दरेकर म्हणतात, त्याप्रमाणे सेनेच्या मंत्रिमंडळात उपरे नक्की किती?

सध्या आपल्या महाराष्ट्रात निवडणुकांचा माहोल नसला, तरी राजकीय कलगीतुरा मात्र रंगलाय. सत्ताधारी शिवसेनेचे खासदार असणाऱ्या संजय राऊत यांनी, ‘भारतीय जनता पक्ष हा उपऱ्यांचा  पक्ष झाला आहे’ अशी बोचरी टीका केली. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊत यांना थेट आव्हान दिलंय.

“माझं संजय राऊतांना थेट आव्हान आहे. आपण आपल्या पक्षात असणारी उपऱ्यांची संख्या आणि भाजपमध्ये असलेल्या उपऱ्यांची संख्या याची आकडेवारी जनतेसमोर आणावी. आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांचं वर्चस्व असणारी आहे. अर्ध मंत्रिमंडळ उपऱ्यांचं भरलेलं असताना, व्यापारी प्रवृत्तीला महत्त्व येत असताना भाजपवर उपऱ्यांना घेता असा आरोप करणं किती संयुक्तिक आहे?” असं दरेकर म्हणाले.

आता खरंच शिवसेनेचं मंत्रिमंडळ उपऱ्यांनी भरलंय का? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडणं स्वाभाविक आहे. आम्ही जरा पुढचं पाऊल टाकत या प्रश्नाचं उत्तर शोधलं.

सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे एकूण १३ मंत्री आहेत. यात १० कॅबिनेट मंत्री, तर ३ राज्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री दादाजी भुसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई हे तर मूळचे शिवसैनिक आहेत.

मग दरेकरांचा आक्षेप नक्की कुणावर आहे?

सध्याच्या मंत्रिमंडळातले चार नेते मूळचे शिवसैनिक नाहीत. आता जरा त्यांची माहिती घेऊयात.

१. उदय सामंत, उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोकणचे नेते असणारे उदय सामंत हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. ते २००४ पासून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत सेनेत प्रवेश केला. या मंत्रिमंडळात त्यांना उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

२. शंकरराव गडाख, मृदा आणि जलसंधारण मंत्रालय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र असणारे शंकरराव गडाख, अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातले आमदार आहेत. शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून निवडून आल्यानंतर, त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. गडाख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना सेनेच्या कोट्यातून मृदा आणि जलसंधारण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

३. अब्दुल सत्तार, राज्यमंत्री

सिल्लोडचे आमदार असणारे सत्तार काँग्रेसचे नेते. मात्र त्यांनी डिसेंबर २०१६ मध्ये काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला. २०१९ च्या निवडणुकांवेळी त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि सेनेच्या तिकिटावर ते निवडूनही आले.

४. राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला. त्यांना सेनेनं राज्यमंत्री पद देऊ केलं.

दरेकर यांनी आव्हान देताना उर्मिला मातोंडकर आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचाही उल्लेख केला. मातोंडकर या अभिनेत्री आणि काँग्रेसच्या माजी उमेदवार. त्यांनी २०२० मध्ये सेनेत प्रवेश केला. त्यांना सेनेकडून विधान परिषदेत पाठवलं जाण्याची शक्यता आहे. प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या, त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये शिवबंधन बांधलं. त्या सेनेकडून राज्यसभेच्या खासदार आहेत.

त्यामुळे पाहायला गेलं, तर सेनेच्या मंत्रिमंडळातले १३ पैकी फक्त चारच नेते मूळचे शिवसैनिक नाहीत. आता राऊत दरेकरांचं आव्हान स्विकारतात की नाही? हे येणाऱ्या दिवसांत कळेलच. या सगळ्यात राजकारणातलं इनकमिंग-आऊटगोईंग थांबत नसतंय हे मात्र नक्की!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.