तेव्हा पप्पा राज्याचे अर्थमंत्री असून देखील माझ्या शाळेत मुलाखतीसाठी आले.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात करण-अर्जून सिनेमातल्या जोडीप्रमाणे ‘प्रतिक-राज’ जोडी ओळखली जाते. प्रतिक पाटील व राजवर्धन पाटील हे मा. मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव. आज जयंत पाटील यांचा वाढदिवस. प्रतिक पाटील व राजवर्धन पाटील या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांबद्दल लिहलेला हा लेख.

राजवर्धन पाटील लिहतात, 

आज पप्पांचा वाढदिवस. खरं तर पप्पांचा विषय आला तर त्यांच्याबद्दल किती बोलायचं असा प्रश्न पडतो. कारण पप्पा म्हणजे आमच्यासाठी जगातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेत. आमच्यासाठी पप्पा हेच आमचं जग आहे.

मी लहान असताना मला मुंबईतील एका अत्यंत चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता, त्यावेळी पप्पा महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, पण राज्याचे एवढे मोठे नेते असून सुद्धा पप्पा स्वतः माझ्या ऍडमिशनच्या वेळी मुलाखत द्यायला तिथे हजर होते. मी, माझी आई आणि पप्पा असे आम्ही तिघे तिथे होतो. राज्याचे अर्थमंत्री असून सुद्धा त्यांनी स्वतः माझ्यासाठी इंटरव्ह्यूव दिला.

लहानपणापासून माझी फुटबॉलची आवड माझ्यापेक्षा जास्त पप्पांनी जोपासली. शाळेत मला कायम फुटबॉल खेळायला पप्पांनी प्रोत्साहन दिलं, पण विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही माझी मॅच पाहायला आले नव्हते. एकदा दहावीत आमची सगळ्यात महत्त्वाची मॅच होती, पप्पांना ती मॅच पाहायला यायचं होतं पण त्यांनी येऊ नये असंच माझं मत होतं. ते तेव्हा राज्याचे गृहमंत्री होते आणि ते आले तर सगळयांच लक्ष त्यांच्याकडेच राहील, असं मला वाटत होतं.

पण माझे पप्पा ती मॅच पाहायला आले आणि कोणी त्यांना ओळखू नये म्हणून आझादमैदानच्या एका कोपऱ्यात शांतपणे उभे राहून त्यांनी ती संपूर्ण मॅच पाहिली ! माझ्या आयुष्यातील तो महत्वाची मॅच आम्ही जिंकली आणि तोवर तिथल्या लोकांनी पप्पांना ओळ्खल्यामुळे त्यांनी पप्पांच्या हस्तेच आम्हाला बक्षीस दिलं !

२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा पप्पा इस्लामपूरमधून पुन्हा जिंकले तेव्हा आम्ही सर्वजण बापूंच्या पुतळ्याला हार घालायला गेलो होतो. परत येत असताना आमच्या गाडीत एक वयस्कर व्यक्ती बसले होते. तेव्हा मी त्यांना ओळखलं नाही, पण पप्पा त्यांच्याशी खूप आदराने वागत बोलत होते. मी तेव्हा पंधरा – सोळा वर्षांचाच होतो आणि त्यापूर्वी मी त्यांना कधीही भेटलोच नव्हतो म्हणून मी त्यांना ओळखलं नाही. नंतर मी जेव्हा पप्पांना ते कोण होते हे विचारलं, तेव्हा पप्पांनी मला सांगितलं की,  त्यांच्या वडिलांना म्हणजेच राजारामबापूंना ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत हरवलं ते विलासराव शिंदे ते होते !

पप्पांच्या वडिलांना ज्यांनी विधानसभेला हरवलं त्यांना पप्पा स्वतःच्या वडिलांच्या जागी मानून आदर देत होते ! 

पप्पा कितीही मोठ्या पदावर असले तरी ते वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना अत्यंत सन्मान आणि आदराची वागणूक देतात !

माझ्या कॉलेज ऍडमिशन वेळी तर पप्पांनी स्वतः लंडनला येऊन अगदी माझ्या बेडशीट, उशी पुस्तकांपासून सगळ्या गोष्टी घेऊन दिल्या होत्या. कुटुंबाची संपूर्ण काळजी घेणारे असे आमचे पप्पा. 

माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरी केलीच पाहिजे, असा पपांचाच आग्रह होता आणि माझ्या नोकरीचा पहिला पगार हातात आल्यावर आम्ही सगळ्यांनी जाऊन छान पार्टी केली होती. त्यावेळी पप्पांनी माझं खूप कौतुक केलं.

पप्पांबद्दल लिहायला शब्द कमी पडतील इतक्या त्यांच्या आठवणी आहेत.

पप्पांच्या इतकी कष्ट घेणारी व्यक्ती मी पाहिलेली नाही. ते अर्थमंत्री असताना तर ते रात्री अकरा वाजता बजेटच्या तयारीला बसायचे ते पहाटे अगदी पाच – सहा वाजेपर्यंत त्यांचं काम चालायचं. सकाळी उठून पुन्हा कामाला सुरुवात करायचे.  

लहानपणी आमच्या घरात कधीही राजकारणाविषयी चर्चा झाल्याचे मला आठवत नाही. सगळ्यांशी प्रेमाने आणि आपुलकीने पप्पा बोलतात. कधीही कोणाविषयी राग मनात धरत नाहीत. पप्पा कधीही कोणाविषयी त्या व्यक्तीच्या मागून वाईट बोलत नाहीत.

माझ्यासाठी माझे पप्पा एक सर्वगुणसंपन्न अशी व्यक्ती आहेत. ते जगातील सर्वात चांगले वडील आहेत !

Happy Birthday, Pappa !

– राजवर्धन जयंत पाटील


प्रतिक पाटील लिहतात, 

पप्पांना मी लहानपणापासुन बघत आलो ते म्हणजे ते अत्यंत बिझी, लोकांसाठी सतत काम करणारे व्यक्ती म्हणुन. पण कितीही बिझी असले तरी त्यांनी कधी घराकडे दुर्लक्ष केल नाही. शाळेत असताना जवळपास रोज शाळेतून घरी आल्यावर त्यांचा ‘आज शाळेत काय शिकलास?’ असा प्रश्न असायचा. आपली मुल काय नवीन शिकत आहेत, काय नवीन करतायत याकडे त्यांच बारीक लक्ष असतं.

मी आणि राजवर्धन अभ्यासापेक्षा नेहमी खेळण्याकडे अधिक लक्ष द्यायचो, पण खेळाच्या सोबत आम्ही नियमित अभ्यास करत आहोत की नाही, याकडे त्यांच कायम लक्ष असायचं.

मला आठवतंय एकदा मी आठवीत असताना मला सायन्समध्ये मध्ये कमी मार्क पडले होते. त्यावेळी पप्पांनी सगळ्या मिटींग्स बाजूला ठेवून जवळपास 2 तास माझ्यासोबत बसुन मला पिरोयोडिक टेबल शिकवला होता. साहेब मंत्री, प्रदेशाध्यक्ष जरी असले तरी घरी ते खूप साधे आयुष्य जगतात. आमच्या घरात राजकारणाच्यापेक्षा जगात नवीन काय चालू आहे, नवीन पिक्चर, व्यवसाय याच्यावरच अधिक चर्चा होते.

साहेब ज्ञानाला प्रचंड महत्त्व देणारे व्यक्ती आहेत त्यांचं शिक्षण जरी सिव्हिल इंजिनियरिंग झालं असलं तरी ते ज्यावेळी अर्थमंत्री झाले, तेव्हा त्यांनी प्रचंड अभ्यास करून ते खातं समजून घेतलं आणि आज ते त्या विषयात इतके तज्ञ झालेत की लोक त्यांच्याकडे आर्थिक विषयावर मार्गदर्शन घ्यायला येतात.

एकदा आम्ही शाळेत असताना काही गोष्टींवर जवळपास पाचशे रुपये विनाकारण खर्च केले. पप्पांना तो गोष्ट अजिबात आवडली नाही. आपण अनावश्यक गोष्टींवर खर्च नाही केला पाहिजे, असं त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं.

साहेबांचा बंगलोरला ऍक्सीडेन्ट झाला, तेव्हा आम्ही खूपच लहान होतो. पण, त्यावेळी साहेब बेडवर बसून फाईलींवर काम करायचे हे अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यांनी व्हीलचेयरवर बसून बजेट सादर केले होते हे खरे आहे, पण त्याआधी त्यांनी कितीतरी महिने हॉस्पिटलच्या बेडवर बसून सगळा अर्थसंकल्प तयार केला होता.

एखादा विषय माहिती नसेल, तर तो समजून घेणे हा साहेबांचा स्वभाव आहे. नवीन विषय, नवीन जग समजून घेणे हा त्यांचा छंद आहे.

मला साहेबांचा सगळ्यात आवडता गुण म्हणजे त्यांच्यामध्ये प्रचंड पेशन्स आहेत. शक्यतोवर ते कधी चिडत नाहीत आणि चिडले तर बोलून दाखवत नाहीत. आम्ही लहान असताना देखील त्यांनी कधीच आमच्यावर हात उचलला नाही. पण त्यांना एखादी गोष्ट आवडली नसेल तर ते आम्हाला कळतं. आम्हीही कधी कधी मूड पाहून त्यांच्याशी बोलतो. आजपर्यंत आम्ही कधीही त्यांना कोणत्याही प्रेशरखाली येऊन काम केल्याचं पाहिलेलं नाही.

आम्ही कधी सल्ला विचारला तर ते आम्हाला देतात पण आम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे असा त्यांचा कधीच आग्रह नसतो. आम्ही सायन्स मध्येच उच्च शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा होती, पण आम्ही कॉमर्सला जायचं ठरवल्यावर त्यांनी ती आमच्यावर लादली नाही. उलट आम्हाला पाहिजे ते शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं.

साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे त्यांना आता अधिक प्रवास करावा लागतो पण प्रवासात देखील ते आम्ही काय करतोय, कुठे आहोत यावर लक्ष ठेवून असतात.

 साहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सार्वजनिक जीवनात वेळ घालवला पण कधीही कुटुंबाच्या कडे दुर्लक्ष होऊ दिल नाही. लोकांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होण्याला त्यांचं प्राधान्य असतं. लोकांना वेळ देणे हा त्यांचा सर्वात चांगला गुण आहे. त्यांच्याकडून कधीच कोणालाच अपमानास्पद वागणूक दिली जात नाही. साहेब सगळ्यांना आपुलकीने वागवतात त्यात कधी छोटा मोठा हा भेद नसतो. त्याहून महत्वाचे म्हणजे लोकांची त्यांना आवड आहे. लोकांमध्ये ते अधिक रमतात. म्हणूनच आज ते राज्याचे इतके मोठे नेते आहेत.

– प्रतीक जयंत पाटील

हे ही वाच भिडू.