मैत्रिणीने ‘टॉयबॉय’शी भांडण केलं आणि कोरियाच्या प्रेसिडेंटला जेलची हवा खावी लागली

सध्या कोरिया म्हटलं की आपल्याला किम जोंग उन आणि भाऊंनी काढलेला एखादा अतरंगी आदेश एवढंच वाचायला मिळतंय. पण किम जोंग उन झाले नॉर्थ कोरियाचे. नॉर्थचा कट्टर शत्रू असेलला साऊथ कोरिया पण अतरंगी बातम्यात नॉर्थ कोरियाला टक्कर देऊ लागलाय. के-ड्राम्यांसाठी फेमस असलेल्या साऊथ कोरियात असाच एक ड्रामा घडलाय की ज्यामुळं सॅमसंगचा मालकच काय तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीलापण जेलची हवा खावी लागलेय.

सुरवात करूया पहिल्या महिला साऊथ कोरियन प्रेसिडेंट पार्क ग्युन हे यांच्यापासून. 

ग्युन हे यांचे वडील पार्क-चेंग-ही राष्ट्रपती होते. पार्क-चेंग -ही यांच्यावर झालेल्या एका हल्यात त्यांच्या पत्नीला जीव गमवावा लागला. त्यानंतर पुढे जाऊन पार्क चेंग ही यांची देखील हत्या झाली. आईवडिलांच्या हत्तेनंतर पार्क ग्युन हे या अज्ञातवासात गेल्या. 

अज्ञातवासात असताना त्यांच्यावर प्रभाव होता चोई-ते-मिनचा. चोई-ते -मिन हा एक ख्रिश्चन मिशनरी होता. 

भारतातल्या नेत्यांवर जशी चंद्रास्वामीची होती तशीच जादू या बाबाची ग्युन हे यांच्यावर होती. 

पुढे चोई सोन सील ही ग्युन हे यांची मैत्रीण झाली. पार्क ग्युन हे या प्रेसिडेंट झाल्यांनंतरही दोघींची मैत्री तशीच होती.

आता इथून पुढं खरा खेळ चालू झाला. पात्रांची नावं अवघड आहेत त्यामुळं इथून पुढं प्रेसिडेंट आणि त्यांची मैत्रीण एव्हढच लक्षात ठेवलं तरी चालेल. आता नक्की काय कांड झालं? तर राष्ट्रपतीची मैत्रीण म्ह्णून सोन सीलची मस्त मजा मारत होती.

त्याच्या ही पुढं जाऊन या राष्ट्रपतीच्या मैत्रिणीनं ठेवला होता एक ‘टॉय बॉय’. 

आता ‘टॉय बॉय’ म्हणजे काय तर ‘एक कम उम्र का प्रेमी’ अशा नाजूक शब्दात याचं भाषांतर करता येतंय. हा ‘टॉयबॉय’ पण साधा सुदा नव्हता. ऍथलीट असलेला तो एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट होता. त्याचबरोबर राष्ट्रपतीच्या मैत्रीणीबरोबर संबंध वाढवून यानं आपला बिझनेसपण चांगलाच वाढवला होता. दोघांमध्ये परस्पर सहमतीनं परस्परांचे संबंध जोपासण्याचं काम चांगलं चाललं होतं.

मात्र प्रॉब्लेम तेव्हा झाला, जेव्हा राष्ट्रपतींची मैत्रिण सोन सील ही आपल्याला ग्रांटेड घेतेय असं त्या टॉयबॉयला वाटू लागलं. 

सुरवातीच्या काळात त्यांना सोन सीलला महागडी गिफ्ट देऊन ओळख वाढवली होती. हीच गिफ्टस् ही मैत्रीण राष्ट्रपतीला सरकवत असे हा भाग वेगळा. आता एक यशस्वी बिझनेसमॅन झालेल्या त्या टॉयबॉयला जुनी ओळख नको होती.  त्यामुळं दोघात खटके उडायला सुरवात झाली होती. 

एके दिवस सोन सील आपल्या पोरीच्या कुत्र्याला घेऊन या टॉयबॉयकडं आली. मी बाहेर चालली आहे आणि मी परत येईपर्यंत तू माझ्या कुत्र्यावर येईपर्यंत लक्ष ठेव असं सांगून ती निघून गेली. 

टॉयबॉयला मात्र कुत्रं सांभाळण्यासारखी क्षुल्लक कामं करायची इच्छा नव्हती. 

त्या कुत्र्याला तिथंच सोडून तो निवांत गोल्फ खेळायला निघून गेला. जेव्हा सोन सील परत आली तेव्हा आपल्या लाडक्या पपीला एकटं बघून तिचा पारा चांगलाच चढला. तिनं त्या टॉयबॉयला झापायला सुरवात केली. आता मात्र तो काही ऐकायच्या तयारीत नव्हता तो तिथून निघाला आणि थेट मीडियासमोरच हजर झाला.

मीडियासमोर त्यानं सोन सीलची सगळी भांडाफोड करायला सुरवात केली. सोन सील कशी प्रेसिडेंट पार्क ग्युन हे ह्यांना राष्ट्रपती म्ह्णून मिळालेल्या सुविधांचा गैरवापर करते, ती त्यांची भाषणंसुद्धा एडिट करते हे या टॉयबॉयनं  मीडियासमोर येऊन पुराव्यानिशी सांगितलं.

पुढे या आरोपांवर चौकशी झाली तेव्हा सॅमसंगच्या मालकानं कशी करोडो रुपयांची लाच सोन सील यांना दिली. हे देखील पुढं आलं.

 त्यामुळं सॅमसंगच्या मालकाला देखील जेलमध्ये जावं लागलं. पार्क ग्युन हे यांना तर राष्ट्रपतिपदावरून काढण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना २४ वर्षांची शिक्षा देखील झाली. आता ४ वर्षे जेलमध्ये काढल्यानांतर त्यांना माफी देउन सोडण्यात आलंय.

आता अशीच कांड करणारी तुमचे मित्र-मैत्रीणी असतील, तर त्यांना हि स्टोरी जरूर दाखवा आणि बघा काय फरक पडतोय का.

हे ही वाच भिडू:

Webtitle: president-of-south-korea-had to go behind the bars due-to-her friend’s toyboy

Leave A Reply

Your email address will not be published.