राष्ट्रपती राजवट लागू झाली पण आमदारांना आता पगारपाणी भेटणार का नाही ?
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सुटता सुटत नाहीये. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, कोणता पक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार. कोण मुख्यमंत्री होणार याच सगळ्या गोष्टीची सध्या चर्चा सुरू होती. आमच्याकडं बहुमत नाहीये म्हणून भाजपनं माघार घेत शिवसेनेला शुभेच्छा दिल्या.
महामहीम राज्यपालांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी 24 तास दिले होते. मात्र या 24 तासात शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला बोलावलं. पण त्यांचाही घोळ सुरूच होता.
या सगळ्यांचा विचार करून महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
तिकड राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि इकडे बोल भिडूच्या इनबॉक्स मध्ये कार्यकर्त्यांच्या प्रश्नांचा पाऊस सुरु झाला.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर नवीन निवडून आलेल्या आमदार साहेबांना पगारपाणी भेटतो का?. त्यांना भत्ता मिऴतो का? आमदार निवासातला फ्लॅट मिळतो का? आमदार म्हणून ते फिरू शकतात का? आपलं दैंनदिन कामकाज आमदार म्हणून करू शकतात का?
कारण कसंय, लोकांनी यांना मतदान करून आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं जरी असलं तरी विधानसभा भरवून या आमदारांचा शपथविधी पार पडलेला नाही. मग ते अधिकृत झालेत का यावर अनेक लोकांना शंका पडली होती.
या सगळ्यामुळे आम्हालासुद्धा या नवनिर्वाचित आमदारांची काळजी वाटली. हा प्रश्न पडल्यासरशी आम्ही शोधाशोध सुरू केली. अन् तुमच्यासाठी सगळं काही शोधून काढलं कारण जिथं कमी तिथं आम्ही.
तर भिडूनो. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तर आमदार महोदयाचं सगळं सुरळीत सुरू राहतं.
विधीमंडळाचे माजी सचीव अनंत कळसे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे विधीमंडऴाचं कामकाज स्थगीत होतं. अधिवेशन जरी झालं नाही तरी शपथ विधीचा कार्यक्रम पुढं ढकलावा लागेल. तरी निवडून आलेले आमदार विधीमंडळाचे सदस्य म्हणूनच गणले जातील. नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सुखसुविधा त्यांना मिळतात.
त्यामुळे आमदारांसाठी ठरलेल मानधन महिन्याकाठी त्यांच्या खात्यात जमा होणार.
आमदार म्हणून मिळणारा भत्ता व्यवस्थितपणे भेटत राहणार. काही कामानिमित्त किंवा अधिवेशनाच्या काळात मुंबईत आल्यावर राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आमदार निवासाची व्यवस्था करून दिलेली आहे. त्या आमदार निवासामध्ये त्यांच्या मालकीचा त्यांना फ्लॅटही मिळणार.
त्यामुळे आमदारांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचं काहीही कारण नाही.
कारण निवडणुका येतील जातील, मुख्यमंत्री होईल राहिल. राष्ट्रपती राजवट लागू होईल किंवा हटवली जाईल. राज्यात काहीही उलथा पालथ होऊद्या आमदार महोदयांनी चिंता सोडून बिनधास्त सुटकेचा निश्वास सोडावा आणि जनतेची जमेल तशी कामे करायला सुरवात करावी. कारण निवडणुका परत लागतील, आज नां उद्या लोकांचा सामना करावा लागणार आहे.
हे ही वाच भिडू.
- ईव्हीएम मशीनबद्दल काय बोलला भिडू..?
- दारात गुलाबी पाण्याची बाटली ठेवली की कुत्री येत नाहीत, खरय का भिडू..!
- करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय रे भिडू…?