हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांमुळे प्रतिसरकारच्या नागनाथअण्णांना अटक झाली होती.

१९४२ च्या ८ ऑगस्ट ला गांधीजींनी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर एक मंत्र दिला ‘ करा किंवा मरा’! सरकारने दुसऱ्याच दिवशी गांधी-नेहरू-पटेल-आझाद अशा बड्या काँग्रेस नेत्यांना अटक करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण देश मात्र आता पेटला होता.

भारतभर या आंदोलनाचा आगडोंब उसळला. हा शेवटचा निर्वाणीचा लढा आहे आणि एक धक्का दिला तर हे बलाढ्य इंग्रजी राज्य कोसळून पडेल याची लोंकाना खात्री वाटत होती.

पण संख्येने कमी असले तरी काही भारतीय पक्ष-गट मात्र या लढ्यापासून दूर राहिले हे या देशाचे दुर्दैव! बॅ. मोहम्मद अली जीनांची मुस्लिम लीग, गोळवलकरांची RSS तसे वि. दा. सावरकरांची हिंदू महासभा यांनी या चले जावच्या उठावाला पूर्णपणे विरोध केला आणि उलट सरकारला ही चळवळ दडपण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली

पण गांधीजींच्या ‘करा किंवा मरा’ या मंत्राचा खरा अर्थ कळला तो सातारकरांनाच!

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आकार घेणाऱ्या या चळवळीने एक अभूतपूर्व आणि असामान्य असा लढा उभा केला. देशभर चले जावची चळवळ पुढे ओसरू लागली असताना सातारा मात्र धगधगत होता. सातारकरांच्या पत्रीसरकारच्या राज्यातून इंग्रज जवळजवळ हद्दपार झाला होता.

सरकारच्या मुलकी, पोलीस आणि न्यायव्यवस्थेला पर्यायी समांतर अशी तुफानसेना आणि न्यायमंडळे पत्रीसरकारने उभारली होती. अप्पासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतंत्र घटनादेखील होती. इथे अस्पृशत्येला थारा नव्हता. बुवाबाजी थोतांड करणाऱ्यानां वेळीच शिक्षा दिले जाई. जमीनदारी, सावकारी करून शेतकर्यांना छळनाऱ्यानां, इंग्रजांची चापलुसी करणाऱ्यानां वेळीच धडा शिकवला जाई. .

पत्रीसरकारचे राज्य हे स्वातंत्र्यवादी आणि देशभक्त लोकांसाठी सर्वात सुरक्षित आणि अभेद्य असे राज्य होते. महाराष्ट्रातल्या इतर भागातील क्रांतिकारक इथे वेळप्रसंगी आसरा घेत असत.

प्रतिसरकारच्या (Parallel Government) राज्यात सर्वात असुरक्षित जर कोणी असेल तर ते पोलीस आणि त्यांचे बगलबच्चे सावकार, जमीनदार, गावगुंड.

त्यामुळे प्रतिसरकारच्या धाडसी ब्रिटिशविरोधी कारवायांच्या आड येण्याची हिम्मत कुणाचीच नसायची. आणि अशी जर कुणी हिंमत केली तर पुढच्या सात पिढ्या विसरणार नाहीत अशी पत्रीसरकारची विशेष शिक्षा असायची. क्रांतिसिंह नाना पाटील, जी, डी. लाड, नागनाथ अण्णा नायकवडी अशा प्रतिसरकारच्या नेत्यावर सरकारने पकडून देणार्यास बक्षिसे जाहीर केली होती पण त्या बक्षिसांसाठी पत्रीसरकारशी दगाफटका करावयास कुणी धजावयाचा नाही.

पण हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी मात्र ती चूक केली….

वाळव्याचे नागनाथ नायकवडी म्हणजे क्रांतिकारकांचे मुकुटमणी शोभावेत असे कर्तृत्ववान नायक! क्रांतिसिंह नाना पाटलांचे एक सेनापती. इतर भूमिगत क्रांतिकारकांप्रमाणे तेही भूमिगत असायचे आणि त्यांच्या हालचाली गुप्त असायच्या.

प्रतिसरकारची तुफानसेना आणि गुप्तहेरांचे जाळे असल्यामुळे आणि सामान्य जनतेच्या मदतीमुळे अण्णांना पकडणे ही दुर्लभ गोष्ट होती. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या धर्तीवर अण्णांनी आझाद दल हे सशस्त्र दल उभे केले होते.

पण २९ जुलै १९४४ च्या रात्री घात झाला.

त्या रात्री कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी अण्णा वाळव्याच्या कोट भागातील तुकुनाना देसाई यांच्या घरी उतरले होते. त्यांच्यासोबत नारायण जगदाळे, बाबुराव खोत, शामगोंडा पाटील असे कार्यकर्ते होते. अण्णांनी तिथेच मुक्काम केला. त्या रात्री उशिरा ८-१० पोलिसांच्या सशस्त्र तुकडीने त्या घराला गराडा घातला, नागनाथ अण्णा झोपेत असतानाच घरात प्रवेश केला आणि कोणतीही हालचाल करण्याच्या अगोदर सर्वाना अटक केली.

दुसऱ्या दिवशी ही गोष्ट गावात वाऱ्यासारखी पसरली. गाव जागं झालं ते रागानं धुमसतच. पोलिसांनी अण्णांना चावडीजवळ नेले होते तेवढ्यात हजारोंचा जमाव चावडीवर चाल करून जायच्या बेतात होता. पोलिसांनी आणखी कुमक आणून सकाळसकाळी अण्णांना इस्लामपूरला हलवले नसते तर पोलिसांचे मुडदेच पडले असते असा वाळवेकरांचा आवेश होता.

त्याच दिवशी दुपारी वाळव्याच्या पोस्टाच्या पेटीतील पत्रे गोळा करताना पोस्टमन रामभाऊ शिंदे याना डी. एस. पी. सातारा यांचे नावे लिहिलेले एक पत्र सापडले.

वाळवा गावातून डी. एस. पी. ला पत्र कोण लिहीत असेल अशी शंका आल्याने त्यांनी ते पत्र किसन अहिर आणि खंडू शेळके यांच्याकडे आणून दिले. काँग्रेसचे जुने कार्यकर्ते राष्ट्रोद्धारक देशपांडे यांनी त्या पत्रातले अक्षर आणि सही ओळखली. त्यात लिहिलं होतं

‘आपण सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली आहे. मी आपल्याला केव्हा व कुठे भेटावे ते सांगा’ आणि खाली सही होती ‘एस. डब्ल्यू. देशपांडे.’

हे ‘एस. डब्ल्यू. देशपांडे’ म्हणजे वाळव्यातील हिंदू महासभेचे कार्यकर्ते श्री सदाशिव वामन देशपांडे.  बाबुराव देशपांडे नावाच्या आणखी एक हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने पोलिसांना सहकार्य केल्याचे आणि आश्रय दिल्याचे लक्षात आले.

प्रतिसरकारमध्ये देशद्रोहाला अतिशय कडक शासन होते. देशपांडेंच्या पत्रावरुन सगळी हकीकत कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. रामू गोटखिंडे नावाच्या एका गावगुंडाचे, पोलीस आणि देशपांडे यांच्या बरोबरचे संबंध उघड झाले. देशपांडेंच्या सांगण्यावरूनच रामू गोटखिंडेने पोलीस आणले आणि सदाशिव देशपांडे व बाबुराव देशपांडेंनी पोलिसांना आश्रय दिला हेही लक्षात आले.

हा उलगडा होताच किसन अहीर, खंडू शेळके, किसन जाधव, सखाराम घोरपडे यांनी सदाशिव देशपांडेच्या घरी जाऊन त्याला उचलून गावाबाहेर नेले आणि त्याचा उजवा हात आणि डावा पाय तोडला.

पोलिसांनी या सर्वांविरुद्ध वॉरंट काढले पण त्या वॉरंट ला कोणीच जुमानत नव्हते, अख्या साताऱ्यात कुठेही आश्रय घेता येत असे. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुकाराम खोत, हरी कदम, कृष्णा करमाळकर यांनी पोलिसांनी  सोडून येत असलेल्या बाबुराव देशपांडेला पडवळवाडी गावच्या हद्दीत पकडले आणि त्याचाही उजवा हात आणि डावा पाय कलम केला.

त्यानंतर पोलीस संरक्षणात राहिलेल्या रामू गोटखिंडेला भूमिगत कार्यकर्त्यांनी विहिरीत पोहत असताना गोळ्या घालून ठार केले.

वाळवा परिसरात नागनाथअण्णांच्या अटकेनंतरचा राग असा शिगेला पोचलेला होता की डी. वाय. एस. पी. भोसलेंनी अण्णांना आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्याची विनंती केली. आणि नागनाथअण्णांच्या विनंतीनंतरच वाळवा शांत झाला.

हे नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यासारख्या प्रतिसरकारच्या मोठ्या क्रांतिकारकाबरोबरच घडलं अस नाही तर अनेक छोट्या मोठ्या भूमिगत कार्यकर्त्यांचे पत्ते सातारा जिल्ह्यात हिंदू महासभेचे कार्यकर्ते इंग्रज पोलिसांना देताना आढळले. यामध्ये त्यांच्या वरिष्ठपातळीवरून आदेश होता का हे मात्र कुठे स्पष्ट होत नाही पण पत्रीसरकारचे अनेक अभ्यासक हे शक्य असल्याचं सांगतात.

  • रणजीत यादव

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. तुकाराम says

    ते देशपांडेचे ते पत्र कुठे मिळेल भाऊ…वाचायला आवडेल…! इथेच प्रकाशित करा भाऊ.

  2. आकाश पवार says

    हिंदु महासभा आणि rss ने का विरोध केला होता ते लिहायचं पण कष्ट घ्या , त्यावेळी बोस यांची आझाद हिंद सेना मोठी चळवळ उभारणार होती त्याच सगळं क्रेडिट बोस ना जाइल म्हणून गांधींनी हे अचानक action घेतली होती ,
    अर्धा इतिहास लिहू नका लिहायचा असेल तर सगळा लिहा नाहीतर लिहू नका

  3. Vaghesh Salunkhe says

    ‘बोल भिडू’ ने सत्य इतिहास सांगितला आहे. RSS मुळातच स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात होती. त्यामुळे हिंदू महासभा किंवा RSS ने क्रांतिकारकांच्या विरोधात कामे केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.