ब्रिटिश सत्तेत या क्रांतिकारकांनी छत्रपतींच्या गडावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला …

सातारा – सांगली जिल्हा म्हणजे शुरवीरांचा जिल्हा. स्वातंत्र्य चळवळीत या जिल्ह्यांतील अनेक वीरांनी आपले जीवन झोकून दिले. धारसना मीठ सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, १९४२ चा चलेजाव लढा , प्रतिसरकारची स्थापना यासारख्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देणारे देशभक्त क्रांतीवीर दादा आप्पाजी बर्डे गुरुजी म्हणजे लोकशिक्षणाची चळवळ रुजविणारे क्रांतिसूर्य.

कुरुंदवाड संस्थानातील वाटेगाव गावामधील शेतकरी कुटुंबात बर्डे यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०८ रोजी झाला. 

त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण काले येथे पूर्ण केले. तर शिक्षक प्रशिक्षण सातारा येथील ट्रेनिंग कॉलेजात घेतले. त्याठिकाणी त्यांच्यावर झालेले संस्कार फार महत्वाचे ठरले. शिक्षकाचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडताच बर्डे गुरुजींना रयत शिक्षण संस्थेत ताबडतोब नोकरी मिळाली. अध्यापकाचे कार्य करत असताना सर्वांना समानतेने वागविण्याचा बाणा त्यांच्या वर्तनात दिसून आला.

बिळाशी (ता. शिराळा) येथे शिक्षक म्हणून अध्यापन करताना बर्डे गुरुजींनी स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकत्र बसवले. स्पृश्य मुलांना एका ओळीत व अस्पृश्य मुलांना दुसऱ्या ओळीत बसविण्याची पध्दत गुरुजींनी मोडीत काढली. कासेगावातील शाळेतही स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकत्र बसवल्यामुळे सनातन्यांनी हल्ला केला.

परंतु गुरुजींनी त्यात बदल केला नाही. पुढे सनातन्यांनी बर्डे गुरुजींची लेखी माफी मागितली.

बर्डे गुरुजी एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला झुंज देत होते, तर दुसरीकडे गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या गुंड आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त करत होते. महात्मा गांधीजींच्या विचारांवर सत्याग्रहाचा आग्रह धरणारे व मस्तवाल दरोडेखोरांची गुंडशाही संपवण्यासाठी हातात शस्त्र घेणारे बर्डे गुरुजी म्हणजे एक अजब रसायन.

पेटलोंड जंगल सत्याग्रह आणि प्रचितगडावर झेंडा 

बर्डे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बर्डे गटाने ठरल्याप्रमाणे लहान – मोठी अशी पाचशे ते सहाशे झाडे तोडली. हि सर्व झाडे ताडीची होती. प्रचितगडावर झेंडाही फडकावला. विशेष म्हणजे या गटाने जाताना तत्कालिन कलेक्टर व डी. सी. पी यांना नोटीस देऊन पेटलोंड जंगल सत्याग्रह व प्रचितगडावर झेंडा फडकावला.

पुढे १९४२ साली असहकार आंदोलन बर्डे गुरुजी यांच्यासमवेत प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांनी ८६ पाटलांचे राजीनामे घेतले. व प्रतिसरकार या भागात स्वतंत्र कारभार करू लागले. शिराळा, वाळवा, मलकापूर, शाहूवाडी, महाल, पाटण याचा काही भाग अशा ५०० ते ६०० गावांचा टापू प्रतिसरकारने व्यापला.

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात गुरूजींना अटक

पेटलोंड सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरच्या लोकांना संबोधित करत असतानाच बर्डे गुरुजींना इंग्रज पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. या खटल्यात गुरुजींना ६ महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली.

एक रायफल, ३८ बोअरचे रिव्हॉल्व्हर आणि इंदिरा गांधींकडून ताम्रपट 

वयाच्या १८, १९ व्या वर्षी महात्मा गांधीजींचे विचार ऐकून स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या बर्डे गुरुजींनी पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले. १९४२ च्या लढ्यात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल ‘कुरुंदवाड’ संस्थानकडून एक रायफल व ३८ बोअरचे एक रिव्हॉल्व्हर बक्षीस गुरुजींना देण्यात आले. त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते गुरुजींचा ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला. या थोर स्वातंत्र्यसैनिकाचा १२ सप्टेंबर हा दिवस म्हणजे स्मृतीदिन.

  • अतुल मुळीक / वाटेगाव

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.