकल्या. काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) पक्षाशी सतत लढत देत असलेल्या रेड्डी यांचा मात्र २०१४ च्या निवडणुकीत टीडीपीकडून पराभव झाला.

याचं कारण देखील पदयात्रा होतं…

२०१२ मध्ये टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी अनंतपूर ते विशाखापट्टणम अशी पदयात्रा काढली होती. एका वर्षाच्या या पदयात्रेने त्यांना २०१४ मध्ये सत्तेच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 

यादरम्यान…

२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांची लोकप्रियता हळूहळू वाढत होती. काँग्रेसऐवजी ‘वायएसआर काँग्रेस’ हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. काँग्रेसपेक्षा जगन मोहन यांच्या पक्षावर लोकांचा जास्त विश्वास होता.

मात्र, या काळात राजकीय सत्ता वाढत असताना कायदेशीर पेचप्रसंगाने त्यांना सगळ्या बाजूनी घेरलं होतं.

२००३ मध्ये जगन यांची मालमत्ता सुमारे १० लाख रुपये होती, तर २०११ मध्ये वडिलांच्या जागेवरून कडप्पा इथून निवडणूक लढवताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ३०० कोटी रुपयांवर गेली. जगन यांच्या अशा मोठ्या प्रमाणात वाढत्या संपत्तीबाबत काँग्रेसचे एक मंत्री आणि टीडीपीच्या दोन नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

 या याचिकेवर आंध्र प्रदेश हायकोर्टाने सीबीआयला जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले. मालमत्ता प्रकरणाच्या तपासादरम्यान जगन मोहन रेड्डी यांना अटक करण्यात आली होती. जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या वर्चस्वाचा वापर केला आणि राज्याच्या साधनसंपत्तीचा गैरवापर करून स्वत:साठी बेहिशेबी मालमत्ता निर्माण केली, असा आरोप त्यांच्यावर होता. 

भ्रष्टाचाराच्या अटकेमुळे जगन मोहन रेड्डी यांच्या प्रतिमेचं मोठं नुकसान झालं.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जगन मोहन यांनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी दिवसरात्र एक केले आणि सत्ताधारी पक्ष टीडीपीच्या उणिवा जनतेसमोर आणल्या.

चंद्राबाबूंवरील हल्ले सुरूच होते मात्र यासाठी एका भक्कम घावाची गरज होती. अशात जगनमोहन यांनी आठवली पदयात्रा. आंध्रप्रदेशमध्ये पदयात्रांना किती महत्व आहे, हे वायएसआर रेड्डी यांनी दाखवून दिलं होतं. शिवाय चंद्राबाबू नायडू यांचं ताज उदाहरण होतं.

बस्स… जगनमोहन रेड्डी यांनी देखील पदयात्रेची घोषणा केली.

धुळीत मिळालेली प्रतिमा बदलणं आणि सत्ता स्थापन करणं हे या पदयात्रेचं ध्येय होतं. 

जगनमोहन रेड्डी यांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पदयात्रा सुरू केली. कडप्पा ते श्रीकाकुलम अशी पदयात्रा काढली. संपूर्ण आंध्र प्रदेशभर त्यांनी प्रवास सुरू केला. हा प्रवास १४ महिने चालला. एकूण ३,६४८ किलोमीटरची ही पदयात्रा होती. 

“प्रजा संकल्प यात्रा” अशा नावाने ही मोहीम सुरू करणाऱ्या रेड्डी यांनी राज्यातील १३ जिल्ह्यांचा दौरा केला आणि १७५ विधानसभा मतदारसंघांपैकी १३० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश केला.

३४१ दिवसांच्या वॉकेथॉनमध्ये त्यांनी १२४ जाहीर सभा आणि ५५ सामुदायिक सभा घेतल्या.

रेड्डी यांनी आंध्रच्या जनतेशी थेट संपर्क साधला. ज्यामुळे त्यांच्या बाजूने वातावरण तयार होण्यास मदत झाली. या पदयात्रेत त्यांनी मतदारांसमोर जाऊन ‘घर तक सरकार’ आणि सत्तेचं विकेंद्रीकरण अशी आश्वासनं दिली.

यादरम्यान वायएसआर काँग्रेस पक्षाचा मुख्य भर एससी, एसटी आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यावर होता. हे ध्येय देखील साध्य झालं. जगन यांना या तीन समुदायांकडून खूप पाठिंबा मिळाल्याचं नंतर निकालांवरून दिसून आलं. 

आपल्या दिवंगत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जगन मोहन रेड्डी यांनी यावेळी आपल्या पदयात्रेत आंध्र प्रदेशातील १३ जिल्ह्यांचा दौरा केला आणि १७५ पैकी १३६ विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचून लोकांशी संपर्क साधला.

नोव्हेंबर २०१७ पासून जगन दररोज १५ ते ३० कि.मी. चालायचे. लोकांशी हस्तांदोलन केलं आणि वाटेत भेटलेल्या प्रत्येकाशी संवाद साधला. दर शुक्रवारी ते हैदराबादला परत यायचे आणि सीबीआय कोर्टातील खटल्याच्या सुनावणीला हजर राहायचे.

पदयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात, २५ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम विमानतळावरील रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने त्यांच्यावर छोट्या चाकूने हल्ला केला होता. त्यात जगन यांना मार लागला होता.

या पदयात्रेत त्यांनी जवळपास २ कोटी लोकांशी यावेळी त्यांनी थेट संवाद साधला, ज्यात त्यांनी टीडीपी राजवटीचं अपयश लोकांसमोर आणलं.

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी आश्वासन दिलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश, आंध्र प्रदेशला विशेष श्रेणी दर्जा मिळवून देण्यासाठी लढण्यात आलेलं अपयश, प्रलंबित डीडब्ल्यूसीआरए कर्ज आणि गृहनिर्माण योजना अशा मुद्यांवर भाष्य केलं. 

जानेवारी २०१९ मध्ये श्रीकाकुलम जिल्ह्यातील इचापुरम इथे एका भव्य जाहीर सभेने या पदयात्रेचा समारोप झाला. 

या यात्रेचा परिणाम हवा तसाच झाला…

२०१९ च्या निवडणुकांचा निकाल आला तेव्हा रेड्डी यांच्या पक्षाने केवळ विधानसभेतच नाही तर लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली होती. विशेष म्हणजे रेड्डी यांनी ही निवडणूक कोणत्याही आघाडीशिवाय स्वबळावर लढवली.

आंध्र प्रदेशातून विधानसभेच्या १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेस १५१ आणि टीडीपी २४ जागांवर पुढे होते. राज्यातून लोकसभेच्या २५ जागांवर वायएसआर काँग्रेसचे उमेदवार २२, टीडीपीचे उमेदवार केवळ ३ जागांवर आघाडीवर होते. 

जगन यांचं १० वर्षांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी या पदयात्रेमुळेच मदत झाली.

अशा दणदणीत विजयाचं आणि जगन यांचं १० वर्षांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होण्याचं श्रेय केवळ ‘पदयात्रे’ला जातं.

याच धर्तीवर आता प्रशांत किशोर देखील पदयात्रा काढत आहेत. विशेष म्हणजे जगन मोहन रेड्डी यांची  पदयात्रा देखील प्रशांत किशोर यांच्या निवडणूक रणनीतीचा भाग होती. 

तेव्हा याच रणनीतीने आता प्रशांत किशोर पुढे काय करणार, हे बघणं गरजेचं आहे… 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.