खेळाडू असणाऱ्या महाभारताच्या गदाधारी भीमाला हा रोल मिळण्यामागे लय भारी किस्सा आहे

आपले आई-वडील, आजोबा-आजी यांच्या काळातील जर काही गमतीदार किस्से त्यांच्याकडून ऐकायला बसलो तर एक किस्सा हमखास त्यामध्ये असतो. प्रत्येकाच्या वडिलधाऱ्यांनी तो सांगितलेला असतो. हा किस्सा म्हणजे टीव्हीचा आणि त्यावर तेव्हा येणाऱ्या मालिकांचा. जेव्हा नेमकंच भारतात टेलिव्हिजन सुरु झालं होतं, तेव्हा त्यावर दोन मालिका लागायच्या – रामायण आणि महाभारत.

या मालिकांनी लोकांना इतकं खूळ लागलं होतं की मैलोनमैल, या गावातून त्या गावात जाऊन लोक या मालिका बघायचे. ज्यादिवशी या मालिका लागणार असायच्या तेव्हा अगदी गावं तेवढ्या वेळापुरती ओसाड व्हायची. यातील पात्रांनी लोकांनां अपलासंच तितकं केलं होतं. त्यांच्या अभिनयातील धमक यातून कळायची. लोक त्यांचं अनुकरण करायची.

अशात महाभारतातील एक पात्र असं होतं ज्याने तेव्हा लोकांमध्ये व्यायाम करण्याची, शरीर धष्टपुष्ट करण्याची क्रेझ आणली होती. हे पात्र म्हणजे ‘गदाधारी भीम’. लोक या पत्राचा आदर करायचे आणि त्याच आदराने त्यांच्या सारखं होण्याचा प्रयत्न करायचे. लोकांना त्यांच्या अभियानाचं जाम कौतुक वाटायचं. अशा या पात्राच खऱ्या आयुष्यातील नाव म्हणजे ‘प्रवीण कुमार सोबती’.

लोकांना आश्चर्यात पडणारं हे पात्र नेमकं त्यांना कसं मिळालं? याचा तितकाच मजेशीर किस्सा आहे.

प्रवीण कुमार सोबती यांची उंची साडेसहा फुटांची होती. आणि खऱ्या आयुष्यात ते भारताचे मोठे खेळाडू होते. १९६० आणि १९७० च्या दशकात स्टार भारतीय ऍथलीट म्हणून त्यांनी नाव कमवलं होतं. त्यांच्या उंचीमुळे ते कित्येक वर्ष हैमर थ्रो आणि डिस्कस थ्रोचे खेळाडू राहिले होते. एशियन गेम्स-कॉमनवेल्थ आणि ऑलम्पिक गेम्समध्ये भाग घेऊन त्यांनी अनेक पदकं देशासाठी मिळवून दिली होती. 

या खेळामुळेच प्रवीण कुमार यांना सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) डेप्युटी कमांडंटची नोकरी मिळाली, पण नशिबात वेगळंच लिहिलं होतं.

खेळाडू प्रवीण कुमार यांना बीएसएफची नोकरी मिळाली तेव्हा एक बातमी त्यांच्या कानी पडली. एका दिवशी त्यांच्या एका मित्राने त्यांना फोन केला आणि बोलता बोलता सांगितले की, बीआर चोप्रा ‘महाभारत’ बनवत आहेत आणि भीमाची भूमिका साकारण्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेत आहेत. बीआर चोप्रा अशा माणसाच्या शोधात होते ज्याला अभिनयाचा अनुभव आहे आणि त्याची शरीरयष्टी चांगली आहे. 

आता मित्रांचं आपल्याला माहीतच आहे. प्रोत्साहन देण्यामध्ये मित्रांचा नंबर सर्वात वरती असतो. त्यानुसार प्रवीण यांच्या मित्राने त्यांना या भूमिकेसाठी अर्ज करण्यास सांगितलं. मित्राच्या म्हणण्यानुसार प्रवीण यांनी बीआर चोप्रा यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेणं फारसं अवघड गेलं नाही कारण प्रवीण कुमार काही साधारण व्यक्तिमत्त्व नव्हते. खेळामुळे त्यांच्या ओळखीसाठी फक्त नावंच पुरेस होतं.

प्रवीण जेव्हा ठरलेल्या दिवशी बीआर चोप्रा यांना भेटायला गेले तेव्हा पहिल्या नजरेत चोप्रा यांनी त्यांना साईन केलं. “मला माझा भीम भेटला” असे त्यांचे उद्गार होते, तेही कोणतीही बोलणी होण्याआधीच.  

अशाप्रकारे अभिनयाचा अनुभव नसूनही त्यांना पात्र मिळालं. मात्र जेव्हा बोलायला सुरुवात झाली तेव्हा एक अडचण समोर आली. प्रवीण यांची शरीरयष्टी चांगली होती परंतु त्यांचा आवाज पात्रासाठी साजेसा नव्हता. प्रॉब्लेम असा होता की, प्रवीण यांचा आवाज जरा बारीक होता आणि पात्रासाठी दमदार आवाजाची गरज होती. शूट सुरु झाल्यावर डायलॉग्सची प्रॅक्टिस करताना क्रू मेंबर्सने त्यांना सांगितलं की प्रवीण यांच्यासाठी एक डबिंग आर्टिस्ट बोलवण्यात येत आहे.

हे ऐकल्यावर मात्र प्रवीण भयानक रागावले होते आणि त्यांनी सरळ सांगितलं होतं, की ते काही पुतळा नाहीये. जर त्यांना त्यांचे डायलॉग्स बोलता येत नसतील तर त्यांना पात्र करण्यातही इंटरेस्ट नाहीये. असं खडसावून सांगत प्रवीण थेट बीआर चोप्रा यांच्याकडे गेले आणि त्यांनी एका आठवड्याचा वेळ मागितला. प्रवीण खेळाडू होते, इतक्यात हार माननं त्यांच्या रक्तातंच नव्हतं.

एका आठवड्यात त्यांनी महाभारत ग्रंथ घेतला आणि त्यातील लाईन्स ते जोरजोरात वाचायचे. ग्रंथातील त्यांच्या पात्राला पूर्णपणे आत्मसाद करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यानुसार ‘भीम नेमकं काय आहे?’ हे त्यांनी समजून घेतलं. जिथे ते अडखळायचे असे शब्द बाजूला लिहून घेत आणि त्यांना परत जोरजोरात म्हणायचे. त्यांच्या या मेहनतीची फलश्रुती लवकरच सर्वांना दिसली.

एका आठवड्याने प्रवीण जेव्हा परत सेटवर पोहोचले तेव्हा त्यांचा आवाज आणि पात्राच्या अभिनयाची पकड बघून सर्व अवाक झाले होते. पात्र जिवंत करण्यासाठीचा हा सर्व अट्टहास होता!

त्यांची मेहनत आणि समर्पण यामुळेच अभिनयाशी दूर दूर संबंध नसलेल्या प्रवीण कुमारांना आज ‘उत्कृष्ट आणि अजरामर अभिनेता’ म्हणून संपूर्ण भारत ओळखतो. या पत्रानंतर त्यांना बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट मिळाले. त्यांना सिनेसृष्टीत ब्रेक मिळाला तो १९८२ मध्ये आलेल्या ‘रक्षा’ या चित्रपटातून आणि पुढे त्यांनी पन्नासपेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं. 

पुराणातील अमर भीमाला टेलिव्हिजन जगतात आपल्या अभिनयाने अजरामर करणारे प्रवीण कुमार सोबती यांनी काल ७ फेब्रुवारी २०२२ ला जगाचा निरोप घेतला. हार्ट अटॅकने वयाच्या ७५ व्या वर्षी प्रवीण कुमार सोबती अनंतात विलीन झाले आहेत. मात्र भीमाच्या रूपाने ते या भूतलावर कायम वास्तव्यास राहतील.

खेळ आणि अभिनय सृष्टी गाजवणाऱ्या अशा या भारताच्या रत्नाला बोल भिडूचा सलाम!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.