खर्च झेपणार नाही म्हणून नरसिंहराव रामटेकमध्ये खासदारकी लढवायला तयार नव्हते.

राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आली. ते पंतप्रधान बनले. तस बघायला गेलं तर हे अल्पमतातील सरकार होतं. कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज नेते कुरघोडी करण्यासाठी तयार होते पण नरसिंहराव यांनी चतुराईने सगळ्यांची मोट बांधली होती. खरं तर नरसिंहरावांची ओळखच मुळी काँग्रेसचे चाणक्य अशी होती.

पण या चाणक्याकडे १९८९ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील पैसे नव्हते. 

तर १९८९ च्या शेवटी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे ठरल होत. त्या निवडणुकांना नरसिंह रावांनी उभं राहणार नसल्याचा आपला निर्णय राजीव गांधींना सांगितला होता. त्याला दोन कारणे होती. एक तर काँग्रेसमधील मूल्यात्मक बदलांमुळे, नव्या राजकीय संस्कृतीमुळे ते व्यथित झाले होते. आणि आश्चर्य वाटेल अशी दुसरी अडचण होती ती आर्थिक.

निवडणुकीचा खर्च झेपणे नरसिंह रावांना शक्य नव्हते. कारण चुकीच्या मार्गाने त्यांनी पैसा कमावलेला नव्हता. सतत अधिकारपदावर राहिलेल्या व्यक्तीचे हे कारण सर्वसामान्यांना न पटणारे आहे, पण ते सत्य होते.

नरसिंह रावांच्या इच्छेला मान देऊन त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. पण त्यांच्यासारख्या व्यक्तीची साथ सोडणे राजीव गांधींना शक्य नव्हतं. कारण राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना पाच वर्षे नरसिंह रावच त्यांचे खरे सल्लागार होते. राजीव गांधींची काम करण्याची स्टाईल थोडी हटके होती. ते रात्री तीन-साडेतीनपर्यंत काम करायचे. सर्व बैठकासुद्धा याच वेळात व्हायच्या आणि अधूनमधून ते नरसिंह रावांनासुद्धा बोलावून घेत. म्हणून नरसिंह रावांच्या पोर्चमध्ये चोवीस तास गाडी व चालक तयार असायचा. अशा व्यक्तीला सोडणे खरं तर राजीव गांधींना पण अवघडच वाटत होत.

शेवटी लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी दोनच दिवसच राहिले असताना संपूर्ण आर्थिक मदत पक्षाकडून दिली जाईल असे आश्वासन देऊन त्यांना पुन्हा रामटेक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. 

अर्ज भरल्यानंतर तेथील आढावा घेतला तेव्हा नरसिंह रावांच्या लक्षात आले की, ‘आंध्रचे पार्सल परत पाठवा’ अशी भावना मतदारांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याला कारण ही तसंच होतं.

बोफोर्स घोटाळा, शाहबानो प्रकरण, रामजन्मभूमी आंदोलन या गोष्टी काँग्रेसच्या विरोधात जाऊ लागल्या होत्या.  रावांच्या विरोधात जनता दलाने तिकीट दिलं रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांना. पांडुरंग हजारे हे राजकारणात मोठं नाव नव्हतं पण स्थानिक पातळीवर रामटेकच्या विकासासाठी त्यांनी भरीव कामगिरी  केलं होतं. 

आता हे जरी असलं तरी एकंदरीत जनतेचा नरसिंह रावांना भरपूर पाठिंबा होता. याची कारण म्हणजे आधीची पाच वर्षे मतदारसंघात फिरत असताना मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच ते वावरत होते आणि मतदारसंघ व मतदारांची कामं चोखपणे करीत होते. पत्रव्यवहाराने सतत संपर्क ठेवून होते.

आता खर्चाचा विषय आला, तेव्हा प्राथमिक खर्चाची रक्कम नरसिंहरावांचे सचिव राम खांडेकर यांच्याकडे देऊन अर्ज भरल्यानंतर नरसिंह राव पक्षाच्या कामासाठी दिल्लीत गेले. नंतर उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिवशी रात्री दोन-तीन दिवसांच्या मुक्कामासाठी ते नागपूरला परत आले. स्थानिक कार्यकर्ते, आमदारांसोबत बसून निवडणूक प्रचाराची रूपरेषा ठरवली. खांडेकरांसोबत खर्चाचा आढावा घेऊन रकमेचा दुसरा हप्ता त्यांच्या स्वाधीन केला.

तीन दिवस प्रचार करून पाकिस्तानमध्ये असलेल्या एका आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी ते दिल्लीला गेले. दोन दिवसांची बैठक आटोपून दिल्लीत परतल्यानंतरही पाच-सहा दिवस ते मतदारसंघात जाण्यासाठी नागपूरला आलेच नाहीत. आमदार, कार्यकर्ते सतत ‘ते का येत नाहीत, प्रचार थंडावत चाललाय, असे कसे चालेल’ वगैरे मतं नोंदवून नाराजी व्यक्त करीत होते.

त्याच कारण होतं एकदा मागूनही कोषाध्यक्षांनी त्यांना पैसे दिले नाहीत. मात्र राजीव गांधींना जेव्हा हे कळल तेव्हा त्यांनी स्वत: व्यवस्था करून दिली. एवढच काय, तर वाया गेलेल्या वेळेची भरपाई व्हावी म्हणून चार दिवसांसाठी हेलिकॉप्टरसुद्धा देण्याबाबत संबंधीतांना सूचना दिल्या. पुढील रक्कम कोणाकडून घ्यायची, हे देखील सांगितले. ही रक्कम खांडेकरांच्या स्वाधीन करून ते प्रचारासाठी बाहेर पडले. नरसिंह रावांची ही निवडणूक म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखी ठरली. इतक्या कमी पैशांत निवडणुकीचा खर्च करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखचं होत.

नरसिंह रावांसारख्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेल्या नेत्याला त्या निवडणुकीत फार कटू अनुभव आले. महत्त्वाचं म्हणजे घरासमोर गाडय़ांचा ताफा असूनही फारस कोणी प्रचारासाठी आपली गाडी काढायचं नाही. आजूबाजूच्या मतदारसंघांत गाडय़ांचे ताफे फिरत असताना खांडेकरांनी  मोजक्याच जीप्स भाडय़ाने घेऊन विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एक जीप दिली होती. त्या निवडणुकीची सर्व मदार कार्यकर्त्यांवर होती. कारण ते निष्ठेने काम करत होते.

कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणे शक्य नव्हते. यामुळे त्यांची नाराजी पत्करावी लागली. कार्यकर्त्यांसाठी पितळी पंजाचे बिल्ले वगैरे बाजूलाच असलेल्या दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवाराच्या कार्यालयातून घेऊन यावे लागत. कारण ते तयार करून घेणे खर्चात बसत नव्हते. अशा अडचणींना तोंड देत राव निवडून तर आले पण त्यांचं मतदान घटलेलं.

रामटेक मध्ये राव यांचं घटलेलं मतदान राजीव गांधी यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली. वयोमान झालेल्या नरसिंह राव यांना राजकीय अडगळीत टाकण्यात आलं. १९९१ साली आलेल्या निवडणुकीत तर त्यांना रामटेकमधून तिकीट देखील दिल गेलं नाही. हे सगळं झालं पांडुरंग हजारे यांच्यामुळे.

पण दैव म्हणावे कि योगायोग राजकीय संन्यास घेतलेले नरसिंह राव पुढच्या दोनच महिन्यात देशाचे पंतप्रधान बनले. मात्र यावेळी त्यांनी रामटेकच्या ऐवजी आंध्र प्रदेश मधून लोकसभा लढवली आणि तब्बल ५ लाख मतांनी निवडून आले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.