ज्या ‘प्रश्नमने’ ठाकरेंचा नंबर काढला आहे, त्यांनीच मोदींना पंतप्रधान होण्याचा विश्वास दिला होता…

काल महाविकास आघाडीसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आली, यात पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता अगदी शिखरावर असलेली बघायला मिळाली. देशातील जवळपास १३ राज्यांमधून उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

सर्वेक्षण करणाऱ्या ‘प्रश्नम’ या संस्थेने आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

आता सगळे हे निष्कर्ष वाचून एकीकडे शिवसेना आणि महाविकास आनंद साजरा करत आहेत, तर त्याचवेळी एका भिडूच्या डोक्यात लाईट चमकली, आणि त्यानं आम्हाला मेसेज केला. हे ‘प्रश्नम’ काय आहे ते जरा सविस्तर खोलून सांगा, यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ असं सगळं डिटेलमध्ये सांगा.

झालं, आम्हाला आमच्या आवडीचं काम मिळालं. रिसर्च करून माहिती मिळवली आणि आता ती तुमच्या पुढे मांडत आहे.

तर सगळ्यात आधी ‘प्रश्नम’ काय आहे इथपासून सुरुवात करू…

तर ‘प्रश्नम’ ही एक टेक्नोलॉजी आंत्रप्रन्योर असलेले राजेश जैन यांची मार्केट रिसर्च एजन्सी आहे. ज्याची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली होती. या माध्यमातून सर्व्हेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात असतो. देशात अलीकडील काळात जे काही गाजलेले सर्वे आणि त्याच्या बातम्या झाल्या होत्या त्यातील अनेक सर्वे हे प्रश्नमकडूनच करण्यात आले होते.

‘प्रश्नमकडून करण्यात आलेले चर्चेतील सर्वे’ 

यात काही सर्वेंची नाव सांगायची झाली तर, सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या हा निवडणूक काळातील राजकीय प्रचाराचा मुद्दा बनवला जावा का? कुंभमेळा आयोजित करण्याचा निर्णय योग्य होता का? कोरोना काळात ऑनलाईन क्लासचा लाभ किती मुलांना झाला? असे काही चर्चेत आलेले सर्वे प्रश्नम कडून करण्यात आले होते.

‘प्रश्नमकडून करण्यात आलेले राजकीय सर्वे’ 

सोबतच राजकीय सर्वेंबाबत सांगायचं झालं तर मागच्या महिन्यात या संस्थेनं सर्वेक्षण केलेला विषय होता तो म्हणजे पुढचे पंतप्रधान कोण असावे? यात नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ३२ टक्के मत मिळालं होतं. सोबतच पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावं यावर देखील प्रश्नम कडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यात सार्वधिक ६३ टक्के मत ममता बॅनर्जी यांना मिळाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमधील सर्वे :

तर अलीकडीलच ताजा सर्वे म्हणजे देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत करण्यात आलेला. यात मग सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? यात उद्धव ठाकरे यांना पसंती मिळाली. तर न आवडणारे मुख्यमंत्री कोण? यात पहिल्या नंबरला पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं नाव येत.

या सर्व्हेसाठी प्रश्नमने देशातील १३ राज्य निवडली होती. यात हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. या १३ राज्यांमध्ये मिळून एकूण १७ हजार ५०० जणांनी आपले मत नोंदवलं आहे. त्यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले.

आता हा झाला कंपनीचा सगळा वर्तमान. मात्र भिडूनों, भूतकाळ देखील जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला बरंच पाठीमागे जावं लागत. सोबतच त्यासाठी आधी ‘प्रश्नम’चे संस्थापक राजेश जैन यांच्याबद्दल देखील जाणून घेणं गरजेचं आहे.

कोण आहेत राजेश जैन?

संस्थापक राजेश जैन यांच्याविषयी माहिती सांगायची झाली, तर त्यांचं १९८८ साली बॉम्बे आयआयटी मधून बी.टेकच शिक्षण पूर्ण झालयं. त्यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून एम.एस. पूर्ण केलं. पुढे १९९२ पर्यंत NYNEX या अमेरिकन संस्थेसाठी काम करून ते उद्योजक होण्यासाठी भारतात परतले.

या नंतरच्या काळात राजेश यांनी भारतात टेक्नॉलॉजीमध्ये बरच काम केलं. त्यांनी १९९५ साली भारतातील पहिले इंटरनेट पोर्टल लॉन्च केलं होतं. सत्यम इन्फोव्हेस म्हणून कंपनी सुरु केली. इथून त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. १९९९ पर्यंत या कंपनीची मार्केट वॅल्यू जवळपास ५०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली होती. 

त्यांच्या कामाची माध्यमांनी सुद्धा दखल घेतली. २००० साली TIME मॅगझीनकडून त्यांची कव्हर स्टोरी करण्यात आली. सोबतच २००७ मध्ये देखील Newsweek कडून राजेश यांच्यावर कव्हर स्टोरी करण्यात आली.

राजेश यांनी आपल्या rajeshjain.com या वेबसाईटवर सांगितलेल्या माहितीप्रमाणे,

२००८ साली राजेश यांनी राजकीय क्षेत्रात इंटरनेट आणि सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचं ठरवलं. यातूनच २००९ साली स्थापना झाली ‘नीती डिजिटल’ची. पुढे ते भाजपच्या जवळ गेले. त्यांनी शहरी मध्यमवर्गीयांचा भाजपाला पाठिंबा मिळावा यासाठी फ्रेंड्स ऑफ बीजेपी या ग्रुपची स्थापना केली.

तर २०१० मध्ये राजेश यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले कि, २०१४ मध्ये तुम्हाला देशाचं पंतप्रधान बनवण्यासाठी काम करायला मला आवडेल. मोदींनी देखील राजेश यांना या कामासाठी होकार दिला.

राजेश यांनी आपल्या ब्लॉगवर त्याच वेळी एक लेख लिहिला, ज्याचं टायटल होतं,

 “Project 275 for 2014”

यात त्यांनी भाजप कसा स्वतःच्या बळावर २०१४ च्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळवू शकतो या बद्दल अभ्यासपूर्ण मत मांडलं. थोडक्यात त्यांनी मोदींना तुम्ही पंतप्रधान नक्की होऊ शकता याबद्दलचा विश्वास दिला. त्यानंतर त्यांनी १०० जणांना घेऊन माध्यम, डाटा आणि टेक्नॉलॉजी या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या कॅम्पनिंग करण्यासाठी नीती डिजिटलची स्थापना केली.

याच नीती डिजिटलच काम सुरु असताना राजेश जैन हे अनेक सर्वे करायचे. यातूनच त्यांना २०१२ साली ‘प्रश्नम’ची कल्पना सुचली. २०१४ मध्ये प्रश्नमने गती घेतली. उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये प्रश्नम कडून मतदारांचे निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर सर्वे करण्यात आले.

२०१४ च्या निवडणुकीनंतर प्रश्नमने देशातील विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर सर्वेक्षण करण्याचं काम सुरु केलं. ते अजूनही चालू आहे.

प्रश्नम डाटा कसा गोळा करते?

राजेश जैन यांच्या मते, सर्वेक्षणामध्ये स्वभाव ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि लोकसंख्या स्वभावाच प्रतिनिधित्व करते. जर लोकसंख्याशास्त्रानुसार वेगवेगळ्या आणि प्रमुख लोकांचं मत जाणून घेतलं, यात मग काही ग्रामीण भागातील, काही शहरी भागातील, स्त्री आणि पुरुष अशा लोकांच मत जाणून घेतलं जातं.

जर वेगवेगळ्या भागातील लोकांचं मत असेल तर १००० लोकांचं मत देखील अंदाज लावण्यासाठी, काही निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसं असतं. जैन यांचं एक वाक्य बरंच आवडीचं आहे. ते म्हणजे,

“Our basic idea is that we want to transform surveys”

ते म्हणतात, जे गुगल माहितीच्या बाबतीत करतात तेच आम्हाला लोकांच्या मतांच्या बाबतीत करायचं आहे. त्यानंतरच्या काळात प्रश्नमकडून टेलिफोनिक सर्वे सुरु करण्यात आले. ज्याच्या सध्याच्या लॉकडाऊन काळात प्रश्नमला बराच फायदा झाला…

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.