पंतप्रधान झाल्यापासून मोदीजी आजअखेर ७ वेळा रडले आहेत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा भावूक झाले. पहिल्या वाक्यात पुन्हा लिहायचं राहिलं होतं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या मतदारसंघातील म्हणजेच वाराणसी येथील डॉक्टरांनी संवाद साधला.

या संवादा दरम्यान त्यांचा कंठ दाटून आला. एकदी एक वेळी अशी आली की पंतप्रधांनांचा संयम आत्ता तुटेल अस वाटलं. काही काळ ते थांबले. मात्र त्यांच्या डोळ्याच्या कडा मात्र ओल्या झाल्याच. 

करोनाच्या दूसऱ्या लाटेत डॉक्टर, नर्स, टेक्निशियन्स, वॉर्डबॉय, एम्ब्युलन्स ड्रायव्हर अशा सर्वांच्या कामाचे कौतूक करत असतानाच त्यांनी कठोर परिश्रम घेतले तरी आपल्या कुटूंबातील लोकांना आपण वाचवू शकलो नाही. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावून घेतलं असे सांगत असताना मोदीजी आज भावूक झाले.

https://www.facebook.com/narendramodi/videos/929216371244308

 

पण मोदी असे सार्वजनिक जीवनात भावुक होण्याची पहिलीच वेळ नव्हती. सत्तेत आल्यापासून याआधी ते ७ वेळा भावुक झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

१. संसदीय दलाचा नेता म्हणून निवडल्यानंतर : 

दिनांक : २० मे २०१४, सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट, दिल्ली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळालं होतं. निकाल हाती आल्यानंतर संसदीय दलाची बैठक पार पडली, आणि त्यात नरेंद्र मोदी यांना नेता म्हणून निवडलं गेलं. त्यावेळी या बैठकीला संबोधित करताना पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी म्हणाले होते,

या ऐतिहासिक प्रसंगातून जाणं ही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची कृपा आहे,  

यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी यांची बोलण्याची वेळ आली तेव्हा ते म्हणाले,

आता डवाणी यांनी एक वाक्य वापरलं, पण मी त्यांना विनंती करतो की, हे वाक्य पुन्हा म्हणू नये.

जशी भारत माता आहे तसेच भाजप देखील माझी माता आहे. आणि आईची सेवा करणे ही कधीच कृपा असू शकत नाही. असं म्हणत ते भावूक झाले होते.

या व्हिडिओमध्ये १३ मिनिट ४५ सेकंदापासून हे दृश्य बघू शकता. 

 

२. फेसबुक हेडऑफिस

दिनांक : २८ सप्टेंबर २०१५, कॅलिफोर्निया-अमेरिका.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्याच्या १ वर्षानंतर फेसबुकच्या मुख्यालयात गेले होते. तिथं त्यांचा अमेरिकेमध्ये राहत असलेल्या भारतीयांसोबत एक प्रशनोत्तरांचा सेशन होता. होस्ट होते फेसबुकचे CEO मार्क जकरबर्ग.

इथं बोलताना मोदींनी आपला सुरुवातीचा प्रवास आणि आई-वडिलांचा उल्लेख करत भावनिक झाले होते. 

म्हणाले,

मी अत्यंत गरीब कुटुंबातून येतो, आपल्याला तर कल्पना आहेच मी रेल्वे स्टेशनवर चहा विकत होतो.

पुढे कुटुंबीयांचा उल्लेख करत असताना म्हणाले,

अतिसामान्य कुटुंबामध्ये कशी गुजराण करायची, त्यात माझे वडील तर सोडून गेले आहेत, आईचं वय ९० वर्षापेक्षा जास्त आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला सगळे नीट मिळावे म्हणून आई शेजारच्यांच्या घरी धुनी-भांडी, मोजमजुरी करायला जायची. असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.

या व्हिडीओमध्ये ४२ मिनिटानंतर हे दृश्य पाहू शकता. 

३. नोटबंदीनंतर 

दिनांक : १३ नोव्हेंबर २०१६, गोवा.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना, नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर लोकं आपल्या कडील नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं होतं. अनेक अफवा पसरल्या होत्या, लोकांना प्रचंड त्रासाला समोर जावं लागल्याचं सांगितलं जात होतं.

५ दिवसानंतर १३ तारखेला पंतप्रधान गोव्यात एका कार्यक्रमाला गेले होते.  इथे नोटबंदीच्या निर्णयावर बोलताना ते भावनिक झाले होते, त्यावेळी ते म्हणाले, 

या देशात इमानदार लोकांची संख्या कमी नाही, त्यामुळे तुम्ही पण या, इमानदारीच्या या कामात मला साथ द्या. मला माहित आहे मी कोणकोणत्या शक्तींसोबत वाईटपणा घेतला आहे.

मला माहित आहे कि, कोणकोणते लोक माझ्या विरोधात जाणार आहेत. मला हे देखील माहित आहे की, ते मला जिवंत सोडणार नाहीत, मला बर्बाद करतील, पण त्यांना जे करायच आहे ते करू दे.

या व्हिडीओमध्ये १ मिनिटानंतर तुम्ही तो प्रसंग बघू शकता. 

४. नॅशनल पोलीस मेमोरियलच्या उद्घाटन वेळी

दिनांक : २१ ऑक्टोबर २०१८. दिल्ली

स्वातंत्र्यानंतर आज पर्यंत आपली सुरक्षा करताना केंद्र आणि राज्य मधील जवळपास ३५ हजारपेक्षा जास्त पोलीस शाहिद झाले आहेत, या शहिदांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदी यांनी २१ ऑक्टोबर २०१८ रोजी नॅशनल पोलीस मेमोरियलच उदघाटन केलं होतं.

यावेळी पोलिसांच्या बलिदानावर बोलताना मोदी भावूक झाले होते. ते म्हणाले,

मी देशवासियांना सांगू इच्छितो कि मागच्या काही वर्षात जेव्हा केव्हा नैसर्गिक संकट ओढवत तेव्हा तुम्ही NDRF, SDRF लिहिलेल्या जवानांना दिवस-रात्र मेहनत करताना बघितले असेल, पण देशवासियांना माहित नाही की, तेच खाकी वर्दीमधील माझे पोलिस असतात. देश त्यांच्या सेवेला, त्यांच्या समर्पणाला आणि साहसाला कधीच विसरू शकत नाही. 

पुढे ते म्हणतात, अनेकांना हे देखील माहित नसत की, एखादी इमारत पडल्यानंतर, नाव दुर्घटना झाल्यानंतर, कुठे आग लागल्यानंतर बचावाचे काम करणारे जवान कोण असतात.

या व्हिडीओमध्ये ४४ मिनिट ३५ सेकंदानंतर तुम्ही तो प्रसंग बघू शकता. 

५. कोरोना व्हॅक्सिनेशन ड्राइव्ह लॉन्च करताना 

दिनांक : १६ जानेवारी २०२१, दिल्ली.

संपूर्ण जग मागच्या जवळपास १ वर्षांपासून कोरोनासारख्या भीषण महामारीला तोंड देत होते. मात्र अखेरीस १६ जानेवारी २०२१ रोजी भारतात  कोरोना व्हॅक्सिनेशन ड्राइव्ह सुरु केलं. हे अभियान सुरु करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला, आणि त्यावेळी भावनिक होत ते म्हणाले,

आपल्या घरातच लहान मुलांना आपल्या आई-वडिलांपासून लांब राहण्याची वेळ आली, अनेक वयोवृद्ध लोकांना हॉस्पिटलमध्ये एकट्याला मारला तोंड द्यावं लागलं. मुलांची इच्छा असून देखील ते जवळ जाऊ शकत नव्हते. सोबतच जे आपल्याला सोडून गेले त्यांना परंपरेनुसार निरोप देखील देऊ शकलो नाही. 

जेवढं आपण त्या वेळेबद्दल विचार करू तेव्हा मन हळवं होतं. सोबतच फ्रंटलाइन वर्कर्सचा उल्लेख करत मोदी म्हणाले,

त्यांनी मानवतेला प्राधान्य दिले. आपल्या कुटुंबापासून लांब राहीले, आपले अनेक सोबती असे देखील आहेत जे आता कधीच परतू शकत नाहीत.

या व्हिडीओमध्ये १९ मिनिटांपासून तुम्ही तो प्रसंग बघू शकता. 

 

६. गुलाब नक्बी आझाद यांचा निरोप समारंभ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गुलाब नबी आझाद यांच्या निरोप समारंभावेळी बोलता-बोलता अचानक रडू लागले होते त्यावेळी ते इतके भावनिक झाले होते की, भाषणमध्येच थांबवावं लागलं होतं. त्यांनी आझाद यांच्या सोबत आपल्या मैत्रीपूर्ण आठवणी जागवल्या. काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना त्यांनी डोळ्यातील अश्रु पुसत पुसतच सांगितली.

ते म्हणाले,

ज्यावेळी गुजरातच्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, त्यामध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. तेव्हा ते अश्रू रोखू शकले नव्हते. पण त्या घटनेत त्यांनी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडकल्यासारखं काम केलं होतं.

हा झाला पंतप्रधान झाल्या नंतर जाहीर कार्यक्रमातला मोदींच्या रडण्याचा आकडा. आपले पंतप्रधान भावुक आहेत हे यातून सिद्ध होतं. पण याच मोदींनी काही निर्णय असे घेतले आहेत की विरोधकांना, कधी परकीय शत्रूला तर कधी खुद्द जनतेला देखील रडू आलंय.

 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.