प्रतापसिंह मोहिते पाटलांना मंत्री करून गोपीनाथरावांनी दाखवून दिलं शब्दाला किती किंमत असते.. 

शब्दाला पक्के असणारे खूप कमी राजकारणी आपल्याकडे होते. त्यापैकी एक म्हणजे स्व. गोपीनाथराव मुंडे. असेच एक दूसरे नेते होते ते म्हणजे प्रतापसिंह मोहिते. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शब्द दिला होता.

हा किस्सा आहे प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मंत्रीपदाचा. आठवलं तसं या सदरात जयप्रकाश अभंगे यांनी हा किस्सा मांडला होता. 

डिसेंबर १९९७ साली एकहाती बहुमत असताना देखील कॉंग्रेसचे युन्नूसभाई शेख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून पराभूत झाले तर भाजपचे सुभाष देशमुख निवडून आले. सोलापूर जिल्ह्यासाठी हा एक चमत्कार होता.

मात्र कॉंग्रेस पक्षाने या निवडणूकीच्या पराभवाचं खापर प्रतापसिंह मोहिते पाटलांवर फोडलं. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीनानाथ कमळे गुरूजी यांनी प्रतापसिंह मोहिते पाटलांना यासाठी जबाबदार धरले. 

कॉंग्रेस पक्षात असताना प्रतापसिंह मोहिते पाटलांची कुचंबना करण्याचे धोरण आखण्यात येत होतं. तर दूसरीकडे राज्यात युतीचे शासन असल्याने कामांमध्ये देखील आडकाठी करण्यात येत होती.

यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पक्षात जाण्याचा विचार त्यांनी केला. 

१९९८ सालच्या जानेवारी महिन्यात प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांची पुण्यात भेट घेतली. भाजपला देखील माधव पॅटर्नच्या पुढे जावून पश्चिम महाराष्ट्रातून मराठा नेत्यांची मोट बांधून कॉंग्रेसला शह द्यायचा होता. त्यासाठी युतीच्या सत्तेत अपक्षांचा प्रयोग मार्गी देखील लागला होता.

मात्र मातब्बर नेता आपल्या पक्षात असणं ही मुंडे यांच्यासमोर पक्षवाढीसाठी चांगली संधी होती. याच काळात बीडमधून लोकसभेसाठी उभा असलेल्या जयसिंहराव गायकवाड यांच्याकडचे सहकार राज्यमंत्रीपद व जन्ननाथ पाटील यांच्याकडे असलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्रतापसिंह मोहिते पाटील यांना देण्याचा शब्द मुंडे यांनी या बैठकीत दिला. 

दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपचे सोलापूरचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांनी देखील या प्रस्तावास पाठिंबा दिला. मात्र पुढे लोकसभेचा निकाल लागला तेव्हा १९९६ साली विजयी झालेले वल्याळ सुशिलकुमार शिंदे यांच्यासमोर पडले. 

आत्ता खुद्द वल्याळ यांच्याच राजकीय पुर्नवसनाचा प्रश्न भाजपसमोर उभा राहिला. त्यासाठी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी लिंगराज वल्याळ यांनाच सहकार राज्यमंत्रीपद द्यावे असा प्रस्ताव सोलापूर भाजपच्या वल्याळ समर्थक शिष्टमंडळाने मुंडे यांच्यासमोर केला. 

दूसरीकडे प्रमोद महाजन देखील वल्याळ यांनाच मंत्रीपद देण्यात यावे या पुरस्काराचे होते. वल्याळ यांच्या या हालचालीमुळे दूसरीकडे प्रतापसिंह मोहिते पाटलांचे समर्थक अस्वस्थ झाले. मुंडे आत्ता प्रतापसिंह मोहिते पाटलांना दिलेला शब्द पाळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

प्रतापसिंह मोहिते पाटील जेव्हा मुंडे यांना भेटले तेव्हा मुंडे म्हणाले, 

दिलेला शब्द मी कधीच बदलत नसतो, तुम्ही निर्धास्त रहा..

दूसरीकडे भाजपच्या सर्व गोटातून लिंगराज वल्याळ यांनाच मंत्रीपद देण्यात यावं असा दबाव गोपीनाथ मुंडे यांच्यावर येत होता. तरिही मुंडे यांनी प्रतापसिंह मोहिते पाटलांना  सहकार राज्य मंत्रीपद व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवून दिलेला शब्द पाळला. दूसरीकडे वल्याळ यांना पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे देवून त्यांची नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला. 

मुंडे सोबतच्या पहिल्या भेटीत राज्यमंत्रीपद देण्यात येत असेल तर आपण देखील भाजपमध्ये प्रवेश करु असा शब्द प्रतापसिंह मोेहिते पाटील यांनी मुंडेना दिला होता. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आत्ता प्रतापसिंह मोहिते पाटलांची मनधरणी केली.

वेगवेगळ्या संधी त्यांना देण्यात येतील असा शब्द देण्यात येवू लागला. मात्र मुंडेना दिलेला शब्द पाळण्याची वेळ आत्ता प्रतापसिंह मोहिते पाटलांची होती. त्यांनी देखील आपला शब्द पाळला व ते १४ जानेवारी १९९८ रोजी भाजपमध्ये प्रवेश करत सहकार राज्यमंत्री व पालकमंत्री झाले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.