वडिलांना वाटायचं पोराने IAS व्हावं, हा हिरॉईनींचा कर्दनकाळ प्रेम चोप्रा बनला.  

प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा ! लेखाची सुरुवात प्रेम चोप्रां च्या या डायलॉगने झाली नसती तर नवल. तो काळ राजेश खन्नां चा होता. हीरो म्हणून राजेश खन्ना यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती. असं म्हणतात, हीरो आपल्याला तेव्हाच आवडतो जेव्हा त्याच्यासमोर असलेला विलन तगडा असतो. राजेश खन्ना हीरो म्हणून फेमस असले तरी त्यांच्यासमोर प्रेम चोप्रां सारखा ताकदीचा खलनायक उभा होता. राजेश खन्ना – प्रेम चोप्रा या जोडीने जवळपास १९ सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. ज्यामध्ये राजेश खन्ना हे हीरो आणि प्रेम चोप्रा हे खलनायक आहेत.

ही कहाणी ग्रेट कलाकार प्रेम चोप्रा यांची.

२३ सप्टेंबर १९३५ रोजी लाहोर येथे प्रेम चोप्रां चा जन्म झाला. वाढत्या वयात फाळणीची मोठी झळ चोप्रा कुटुंबाला बसली. फाळणीनंतर हे कुटुंब शिमल्याला स्थायिक झाले. वडिलांची इच्छा होती की प्रेम ने IAS ऑफिसर बनावं. परंतु पंजाब युनिव्हर्सिटी मध्ये शिकत असताना प्रेम च्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली.

शिमल्यामध्ये असताना एक किस्सा असा..

शिमला येथील आलिशान अशा ‘क्लार्क’ हॉटेल मध्ये सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांचं येणं जाणं होतं. अभिनयाची आवड प्रेम साब यांना कॉलेज पासून लागलीच होती. त्यामुळे क्लार्क हॉटेल च्या मॅनेजर सोबत प्रेम चोप्रांनी ओळख वाढवली होती. यामुळे कोणी बडा सेलिब्रिटी हॉटेल मध्ये येणार असेल तर तिथे असलेल्या गर्दीतून वाट काढत, प्रेम चोप्रांना त्या कलाकाराची झलक बघायला मिळायची.

एके दिवशी आपण त्या सेलिब्रिटीची जागा घेऊ आणि आपल्याला पाहणारी अशी गर्दी असेल याचा त्यांनी त्यावेळी विचार सुद्धा केला नव्हता.

प्रेम चोप्रां च्या‌ मनात कॉलेज मध्ये असताना अभिनयाचं वेड निर्माण झालं होतं. त्यामुळे घरच्यांचा सक्त विरोध असूनही प्रेम चोप्रा ग्रॅज्युएशन पूर्ण करून मुंबईत आले. मुंबईत त्यांची कोणासोबत सुद्धा ओळख पाळख नव्हती. त्यामुळे कुलाबा येथील गेस्ट हाऊस मध्ये त्यांनी सुरुवातीचे दिवस काढले.

प्रेम चोप्रांनी स्वतःचा पोर्टफोलिओ बनवला होता. तो सोबत बाळगून ते कुठे काम मिळेल या आशेने अनेक ठिकाणी वणवण फिरायचे. सुरुवातीला काही पंजाबी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. पंजाबी सिनेमे सुपरहिट होते परंतु हवे तसे पैसे आणि ओळख मिळत नव्हती. स्वतःची गुजराण करणं त्यांना कठीण होऊ लागलं. त्यामुळे प्रेम चोप्रांनी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी पत्करली.

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सर्कुलेशन खात्यात प्रेम चोप्रा काम करत होते.

न्यूज पेपर चं वितरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित करण्याची जबाबदारी प्रेम चोप्रा यांच्यावर होती. मुंबई जरी स्वप्नांचं शहर असलं तरी हाती कामधंदा असेल तर या शहरात दोन घास खाऊन सुखाने राहता येतं. सुरुवातीच्या स्ट्रगल च्या काळात प्रेम चोप्रांना टाइम्स ऑफ इंडिया च्या या कारकुनीच्या जॉब ने खूप मदत केली.

याच काळात नोकरी करता करता १९६४ साली आलेला ‘वो कौन थी’ हा पहिला हिट बॉलिवुड सिनेमा प्रेम चोप्रा यांच्या वाट्याला आला. या सिनेमात त्यांची भूमिका छोटीशी होती. तरीही त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

वो कौन थी केल्यामुळे प्रेम चोप्रांना सिनेमाच्या अनेक ऑफर्स आल्या. प्रेम चोप्रा यांनी हीरो म्हणून काही सिनेमे केले. परंतु हे सिनेमे फ्लॉप झाले. त्या काळातील प्रसिध्द निर्माते – दिग्दर्शक मेहबूब खान ज्यांनी ‘मदर इंडिया’ सारखा अजरामर सिनेमा बनवला आहे. मेहबूब खान यांनी प्रेम चोप्रांना हीरो च्या भूमिका करण्याऐवजी खलनायक रंगवण्याचा सल्ला दिला. हा सल्ला प्रेम चोप्रा यांनी गांभीर्याने अमलात आणला. आणि यानंतर 70 च्या दशकातील अनेक सिनेमांमध्ये प्रेम चोप्रा यांनी खलनायक साकारले.

सिनेमे मिळत असले तरीही त्यांनी नोकरी सोडली नव्हती. यामुळे एक अडचण अशी निर्माण झाली, की टाइम्सच्या ऑफिस मध्ये प्रेम चोप्रा दिसला कि पोरी तिथे जायला घाबरू लागल्या. पिक्चर मध्ये खतरनाक व्हिलन असणारे प्रेम चोप्रा खऱ्या आयुष्यात तसे नाहीत हे अनेकांना सांगून पटायचं नाही.

पुढे सिनेमाच्या शूटिंग मुळे कामावर वारंवार रजा होऊ लागली. सुट्टीसाठी कारणं तरी किती सांगणार ! एकामागून एक सिनेमाच्या ऑफर येत होत्या.

अखेर ‘उपकार’ सिनेमा केल्यानंतर प्रेम चोप्रा यांनी टाइम्स ऑफ इंडिया मधील नोकरीचा राजीनामा दिला.

पुढच्या काळात देव आनंद – राजेश खन्ना – दिलीप कुमार – राज कपूर या चौकडीसाठी प्रेम चोप्रा हे फेव्हरेट विलन झाले होते.

प्रेम चोप्रा यांनी स्वतःचं मानधन या काळात वाढवलं.

“मी प्रमुख हिरोंसमोर तोडीस तोड काम करतो, त्यामुळे मला त्यांच्याइतकं मानधन मिळायला हवं”,

अशी त्यांनी निर्माते – दिग्दर्शकांसमोर अट ठेवली. १५०० मानधन घेऊन सिनेमात काम करायला सुरुवात करणारे प्रेम चोप्रा नंतर १ लाख इतकं मानधन घेऊ लागले. वैसलीन हेयर क्रीम सारख्या त्या काळातील अनेक लोकप्रिय जाहिरातींमध्ये प्रेम चोप्रा यांनी काम केले.

एकदा राज कपूर यांनी प्रेम चोप्रा यांना ‘बॉबी’ सिनेमासाठी विचारलं.

प्रेम चोप्रांची अपेक्षा होती की भूमिका मोठी असेल. पण पाहुण्या कलाकाराची छोटीशी भूमिका होती. प्रेम चोप्रा यांनी भूमिका स्वीकारली. आणि बॉबी मधील या एका संवादाने प्रेम चोप्रा हे नाव अजरामर झालं. तो संवाद म्हणजे,”प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा !”

बॉलिवुड मध्ये खलनायकी भूमिका गाजविणारे अनेक कलाकार आहेत. अमरीश पुरी, प्राण, अमजद खान वैगरे वैगरे. या कलाकारांमध्ये सुद्धा स्वतःची अनोखी स्टाईल निर्माण करणारे प्रेम चोप्रा सदैव दर्दी सिनेप्रेमींच्या मनात घर करुन राहतील.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. vighnesh says

    mala ya lekhachya end la yeta yeta asa vatla ki he pan gele ki kay

Leave A Reply

Your email address will not be published.