प्रतिभाताई पाटील इंदिरा गांधीच्या घरी धुणीभांडी करायच्या, खरे आहे का?

काही वर्षांपूर्वी राजस्थान कॉंग्रेसचे एक नेताजी अमीन खान हे कार्यकर्त्यांचं शिबीर घेत होते. कार्यकर्त्यांनी कसे कष्ट घेतले पाहिजेत याबद्दल ज्ञान देता देता त्यांनी एक उदाहरण सांगितलं,

” राष्ट्रपति प्रतिभा पाटिल किसी जमाने में पूर्व प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी के घर में रसोई संभालती थीं। इसी वफादारी के नतीजे में सोनिया गांधी ने उन्हें राष्ट्रपति बना दिया। “

आता थेट कॉंग्रेसच्याच मंत्रीमहोदयांनी केलेल्या या टिपण्णीमुळे देशभर चर्चा तर होणारच. झालंही तसच. विरोधीपक्ष नेत्यांना हवीच असलेली कॉन्ट्राव्हर्सी आयतीच मिळाली. प्रचंड टीका झाली. इंदिरा गांधी आपल्या कार्यकर्त्यांना अशाच वागवत होत्या काय असे प्रश्न विचारण्यात आले. कॉंग्रेसने या नेत्याला तत्काळ घरी बसवले. कसा तरी हा वाद मिटवण्यात आला.

मग लोकांच्या मनात शंका येतच राहते की प्रतिभाताई पाटील खरच इंदिरा गांधींचे स्वैपाकघर सांभाळत होत्या का?

व्हाॅटसअप विद्यापीठाचे पदवीधर तर प्रतिभाताई पाटील या इंदिरागांधीच्या घरात धुणीभांडी करायच्या अस छातीठोकपणे सांगतात. मग खरं काय समजायचं?

प्रतिभाताई पाटील यांचा जन्म खानदेश मधल्या जळगावचा. वडील नारायणराव उर्फ नानासाहेब पाटील हे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ. घरची परिस्थिती संपन्न. प्रतिभाताई पाच भावांची एकुलती एक लाडकी बहीण. त्यांचे बरेचसे बालपण बोदवड तालुक्यातील नाडगाव या लहानशा खेडेगावी गेले.

त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व महाविद्यालयीन शिक्षण जळगाव येथे झाले. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी सन 1962 मध्ये पुणे विद्यापीठाची एम. ए. ही पदवी संपादन केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

त्यांनी एकदा चाळीसगाव येथील क्षत्रिय महासभेच्या महिला मेळाव्यामध्ये अभ्यासपूर्ण भाषण केले.

त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले तत्कालीन आमदार सोनूसिंह अण्णा पाटील व भानुप्रतापसिंह हे दोघेही अत्यंत प्रभावित झाले. तेव्हा त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा आग्रह करण्यात आला. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ताईंना जळगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी दिली. त्या 1962 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या.

वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्या पहिल्यांदा आमदार झाल्या.

तिथून पुढे त्यांनां राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही मागे वळून पहावे लागले नाही. सलग पाच वेळा त्यांनी आमदारकीचा विजय मिळवला. १९६७ साली त्यानां पहिल्यांदाच वसंतराव नाईक यांनी राज्यमंत्री बनण्याची संधी दिली. पुढे लवकरच कॅबिनेटमंत्रीपदी त्यांची बढती झाली. सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, दारुबंदी, संसदीय कार्य, समाजकल्याण, गृहनिर्माण, नगरविकास, शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अशा विविध विभागाच्या मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.

१९७७ साली भारतात प्रचंड मोठी उलथापालथ झाली.

इंदिरा गांधीनी लादलेली आणिबाणी अचानक मागे घेतली. देशभर त्यांच्याविरुद्ध जनमत बनले होते. आणीबाणीच्या काळात झालेली दडपशाही यास सर्वस्वी इंदिरा गांधी जबाबदार आहेत असेच अनेकांचं मत बनलं होतं. विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध देशभर रान उठवळ होतं.

त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसून आला. स्वतः इंदिरा गांधींसकट कॉंग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला होता. जनतापक्षाच्या मोरारजींच्या रुपात भारताला पहिल्यांदाच एक बिगर काँग्रेसी पंतप्रधान मिळाला होता.

काही दिवसांपूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या इंदिराजीनां दिल्लीमध्ये राहण्यासाठी घर देखील शोधावे लागले. त्यांचे अनेक सहकारी सोडून गेले. कॉंग्रेसचे अनेक तुकडे झाले. जनता सरकारने इंदिरा गांधींनां अटक देखील केली. या अटकेविरुद्ध जनतेमध्ये नाराजी पसरली. मोरारजी देसाईंच सरकार बदल्याच राजकारण करत आहे असा मतप्रवाह बनण्यास सुरवात झाली.

कॉंग्रेसमध्ये जे काही उरले सुरले नेते होते त्यांनी दिल्लीमध्ये निदर्शने करण्यास सुरवात केली. यात आघाडीवर होत्या महाराष्ट्रातून प्रतिभाताई पाटील.

१९ डिसेंबर १९७७ रोजी म्हणजे त्यांच्या वाढदिवसालाच प्रतिभाताई पाटील यांना अटक झाली. त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आले. या जेलमध्ये त्यांची भेट इंदिराजींशी झाली. तिथे त्यांनी इंदिरा गांधी यांना पटवून दिल की अजूनही देशात असे लोक आहेत ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. या  तुरुंगवासाच्या अंधकारमी काळात इंदिरा गांधींनां त्यांनी कोन्ग्रेस्च पुनरागमन होऊ शकत हा धीर दिला.

पुढे दहाच दिवसांत इंदिरा गांधींची आणि प्रतिभाताई पाटलांची एकत्र सुटका झाली. अडचणीच्या वेळेत प्रतिभा ताई पाटलांनी दिलेली साथ इंदिरा गांधी विसरल्या नाहीत.

पुढे यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्रातील वसंतदादा पाटील, शरद पवार असे अनेक मातब्बर नेते इंदिरा कॉंग्रेसपासून दूर गेले. शंकरराव चव्हाणांनी देखील आपला वेगळा पक्ष काढला. तरीही प्रतिभाताई पाटील यांनी पक्ष बदलला नाही. महाराष्ट्रात जनाधार असलेले काही थोडेसे नेते उरले होते त्यात प्रतिभा ताई पाटील होत्या.

शरद पवारांनी पुलोद प्रयोग केला तेव्हा कॉंग्रेसने प्रतिभाताईंना विरोधी पक्ष नेते पद दिले.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला विरोधीपक्ष नेत्या म्हणून त्यांनी काम पाहिलं. जेव्हा इंदिरा गांधींच पुनरागमन झालं तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न उभा राहिला त्यावेळी त्यांच्यासमोर जी दोन नवे होती त्यात प्रतिभाताई पाटील यांचं देखील नाव आघाडीवर होतं. पण संजय गांधी यांच्या आग्रहामुळे अन्तुलेना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.

आता प्रश्न उरतो की इंदिरा गांधींच्या घरात महाराष्ट्राच्या मंत्रीपदी असणारी प्रतिभाताई पाटलांसारखी मोठी नेता स्वैपाक करायला का जाईल?

या अफवेची सुरवात झाली कारण जेव्हा पंतप्रधानपद गेल्यावर इतर कॉंग्रेस नेते इंदिरा गांधीशी संपर्क तोडत होते त्याकाळात फक्त काहीच नेते मंडळी त्यांच्या घरी जायच्या यात प्रतिभा पाटील यांचा समावेश होता. इंदिरा गांधीच राजकारण संपल म्हणणाऱ्या लोकांचा अंदाज चुकला आणि त्या परत आल्या.

परत पंतप्रधान झाल्यावर इंदिराजींनी आपल्या वाईट काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना जास्त संधी द्यायची हे धोरण स्वीकारलं. 

यातूनच निर्माण झालेल्या द्वेषाच्या भावनेतून कोणीतरी ही स्टोरी बनवली आणि काळाच्या ओघात त्याला मीठमसाला लावून ती कुजबुज त्यांच्या विरोधातल्या लोकांनी पसरवली. यात स्वपक्षीय असंतुष्ट नेत्यांचा देखील समावेश होता.

प्रतिभाताई पाटील यांनी कधीच गांधी घराण्याशी असलेली निष्ठा दडवली नाही. मात्र याचा अर्थ असा नव्हता की त्यांनी आपला स्वाभिमान विकून पदे मिळवली. त्या तेवढ्या क्षमतेच्या होत्या म्हणून त्यांना ही पदे मिळत गेली. एक छोट्या शहरातून आलेली मुलगी राजकारणाच्या दलदलीत आपलं स्थान निर्माण करते याचा अनेकांचा जळफळाट होणे सहाजिक होते.

पण कोणी काहीही म्हणो प्रतिभाताई पाटील या भारताच्या सर्वोच्च पदावर पोहचणार्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांचे हे स्थान कोणीही हिरावू शकणार नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.