ओरिसाचा मोदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्यावर दंगलीचे आरोप आहेत.

काल राष्ट्रपती भवनात मोदी सरकार २.०ची शपथविधी झाली. हजारो लोक हा सोहळा पाहण्यासाठी हजर होते. शिवाय देशभरातली करोडो जनता टीव्हीवर या भारतातल्या सर्वात दिग्गज नेत्यांची मंत्रीपदासाठीची शपथविधी पहात होते. मंत्री होणे हे कोणाहीसाठी आयुष्यातली सर्वात मोठी घटना असते. त्यामुळे प्रत्येकजण खास पोशाख घालून आलेला होता. या थाटामाटात बसलेल्या मंत्र्यांच्या मांदियाळीत एका साधा कुर्ता, वाढलेली दाढी खरोखर सर्व त्याग केलेला फकीर असावा असे वाटणाऱ्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधले.

त्यांच नाव प्रतापचंद्र सारंगी. ओरिसाच्या बालासोर मतदारसंघाचे खासदार. जेव्हा ते स्टेजवर शपथविधी साठी आले तेव्हा पंतप्रधानांच्यासाठी जेव्हढ्या टाळ्या वाजल्या होत्या तेवढ्याच जोरदार टाळ्यांचा गजर झाला. 

त्यांच्या बद्दल अनेकांना कालपर्यंत कोणाला ठाऊक नव्हते पण आज त्यांना संपूर्ण देशात दुसरा मोदी असे म्हणत आहेत. त्यांच्या साधेपणाची चर्चा पूर्ण देशभर सुरु आहे.  ते अजूनही एका छोट्याशा झोपडीत राहतात, निवडणुकीचा प्रचार ही त्यांनी सायकल वरून केला, कोट्यावधी संपत्ती असणाऱ्या  उमेदवारांचा पराभव त्यांनी केला याच्याबद्दल अभिमानाने मेसेज फिरत आहेत.

पण याच प्रतापचन्द्र सारंगी यांच्याबद्दल सोशल मिडियावरून काही वेगळी माहितीही पुढे येत आहे.

प्रतापचंद्र सारंगी मुळचे बालासोर ओरिसामधल्या एका खेडेगावातले. आर्ट्समध्ये त्यांनी पदवी मिळवलेली. लहानपणापासून धार्मिक विचारांचा पगडा होता. त्यांना संन्यास देखील घ्यायचं होता पण घरात विधवा आई असल्यामुळे त्यांना परवानगी मिळाली नाही. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कामे करण्यास सुरवात केली. गरीब आदिवासी विद्यार्थ्यासाठी शाळा सुरु केल्या. समाजकार्य सुरु केले. लग्न देखील केले नाही.

१९९९साली पूर्ण भारतालाचं नाही तर जगभरात हादरवून टाकणारी एक घटना.घडली. ग्रॅहम स्टेन्स या ख्रिश्चन मिशनरीला आणि त्याच्या दोन लहान मुलांना ओरिसाच्या जंगलात त्यांच्या गाडीसकट जाळून टाकण्यात आले. या घटनेमागे बजरंग दलाचा हात आहे असे आरोप ग्रहम स्टेन्सच्या कुटुंबाने केला. दारासिंग या प्रमुख आरोपी सोबत बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.  त्याकाळात प्रतापचंद्र सारंगी हे बजरंग दलाचे अध्यक्ष होते.

प्रतापचंद्र सारंगी यांच्यावरही आरोप करण्यात आले पण त्यांची चौकशी करण्यात आली नाही. 

बीबीसी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पुढे जाऊन सारंगी यांनी ग्रॅहम स्टेन्स याच्या हत्याकांडाबद्दल दुख्खः व्यक्त केले होते पण ख्रिश्चन मिशनरीजच्या धर्मांतराच्या कामावर टीका ही केली होती व त्याबद्दल उपवास ही पाळला होता.

२००२ साली त्यांना व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना ओरिसा विधानभवनावर हल्ला केल्या प्रकरणी अटक करण्यात आली. आजही त्यांच्यावर १० फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ज्यात दंगल भडकवणे, आपल्या भाषणातून सामजिक तेढ निर्माण करणे, विस्फोटक पदार्थांचा वापर करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातही केला आहे.

समाजमध्यमामधून अनेकांनी आरोप सुरु केला की साधेपणाच्या बुरखा खाली प्रतापचंद्र सारंगी आपला भूतकाळ लपवू पाहात आहेत.

पण सध्या तरी जनता या मताची नाही. प्रतापचंद्र सारंगी यांनी या पूर्वी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. २०१४सालच्या मोदी युगानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला आणि यावेळीही बालासोरच्या जनतेने त्यांच्याच खासदारकीवर शिक्का मारला. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान दिले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.