म्हणून भारताच्या पंतप्रधानांचे स्मारक पुण्याच्या एका छोट्याश्या खेड्यात आहे…
एखाद्या छोट्याश्या खेड्यात कोणाचं स्मारक असू शकतंय? गावातील एखाद्या ऐतिहासिक राजाचे, गावातीलच एखाद्या मोठ्या व्यक्तीचे, सरपंचाचे किंवा लय झालं तर तालुक्याच्या आमदाराचे किंवा त्या जिल्ह्यातील खासदाराचे. पण पुण्याजवळच्या एका छोट्याश्या खेड्यात भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचं स्मारक आहे.
गाव छोटंसं असले तरी यामागे असलेले कारण तेवढंच मोठं आहे.
चंद्रशेखर यांचं पर्यावरणप्रेम सर्वश्रुत होतं. विशेषतः पाणी या विषयात त्यांना जास्त रुची होती. त्यांचा त्यातील अभ्यास देखील तगाडा होता. आज २१ व्या शतकात जेव्हा देशापुढे एकीकडे सुकाळ आणि एकीकडे दुष्काळ असं संकट उभं राहिले आहे. मात्र चंद्रशेखर यांना या त्यांच्या प्रेमामुळे म्हणा किंवा अभ्यासामुळे म्हणा, आजच्या संकटाचा अंदाज बहुदा ३८ वर्षांपूर्वीच आला असावा.
कारण याच प्रश्नावरून त्यांनी १९८३ मध्ये जवळपास ४ हजार २०० किलोमीटरच्या पदयात्रेला सुरुवात केली होती.
६ जानेवारी १९८३ रोजी कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकापासून या पदयात्रेची त्यांनी सुरुवात केली होती. याचा उद्देश होता, लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी, उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण, आणि हरित पर्यावरण मिळावे, या सगळ्या प्रश्नांसाठी लोकांना जागरूक करणे हा होता. ही ४ हजार २०० किलोमीटरची पदयात्रा २५ जून १९८४ रोजी दिल्लीतील राजघाटावर पोहोचून संपन्न झाली.
याच जवळपास दिड वर्षाच्या यात्रामध्ये चंद्रशेखर यांनी भारतातील अनेक स्थळांना भेटी दिल्या. तिथलं वातावरण, पर्यावरण समजून घेतलं. तिथलं पाण्याचं नियोजन, यात असलेल्या अडचणी, सिंचन व्यवस्था, वृक्षारोपण याबद्दल समजून घेतले. याच दरम्यान त्यांनी तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश अशा राज्यांमध्ये भारत यात्रा केंद्राची स्थापना केली.
यातीलच एका भारत यात्रा केंद्राची स्थापना केली ती पुण्याच्या मावळ तालुक्यातील परंदवाडीमध्ये.
१९८३ मध्ये जवळपास ३५ एकर उजाड माळरानावर या केंद्राची स्थापना केली. उजाड माळरान असं म्हणण्याचं कारण म्हणजे ज्यावेळी या केंद्राची स्थापना करण्यात आली त्यावेळी हा संपूर्ण परिसर पूर्णपणे अविकसित होता. पाणी तर कित्येक किलोमीटरवरून आणावे लागायचे. अनेकदा चंद्रशेखर यांना उपाशी देखील झोपावं लागायचे.
या केंद्राचा विकास होतं असताना चंद्रशेखर यांनी स्वतः पुढाकार घेऊन जमिनीचे सपाटीकरण केले. तलाव खोदला. आजूबाजूच्या डोंगरावर स्वतः १० लाख झाड लावली. एकदा तर या वृक्षारोपणासाठी जवळपास अर्ध्या महाराष्ट्रातून झाड आणली होती. कालांतराने याच प्रयत्नातुन इथं विस्तीर्ण असं भारत यात्रा केंद्र उभं राहिले.
याच योगदानामुळे मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये परंदवाडी या गावात चंद्रशेखर यांचं स्मारक देखील उभारण्यात आलं आहे. त्यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, भारत यात्रा केंद्राचे विश्वस्थ सुधींद्र भदोरिया, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, खासदार आणि चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर असे सगळे दिग्गज उपस्थित होते.
आपल्या एकूण यात्रेदरम्यान चंद्रशेखर यांनी केरळ, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा ठिकाणी अशाच पद्धतीच्या भारत यात्रा केंद्राची सुरुवात केली आहेत. यातील मोठे भारत यात्रा केंद्र पदयात्रा संपन्न झाल्यानंतर भोंडसी गावात उभारण्यात आले आणि इथंच त्यांनी राहण्यास सुरुवात केली. इथं त्यांनी तब्बल २१ लाख झाड लावली. पाण्यासाठी मोठ्या तलावाची निर्मिती केली.
पुढे हि सगळी यात्रा केंद्र चालवण्यासाठी त्या त्या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करण्यात आले.
मात्र अलीकडच्या काळात या भारत यात्रा केंद्राची देखभाल करण्याची जबाबदारी केंद्र सरकारकडे द्यावी अशी मागणी होऊ लागली होती. स्वतः चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांनी याबद्दलच मत बोलून दाखवलं होतं. कारण आता त्या ट्रस्टवर असलेल्या अनेक लोकांचे निधन झाले आहे.
सोबतच भोंडसी आणि पुण्यामध्ये जागांचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे अनेकांची या केंद्राच्या जमिनींवर नजर आहे. जमिनीसाठी आजूबाजूच्या परिसरात वाद देखील आहेत. या सगळ्या कारणांमुळे इथंली देखभाल होऊ शकत नाही. म्हणून या यात्रा केंद्राची जबाबदारी केंद्र सरकारकडे द्यावी अशी मागणी करण्यात येत होती.
हे हि वाच भिडू
- पंतप्रधान चंद्रशेखर यांच सरकार दारात उभारणाऱ्या दोन हवालदारांमुळे पडलं होतं.
- व्ही. पी. सिंग आणि देवीलाल यांच्या वादात देशात मंडल आयोग लागू झाला.
- राष्ट्रपती शपथ देण्यासाठी तयार होते, पण प्रणबदांना शेवटपर्यंत पंतप्रधान होऊ दिले नव्हते
परंदवडी… परंतावडी नाही हो… पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील हा भाग आता बराच शहरी झाला आहे…