फक्त मोदीच नाही, तर गुजरातची ही डेअरी सुद्धा वाराणसीमध्ये पाय रोवतेय

डेअरी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर छोटासा गोठा आणि दुधाचे कॅन हे चित्र आता येत नाही. कारण इतर सगळ्या व्यवसायांप्रमाणं डेअरी व्यवसायही आता हायटेक झालाय. कित्येक घरांना, गावांना सुबत्त करण्यात डेअरी व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. दुग्ध व्यवसायांमध्ये देशात गुजरात अग्रेसर राज्यांपैकी एक मानलं जातं. याच गुजरात राज्यात सुरू झालेल्या बनास डेअरीनं फक्त देशातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात नाव कमावलं.

ही डेअरी सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाराणसी दौऱ्यात करखियाव इथं बनास डेअरी संकुलाचं भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार असल्यानं या कार्यक्रमाला चांगलंच महत्त्व प्राप्त झालं आहे.

ऑक्टोबर १९६६ मध्ये या डेअरीला सुरुवात झाली, आणखी तीन वर्षांनी म्हणजेच १९६९ मध्ये सहकारी तत्वावर या डेअरीची नोंदणी झाली. बनासकांठा हा गुजरातमधला तुलनेनं मागास देश. पाऊस नसल्यानं इथं पाण्याचे आणि पर्यायानं शेतीचे वांदे होते. पण सहकारी तत्वावर सुरू झालेल्या दुग्ध व्यवसायानं या जिल्ह्यात क्रांती घडवली. थोडा-थिडका नाही तर, आशियामध्ये सर्वात जास्त दुग्ध उत्पादनांचा जिल्हा बनला आहे.

बनास डेअरी दिवसाला जवळपास ५० लाख लिटर दूध गोळा करतं. या दुधासोबतच बटर, आईस्क्रीम, चीज आणि इतर दुग्ध उत्पादनांच्या जोरावर शेतकऱ्यांना नफा मिळतो. कधीकाळी पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या बनासकांठामध्ये आता पशुपालन आणि दुग्धव्यवसाय हे गेमचेंजर ठरले आहेत.

गुजरातमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर, बनास डेअरीनं बाहेरच्या राज्यात पाऊल टाकायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशची निवड केली. उत्तर प्रदेशमध्ये गुजरातच्या चौपट दूध संकलन होतं. मात्र संकलन आणि वितरण व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याचं, सांगितलं जातं. त्यामुळं, २०१७ मध्ये बनास डेअरीनं उत्तर प्रदेशमध्ये लखनऊ आणि कानपूरमध्ये फॅक्टरीला सुरुवात केली. तेव्हा बनास डेअरी उत्तर प्रदेशमध्ये दिवसाला साधारण ३ लाख लिटर दूध गोळा करत होती.

बनास डेअरीचे अध्यक्ष शंकर चौधरी सांगतात, ‘फक्त दूध गोळा केलं आणि विकलं म्हणजे सहकार नाही. आम्ही जनावरं आजारी पडल्यावर त्यांना मोफत उपचार मिळतील अशी सुविधा केली आहे. सोबतच चाऱ्याच्या फॅक्टऱ्यांमध्ये वैज्ञानिक पद्धतीनं चारा बनवतो, ज्यामुळं प्राणी जास्त दूध देतात. आता वाराणसीमध्ये सुरू होणाऱ्या प्रकल्पामुळं वाराणसीसोबतच मिर्झापूर, गाजीपूर, आझमगढ, जौनपूर, मछलीशहर, चंदौली, भदोहीमधल्या हजार गावांमधल्या शेतकऱ्यांना लाभ होईल. दुधाच्या बदल्यात त्यांना महिन्याला साधारण आठ ते दहा हजार रुपये मिळतील.’

या नव्या संकुलामुळं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेक रोजगार निर्माण होतील, असाही दावा चौधरी यांनी केला आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूध उत्पादकांना ३५ कोटी रुपयांचा बोनसही ट्रान्सफार करण्यात येणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.