प्रशांत किशोर आता ममतांच्या भवानीपूरचे मतदार झालेत… यामागे पण काही प्लॅन आहे का?

मूळचे बिहारचे असलेले निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर आता अधिकृतरित्या पश्चिम बंगालचे मतदार झाले आहेत. ते देखील भवानीपूर विधानसभा मतदारसंघ – १५९ या मतदारसंघातील. आता या मतदारसंघाची अजून उलगडून ओळख सांगायची झाली तर याच मतदारसंघातून सध्या ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीला उभ्या आहेत. म्हणजेच प्रशांत किशोर आता दीदींच्या मतदारसंघातील मतदार झाले आहेत.

३० सप्टेंबरला या ठिकाणी मतदान होणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हि निवडणूक जिंकणे अत्यावश्यक आहे. कारण जर त्या इथून निवडणूक हरल्या तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळेच प्रत्यक्ष मतदारसंघात येऊन प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करत असल्याचं सांगितले जात आहे.

मात्र यापलीकडे जाऊन देखील प्रशांत किशोर, ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात काही वेगळा प्लॅन आहे का?

तर नक्कीच असणार आहे. पहिला अंदाज तर असा वर्तवला जात आहे कि प्रशांत किशोर यांना तृणमूलकडून काही नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे का? या अंदाजाचे कारण म्हणजे प्रशांत किशोर यांनी या आधीच जाहीर केलयं कि काही दिवसांसाठी ते निवडणूक रणनीतीपासून म्हणजेच आपल्या पारंपरिक कामांपासून लांब राहणार आहेत.

पुढच्या वर्षीच्या मार्च २०२२ पर्यंत प्रशांत किशोर कोणतीही नवीन असाइनमेंट घेणार नाहीत. याचा स्पष्ट अर्थ म्हणजे उत्तरप्रदेशसह आगामी ५ राज्यांमधील निवडणुकांमध्ये ते सहभागी नसणार आहेत. पण या मोठ्या सुट्टीनंतर काय? हा प्रश्न उरतोच. त्यामुळे किशोर यांना पुढच्या काळात तृणमूलकडून नवीन जबाबदारी मिळणार असल्याचा अंदाज आहे.

प्रशांत किशोर यांनी अलीकडेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हा अमरिंदरसिंग पंजाबचे मुख्यमंत्री होते.

त्यानंतर काही दिवसांपूर्वीच किशोर यांनी राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती. २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये कमलनाथ, मल्लिकार्जुन खर्गे, आनंद शर्मा, अजय माकन, केसी वेणुगोपाल, अंबिका सोनी यांच्यासारखे काँग्रेसचे मोठे नेते सहभागी झाले होते. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता बंगालच्या मतदार यादीत नाव गेल्याने आणखी वेगळी समीकरण चर्चेत आली आहेत.

याबाबत जाणकार आपली निरीक्षण सांगताना म्हणतात,

२ गोष्टी तरी फिक्स आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर यांची राजकीय महत्वाकांक्षा आता स्पष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महत्वकांक्षेसाठी ते भाजपविरोधी लॉबीमध्ये जागा शोधत आहे. यासाठी ते कधी राहुल गांधी, कधी शरद पवार तर कधी ममता बनर्जी यांना भेटतात.

बंगालच्या निवडणुकीदरम्यान ते ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत आणि सध्या विरोधी पक्षाचा सर्वात मोठा चेहरा देखील ममता दीदीच आहेत. अशात आता त्यांच्याच मतदारसंघात नाव नोंदवण्यामुळे ते तृणमूलच्या जवळ गेले आहेत हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे आगामी काळात ते तृणमूलकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. कारण राज्यसभेवर जाण्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचं असते.

प्रशांत किशोर यांनी याआधी तृणमूलची राज्यसभेची ऑफर नाकारली आहे…

प्रशांत किशोर मागच्या विधानसभा निवडणुकीपासून तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम बघत आहेत. त्यामुळे मागच्या वर्षी देखील फेब्रुवारी २०२० मध्ये किशोर यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेची ऑफर दिली गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र रिपब्लीकवर्ल्ड.कॉम यांनी दिलेल्या बातमीनुसार किशोर यांनी हि ऑफर नम्रपणे नाकारली होती. किशोर यांनी त्यासाठी आपल्याला संसदीय राजकारणापासून आणखी काही दिवस लांब राहायचं असल्याचं सांगितले होते.

मात्र प्रशांतर किशोर यांच्या मतदारसंघातील नाव नोंदणीमुळे पुन्हा एकदा ते राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चाना सुरुवात झाली आहे. ते आता राज्यसभेवर जाणार का आणि गेले तर कधी याच उत्तर मात्र येणाऱ्या काळात मिळेल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.