मटणाचा दर वाढवला तर कोल्हापूरात तीन वर्षाची जेल व्हायची..!

आम्ही कोल्हापूर कर म्हणजे इशय हार्ड. जरा कधी अन्याय झाला तर सुट्टी देत नाही. आमच्या गावात माणस रहात नाहीत वाघ राहत्यात.  आमचा इतिहास लय जुना आहे. महाराष्ट्रात १८५७ च्या उठावाची सुरवात आमच्या चिमासाहेब महाराजांनीच केली होती. कित्येक क्रांतिकारक इथल्या मातीने घडवले याला मोजमाप नाही. तेव्हाच काय आता परवा दोनपाच वर्षापूर्वी आमच्या गावात एन्ट्रीला टोल बसवालते लगेच आम्ही आंदोलन करून टोलनाका बंद पाडला.

मग मटनाचा दर वाढवल्यावर आम्ही काय गप बसू होय?

तर झालंय अस की महागाई वाढली जीडीपी कमी झाला जीएसटी लागल असली दुकानदारांची नाटकं आज काल रोजची झाल्यात. अशीच कारण सांगून मटण विक्रेत्यांनी रेट थेट ५६० रुपये करून ठेवला होता. मग काय आमच टाळकंच हलल. जगाला तांबडा पांढरा खायला शिकवणारी माणस आम्ही ,

उद्या घरी पाव्हन आल तर माणस काय बटाटूची भाजी वाढू देत होय?

सगळ्यात पहिल्यांदा बावड्याच्या लोकांना शंका आली. नदी पलिकड साडे चारशे रेटन विक्री चालू असताना गावात ५६० म्हणजे काही तरी गडबड हाय. मग काय आमच्या पेठेतल्या मंडळानी आंदोलनाची तलवार बाहेर काढली. तालमीच्या लाल मातीत घुमणारी पोरं शड्डू ठोकून रस्त्यावर उतरली. जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहिली.

रेट कमी केला नाही तर गावात एकजण पण मटण विकत घेणार नाही असा इशारा देण्यात आला.

ते म्हणत्यात नां लोग जुडते गये कारवा बनता गया. गाव तापल. खरोखर मटण दुकानावर बहिष्कार टाकण्यात आला. मंडळाची पोर बाहेरून मटण आणून ते कमी दरात उपलब्ध करू लागली. इशय जिल्हा कलेक्टर पर्यंत पोहचला. प्रशासनाने दोन्ही बाजूना चर्चेसाठी बोलावल.  महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बारा जणांची समिती स्थापन करण्यात आली.

मटणवाल्यांनी दुष्काळ हाय, बकऱ्यांची पैदास घटली आहे, केरळमध्ये रेट बघा असली टीवटीव लावलेली. आम्हाला जास्तीत जास्त ५४० रुपये किलो एवढ परवडतय अस सांगत होते. तर समितीच म्हणण होत की एरवी शेतकरी पिकवतो तो भाजीपाला दूधदुभत्यावर शासन दरवाढीच नियंत्रण ठेवतंय मग मटणावर का नको? कोणी पण उथळ आणि मनाप्रमाण रेट लावतंय हे चालू देणार नाही.

पण आंदोलनकर्त्यांच्या समोर त्यांना झुकाव लागलं आणि रेट ४८० रुपये किलो केला. झालं गेल गंगेला मिळाल करून एकमेकांच तोंड ग्वाड करून विषय मिटला.

तुम्हाला सांगायचं म्हणजे याबाबतीत पण आमचा इतिहास मोठा हाय.

स्वातंत्र्याच्या पूर्वी पण आमच्या इथ असचं झालं होतं. तेव्हा च्या संस्थानकालीन सरकारन मटण दरावर कंट्रोल करण्या संबंधीचा नियम बनवला होता. तेव्हाचे संस्थानचे मिनिस्टर पीबीपाटील यांनी ३१ जानेवारी १९४७ रोजी मटणाचा दर तोळ्याच्या एका शेरास १ रुपया १२ आणे इतका असावा हे ठरवून दिल होतं.

हा नियम कोण मोडला तर त्याला तीन वर्षाची कैद आणि दंड होईल, त्या व्यक्तीच नाव स्थानिक पेपर मध्ये मुलकी ऑफिस च्या नोटीस बोर्ड वर लावण्याचे आदेश दिले होते. 

तुम्हाला पटल नाही तर तस गॅझेट हाय कोल्हापूर संस्थानच्या दफ्तरात. अशी आमची कोल्हापूरची रांगडी परंपरा हाय. लाड करायच्या तिथ करतो डोक्याच्या वर पाणी जायला लागल तर निब्बार हानतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.