अकोल्यात झालेल्या हल्ल्यात प्रबोधनकार ठाकरेंनी महात्मा गांधीजींचे प्राण वाचवले होते.

गोष्ट आहे १९३०च्या दशकातली. इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्धच सविनय कायदेभंगाच आंदोलन मागे घेतलेल्या गांधीजीनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. सर्व भारतभर दौरे सुरु होते. मात्र ठिकठिकाणी कर्मठ लोकांचा त्यांना विरोध सुरु होता. महाराष्ट्रातून तर त्यांच्यावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. पण गांधीजीनी दृढ निश्यय केला होता.

गांधीजी महाराष्ट्रात आले. त्यांचा अकोला जिल्ह्याच्या दौरा होता.

याच दरम्यान प्रबोधनकार ठाकरेदेखील काही कामानिमित्तअकोला मध्ये आले होते. संध्याकाळी गांधीजींच आगमन होणार होतं. गावात सगळी जोरदार तयारी सुरु होती. एका ओळखीच्या व्यक्तीने नुकताच सुरु केलेला छापखाना पाहण्यासाठी प्रबोधनकार गेले. तिथे गेल्यावर त्यांना गप्पा मारताना दिसल की काही जाडजुड काठ्या आणि झेंडे पडलेले आहेत. ठाकरेंनी त्या छापखाण्याच्या मालकाला विचारलं हे काय? तेव्हा तो म्हणाला,

“अहो, ही नसती ब्याद इथं आणून टाकली आहे काही तरुणांनी. आज संध्याकाळी म. गांधी येणार आहेत ना अकोल्याला. त्यांना हे लोक काळी निशाणे दाखवून त्यांचा निषेध करणार आहेत  “

प्रबोधनकार ठाकरे म्हणाले,

‘त्यासाठी या लठ्ठ दांडक्यांची जरूर काय? म्हणजे, वेळ आली का काळी फडकी खिशात कोंबून गांधीजींवर हल्ला चढवायचा बेत आहे की काय त्यांचा?’

मित्र म्हणाला तसंही करण्यास ते मागे पुढे बघणार नाहीत. गांधीजींच्या जीवाला इथे धोका आहे हे ठाकरेंच्या लक्षात आले. त्यांनी त्या मित्राला काठ्या हलवायला सांगितल्या. तो घाबरत होता, पण प्रबोधनकारांनी तो छापखाना बंद करायला लावला आणि मित्राला टाळे ठोकायला लावून घरी पाठवले.

पुढची सगळी सूत्रे ठाकरेंनी स्वतःच्या हाती घेतली.

तिथे काही चार पाच पोलीस अधिकारी त्यांच्या ओळखीचे होते. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बंदोबस्ताच नियोजन सांगितल. संध्याकाळी ५-६ च्या सुमाराला कंपनीच्या एजंट ऑर्गनायझरांना भेटायला प्रबोधनकार बाहेर पडले. तिथे त्यांना सकाळचे पोलीस अधिकारी भेटले. त्यांच्या गाडीतून शहराबाहेर गांधीजी ज्या मार्गाने येणार आहेत त्याची पाहणी केली.

तिथे त्यांना दिसलं की कापसाचे गठ्ठे बांधण्यासाठी ज्या लोखंडी पट्ट्या वापरतात, त्यांच्यावर मोठमोठे टोकदार खिळे अडकवून, त्या पट्ट्या रस्त्यात लांबवर पसरून ठेवलेल्या होत्या. हेतू होता की या निर्जन जागी गांधीजींची गाडी आली का त्या खिळ्यांनी टायर्स फुटून गाडी पंक्चर व्हावी. गांधीजींचे अपहरण करण्याची तयारी केलेली होती. एक इन्स्पेक्टर ठाकरेंना म्हणाला,

“पाहिलंत, गांधींनी हरिजन उद्धाराचा प्रश्न हाती घेतलाय म्हणून या ऑर्थोडॉक्स लोकांचा संताप उसळला आहे तो “

पोलिसांनी त्या पट्ट्या काढल्या. नंतर ते पथक परत शहरात आले. प्रबोधनकार ठाकरे गांधी ज्या रस्त्यावरून सभा स्थानी जाणार होते तिथे एका ओळखीच्या डोक्टरकडे जाऊन बसले. अंधार पडू लागला. पोलिसांची गडबड गस्त चालू झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांचे थवे उभे राहिले.

अचानक गर्जना कानी पडू लागल्या ‘‘आले आले-महात्मा गांधीकी जय’’ 

पोलिसी गाड्यांच्या बंदोबस्तात म. गांधींची गाडी आली. गाडी जात असताना, प्रबोधनकार उभे होते त्या दवाखान्यापासून ५० फूट अंतरावरच्या झाडाची १ फूट व्यासाची भली मोठी फांदी मोडून रस्त्यावर आडवी पडली. गाडी थोडक्यात बचावली. त्या झाडावर बसून हा पराक्रम करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

गांधीजी आपल्या निवासाच्या ठिकाणी सुखरूप पोहचले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता भाटीया मैदानावर सभा होणार होती.  गांधीजी ज्या बंगल्यात उतरले होते तिथून एकदम जवळच हे ठिकाण होते. पहाटेपासून लाखोंची गर्दी सभास्थानी जमा झाली होती. गांधीजींना पाहण्यासाठी आसपासच्या खेड्यातून गर्दीचा सागर लोटला होता. गांधीजींची वाट पाहणे सुरु होतं.

हाफपॅण्ट, पायाला खाकी  नि बूट, अंगात शर्ट, हातात चांदीच्या मुठीची छडी आणि सोलो हॅट अशा थाटात प्रबोधनकार गांधी-निवासाजवळ आले. पाहतात तो काय? बंगल्याच्या अंगणात ४०–५० टोळभैरव उघड्या अंगाने सताड उताणे पडलेले आणि गर्जना करत होते,

‘‘जाना हो तो छातीपरसे जाव’’

बाहेर रस्त्यावर पोलीस अधिकारी नि पोलीस तो तमाशा पाहत उभे होते. गांधीजींना बाहेर पडायला वाटच नव्हती. सभास्थानी लोकांची गडबड सुरु झाली होती. पोलीस अधिकारी आणि प्रबोधनकार गांधीजींच्या बाहेर कसे काढायचे याची चर्चा करू लागले. खाकी ड्रेसमुळे प्रबोधनकार ठाकरे देखील पोलिसांपैकी एक दिसत होते.  त्यानी त्या झोपलेल्या कार्यकर्त्यांना विनवणी केली  ,

‘‘भाईयो, जानेको रास्ता दीजिये. ’’

पण त्यांचं परत तेच उत्तर आलं. ‘‘जाना हो तो हमारे छातीपरसे जाना.’’ 

ते ठाकरेंच रक्त होत. गांधी मार्गाने प्रयत्न करून झाला आता ठाकरी बाणा बाहेर काढला. ठीक है, असे म्हणत ते त्यां आंदोलनकर्त्यांच्या छातीवरून ताडताड बूट आपटत निघाले, मागाहून पोलीस अधिका-यानी तेच केले. खाली सत्याग्रहाची नाटकी करणारे कार्यकर्ते कळवळून त्यांना शिव्याश्राप देत ओरडत होते.

पण ठाकरे मागे हटले नाहीत. ते सरळ वरच्या मजल्यावर गांधीजींच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांना बघताच गांधीजींना आश्चर्य वाटलं. त्यांची जुनी ओळख होती. गांधीजी हसत हसत त्यांना म्हणाले,

‘‘आँ, ठाकरेजी, आप आज इधर कैसे?’’

प्रबोधनकार म्हणाले,

आपको प्रणाम करने आये. सभास्थानको जाना है ना आपको? लाखो लोगोंकी भीड हुई है मैदानमे. चलिये. आपको सभास्थानपर जानाही पडेगा महात्माजी.

 गांधीजीनी विचारलं कस जायचं? प्रबोधनकार म्हणाले, सत्याग्रहींके छातीपरसे. हम आये वैसे. 

गांधीजी मात्र सत्याग्रहीच्या छातीवर पाय द्यायचं पाप करायला तयार नव्हते. अखेर प्रबोधनकार ठाकरेंनी तोडगा काढला. आसपासच्या जागेच त्यांनी निरीक्षण केलं. बंगल्याच्या मागे एक गल्ली होती. त्या बाजूच्या गॅलरीला लागूनच खाली कुसाची बुटकी भिंत होती. तिथून एक रस्ता थेट सभास्थानी जात होता.

प्रबोधनकार ठाकरेंनी त्या भिंतीवर काही कार्यकर्त्यांना उतरवलं. रस्त्यावर काही पोलीस उभे राहिले. गांधीजींना अक्षरशः गलरीतून उचलून त्या भिंतीवर आणि मग तिथून खाली अलगद ठेवण्यात आलं. पोलीस अधिका-यानी देखील मागोमाग धडाधड उड्या मारल्या आणि पाठीमागच्या चोरवाटेने सारेजण चालत चालत झपाट्याने मैदानाकडे रवाना झाले.

इकडे गांधीजींचे विरोधक अंगणात झोपूनच होते.

काही क्षणातच सभेच्या ठिकाणी महात्मा गांधीजीकी जय च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या आणि सत्याग्रहीना कळाले की गांधीजी चोरवाटेने सभेला पोहचलेत आणि सभा सुरु देखील झाली आहे. विरोधकांचा डाव फसला आणि हे सगळ घडल प्रबोधनकार ठाकरेंच्यामुळे.

त्यांनी माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात हा किस्सा लिहून ठेवलेला आहे. ते म्हणतात,

“त्या दिवशी सार्वजनिक संतापाचे ते विराट स्वरूप पाहून काही व्यापा-यांनी स्थानिक ब्राह्मणेतर पुढारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने कॉटन मार्केटच्या आवारात त्याच रात्री माझे व्याख्यान ठरविले. व्याख्यानात घडलेल्या सगळ्या घटनांचा पाढा स्पष्ट बोलून, विरोधकांच्या हीन वृत्तीचा मी खरपूस समाचार घेतला. २-३ बड्या मारवाडी व्यापा-यांनीही पश्चात्ताप व्यक्त केला आणि महात्मा गांधीजींची जाहीर माफी मागितली. “

हे ही वाच भिडू.