ब्रेकअपच्या शॉटमध्ये नोकरी सोडली. २ वर्षे घरात बसून काढली, आज नेटफ्लिक्सची सिरीज करतोय.

ग्रॅज्युएशन झाल्यावर 15-20 हजाराची नोकरी करत असताना नेमकी ती म्हणाली तुला फिल्म्स मधलं काही कळतं का? फिल्म्स बघायची एक पद्धत असते. टेक्निकल गोष्टी वगैरे वगैरे लेक्चर झाडायला सुरुवात झाली. तासभर फुकट लेक्चर ऐकून डोक्याची भजी झालेली. ब्रेक अप झालं आणि त्याच शॉट मध्ये जॉब सोडला.

पुढे काय कसं काहीच माहीत नव्हतं. आमच्या सोसायटीत राहणारे मित्राचे वडील आर्ट डिरेक्टर होते. त्यांच्याकडे 2-3 महिने लकडा लावला. सेटवर न्या सेटवर न्या म्हणून. माझी दया येऊन किंवा मला वैतागून म्हणा ते घेऊन गेले. मराठी सिरियलचा सेट होता. एकूण काम कसं चालतं हे बघत होतो. मला कंटाळा आला. रोज 12-14 तास सेटवर म्हणजे राडाच. परत घरी मोकळाच होतो त्या काळात अधून मधून कुठे कोणी भेटून काम मिळवता येईल का हे शोधायचं सुरूच होतं.

पुन्हा मित्राच्या वडिलांचा फोन आला की एक फिल्म आहे चल तिकडे. महिन्याभरात ती फिल्म संपली. तोंड ओळख व्हायला सुरुवात झालेली या क्षेत्राशी. मला फार काही आवडत होतं अशातला भाग नव्हता.

असंच एकदा ट्रेकिंग करताना मंदार भेटला. गप्पा मारता मारता समजलं की तो पण असिस्टंट आर्ट डिरेक्टरच आहे. मग गप्पा रंगत गेल्या. त्यातून तो म्हणाला की की बेसिक सॉफ्टवेअर शिकून घे जे कामाला येतात. म्हणजे कोरल फोटोशॉप इलस्ट्रेटर जमल्यास 3d. म्हटलं ठिकाय. ट्रेक वरून घरी गेल्यावर तडक हे सॉफ्टवेअर शिकायचं कुठे हे शोधायला लागलो एक दोन इन्स्टिट्यूट मध्ये फी ऐकून भिरभिरलो.शोधता शोधता माफक आणि परवडणारी फी असलेल्या ठिकाणी जाऊन सॉफ्टवेअर्स शिकलो. आणि परत मंदार ला कॉल केला की

“सॉफ्टवेअर शिकलोय काही करण्यासारखं असेल तर सांग मी करीन.”

जॉब सोडल्यापासून ते सॉफ्टवेअर शिकून होईपर्यंतचा काळ हा जवळजवळ 2 वर्षे होता. इगोने सोडलेली नोकरी. घरच्यांच्या शिव्या तर रोजच झालेल्या. मध्यमवर्ग त्यात कमावणारे वडीलच. मी हा असला निर्णय घेतलेला. 2 वर्ष कमाई जवळ जवळ 0. कोडगा झालो होतो. या शिव्यांनी पक्क होत गेलं की आता हेच करायचं.

काही दिवसांनी मंदारचा कॉल आला की एक काम आहे करशील मी रिकामाच होतो. म्हटलं हो. सेट बनवणं सुरू होत होतं त्यात डिझाईन्स आणि प्रिंट्स करू लागलो. चित्रकला आणि रंगसंगती या गोष्टी येत असल्या की या गोष्टी सोप्प्या होतात. शाळेत चित्रकला आवडीने केल्याचा परिणाम.  पुढे मग कामातून काम येत गेलं. हेच करायचं म्हणून करत राहिलो काम आवडत होतं. काम काम वाटत नाही आता.

आर्ट डिरेक्शन करता करता प्रोडक्शन डिझाईन हा प्रकार समजला. आपल्याकडे अजूनही प्रोडक्शन डिझाइनर आणि आर्ट डिरेक्टर म्हणजे एकच असं समजतात. प्रोडक्शन डिझाईनर च्या देखरेखीखाली आर्ट डिरेक्टशन मेकअप आणि कॉस्च्युम असे तीन भाग येतात. आणि vfx सुद्धा. प्रोडक्शन डिझायनरच काम म्हणजे फिल्मचा look and feel ठरवणे. फिल्मची रंगसंगती ( कलर पॅलेट ) ठरवणे. फिल्मचा मूड सेट करणे. या सगळ्या गोष्टी आर्ट मेकअप आणि कॉस्च्युम या टीमला समजावणे आणि फिल्मला अपेक्षित लुक आणणे. कलर पॅलेट कटाक्षाने पाळली गेली तर फिल्म पडद्यावर दिसताना अपेक्षित परिणाम साधते. ( शेप ऑफ वॉटर , ब्लॅक पँथर बघा. बाजीराव मस्तानी बघा. )

आर्ट डिरेक्शन करताना प्रोडक्शन डिझायनर कडून आलेल्या सेटच्या डिझाईन्स आणि रंग संगती नुसार सेट्स उभारणे. कॉस्च्युम करताना सुद्धा पॅलेटनुसारच रंग असणे आणि मेकअप सुद्धा त्या पॅलेट आणि पात्राशी मेळ खाता असला पाहिजे. तर आणि तरच पडद्यावर या गोष्टी अपेक्षित परिणाम साधतात.

एव्हाना 40 हुन अधिक जाहिराती केल्या ज्या तुम्ही टीव्हीवर पाहता. अगदी आयोडेक्स पासून केएफसी पर्यंत सगळ्या. दोन तीन हिंदी फिल्म्स केल्या. एक झुआन झ्यान्ग म्हणून मंडेरीन फिल्मसाठी अगदी छोटं काम केलं ती फिल्म 2016 साठी चीनकडून ऑस्करसाठी पाठवली गेली होती. आता नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजसाठी काम करतोय. 

काम शिकतोय अजूनही. चुका करत. ओरडा खात. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. थोडक्यात काय तर चिकटून राहिलोय आणि मन लावून आवडीचं काम करतोय. येत्या काळात काय होतंय बघुया.

तुम्हाला पण आवड असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल कोडगेपणा अंगात असेल तर इथं तुम्ही नेटाने खिंड लढवू शकता.

  • भिडू प्रथमेश पाटील

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Mohnish says

    कोणाची कहानी आहे जरा नाव कळले

Leave A Reply

Your email address will not be published.