लडाखला जाताय तर हे वाचून जा !!! नाहीतर पश्चातापाची वेळ येईल !!!

वय वर्ष १७ ते २१ दरम्यान असणाऱ्या मुलांचा निम्मा काळ हा गोव्याला जाण्याची अशी स्वप्न रंगवण्यात गेला असून त्यानंतर २१ ते २८ वर्ष वय असणाऱ्या तरूणांचा निम्मा वेळ एस्स दिस टाईम लडाख पक्का म्हणण्यात गेला असल्याची नोंद यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात असल्याचं सांगितल गेलं आहे. इतकी स्वप्न रंगवूनही स्वप्न पाहणाऱ्यांच्या यादीत पुण्यातील MPSC करणारी मुलंच आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

तर असो आजचा विषय आहे. लडाख अथवा लद्दाख जाण्यापुर्वी घ्यावयाची काळजी. 

१) लडाख, लदाख, लद्दाख च्या शुद्धउच्चाराबाबत बोलणे टाळावे. नेमका कोणता उच्चार योग्य याची चर्चा आपण लडाखसारख्या ठिकाणी करणार असाल तर तूम्ही पुण्याचे आहात का ? अस विचारणार प्रतिप्रश्न तुम्हास विचारला जावू शकतो.

२) जसे अमित शहा आणि मोदि…. जसे हिंदूस्तान टॅक्टर आणि कुमार सानू…. तसच बुलेट आणि लडाख.
जर आपणाकडे बुलेट नसेल तर आपणास लडाखमध्ये असणाऱ्या महाराष्ट्रीय बुलेटस्वारांकडून अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता असते.

३) जसे पुण्यात आल्यानंतर काही लोकं वरणपुरी न खाताच जातात त्याप्रमाणेच काही लोक लडाखला जावून देखील याक या केसाळ प्राण्यावर बसायचे टाळतात. या प्राण्यावर बसण्यासाठी आपण गुगलवरुन काही फोटो डाऊनलोड करावेत आणि नेमकं कस बसावं याचं प्रॅक्टिस करावं.

४) गुगल अर्थ हा पर्याय सर्वांच्या मोबाईलमध्ये असतो याचं भान आपण मुळीच ठेवू नये. आपण ज्या रस्त्याने जाणार आहोत त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची शक्य असल्यास तोंडपाठ करावी. योग्य ठिकाणी ती फेकून मारता येते.

५) लडाख मधील लहान मुलांचे फोटो हा ज्वलंत प्रश्न असून आपण त्यांचा एकही फोटो काढला नाही तर फॉल धरण्यात येईल. या मुलांचे फोटो काढण्याची प्रॅक्टिस रोज किमान एक तास करावी.

६) समुद्रसपाटीपासून किती उंचावर श्वसनास त्रास उद्भवू शकतो. त्यानंतर केले जाणारे प्राथमिक उपचार यांबाबत गुगलकडून सल्ला घ्यावा. जमल्यास त्याच्या प्रिन्टआऊट काढून सोबत बाळगाव्यात.

७) रस्त्याने जाताना ते पहा पलिकडे पाकिस्तान म्हणून कुठेही हातवारे करू नये.

८) लडाखमध्ये पोहचताच इथे महाराष्ट्रीयन थाळी कुठे मिळेल अशी चौकशी करु नका. घरच्या जेवणाची आठवण आलीच तर मराठे अटकेपार गेलेल किंवा थोरल्या बाजीरावांनी कस एवढं सगळं केले असेल अशी वाक्य वारंवार मनातल्या मनात म्हणा.

९) पेट्रोलपंप हा लडाख येथील ज्वलंत मुद्दा आहे. खूप दूरदूरवर पेट्रोल नसल्याने ते सुट्टे विकले जाते. कॅनला मिटर नसल्याने समोरच्यास “शुन्य पाहू दे” असे म्हणू नये. शिवाय त्यास महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर सांगून बोअर करु नये.

१०) महाराष्ट्रीयन नंबर प्लेट दिसल्यास उगीचच ओळख वाढवण्यास जावू नये ती माणसं विदर्भातील देखील असू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.