सुगंधी तेल ते सोन्याचा मुकुट…असा आहे प्रिन्स चार्ल्सचा राज्याभिषेक शाही सोहळा…

६ फेब्रुवारी १९५२ ला केनियाच्या जंगल सफारीचा आनंद घेत असताना किंग जॉर्ज सहावे यांच्या मृत्यूची बातमी आली, आणि मचाणावर बसून प्राण्यांचे फोटो काढत असलेली ब्रिटनची राजकुमारी म्हणून चढलेली एलिझाबेथ काही तासांमध्ये इंग्लंडची राणी म्हणून खाली उतरली.

आणि बऱ्याच मतभेदानंतर १९५३ साली एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला.

त्यानंतर आता तब्बल ७० वर्षांनी ब्रिटिश राजघराण्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडतोय. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतरच प्रिन्स चार्ल्स यांना सम्राटाचा दर्जा मिळाला होता मात्र आता त्यांचा विधीवत राज्याभिषेक करण्याची शाही परंपरा आज पाळली जाणार आहे.

सुमारे १०० देशांचे राष्ट्रप्रमुख आणि राजघराण्यांचे प्रमुख या काळात हजार वर्ष जुन्या परंपरेचे साक्षीदार असतील. इसवी सन १०६६ पासून चालत आलेल्या ब्रिटनच्या राजेशाहीतील चाळीसावे राजे म्हणून चार्ल्स कार्यभार बघतील. राजाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बकिंगहम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर ॲबीपर्यंत मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात होईल.

फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या सोहळ्यामध्ये कोणत्या पारंपारिक प्रथा असणार आणि कोणता बदल असणार ते आता आपण जाणून घेऊ..

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कारकिर्दीच्या ६०व्या वर्षपूर्तीनिमित्त पारंपरिक बग्गीत बदल करून एक नवीन डायमंड ज्युबिली स्टेट कोच म्हणजेच सहा घोड्यांची विशेष बग्गी ऑस्ट्रेलिया मधून तयार करून घेण्यात आलेली होती. या बग्गीतून राजे चार्ल्स तृतीय आणि कॅमेला शाही मिरवणुकीसह बकिंगहॅम पॅलेसपासून वेस्टमिनिस्टर ॲबीला पोहचतील. असं म्हटलं जातं, की या बग्गीतून केवळ राजघराण्यातील प्रमुख व्यक्तीच जाऊ शकते. राज्याभिषेकाच्या वेळी एक सिल्क स्टॉकिंग आणि झूल, झालर असलेल्या ब्रीचेसचा विशिष्ट पोशाख राजाला परिधान करायचा असतो. पण चार्ल्स या शाही सोहळ्याला मिलिटरी युनिफॉर्म मध्ये असतील असं सांगण्यात आलं आहे.

आता बघू ॲबीमध्ये पोचल्यावर कशाप्रकारची रचना आणि कार्यक्रम असेल?

ॲबीमधला धार्मिक सोहळा सकाळी ११ वाजता चर्चमधील संगीताच्या सानिध्यात सुरू होईल. या सोहळ्यात किंग चार्ल्स यांचा नातू प्रिन्स जॉर्ज ‘पेज ऑफ ऑनर’ म्हणजे मानाच्या सुभेदारांपैकी एकाची भूमिका निभावणार आहे. ॲबीच्या आत किंग चार्ल्स यांच्या मागोमाग मिरवणुकीतून पोहोचणाऱ्या व्यक्ती राजघराण्याची शाही वस्तू आपल्याबरोबर आणतील. या शाही वस्तू चर्चच्या वेदीवर म्हणजे आल्टरवर ठेवल्या जातील. धार्मिक विधींच्या गरजेनुसार त्या वेदीवरूनच उचलल्या जातील.

आता या शाही वस्तू म्हणजे रिगेलिया काय आहेत ते बघू.

रॉयल फॅमिली वेबसाइटच्या मते, रिगेलियाचा अजूनही वापर करणारे यूके हे युरोपातलं एकमेव राष्ट्र उरलं आहे. रिगेलिया म्हणजे शाही दंडक, मुकुट, राजदंड, ऑर्ब अशा प्रतिकात्मक वस्तू ज्यांचा वापर ब्रिटीश राजघराणं अजूनही राज्याभिषेकासारख्या सोहळ्यात करतं.

ह्या फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ब्रिटीश राजघराणाच्या राज्याभिषेक सोहळयात अनेक टप्पे आहेत, त्यातला पहिला टप्पा म्हणजे द रेकग्निशन..

यात ७०० वर्ष जुनं असलेल्या सिंहासनाच्या बाजूला उभं राहून कॅटेनबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बाय चार्ल्स यांचं नाव उच्चारत “अनभिषिक्त सम्राट” असं म्हणतील आणि त्यानंतर धार्मिक विधींना सुरुवात होईल. याच राजखुर्चीवर किंवा सिंहासनावर बसवून आतापर्यंत २६ राजा-राण्यांचा राज्याभिषेक झाला आहे.

  • दुसरा टप्पा म्हणजे द ओथ.

कॅटेनबरीचे आर्चबिशप किंग चार्ल्स यांना शपथ देतील. संपूर्ण कार्यकाळात कायदा आणि चर्च ऑफ इंग्लंड यांची रक्षा करण्याची ही शपथ पवित्र गॉस्पेलवर हात ठेवून घेण्यात येईल. असं म्हटलं जातंय की किंग चार्ल्स आपल्या शपथपत्रात ब्रिटनमधल्या बहुधर्मीयत्वाची साक्ष देण्यासाठी काही शब्द नमूद करणार आहेत.

  • शपथविधी पार पडल्यानंतर तिसरा टप्पा चालू होईल म्हणजे द अनॉइंटिंग

ब्रिटीनचा राजा हा चर्च ऑफ इंग्लंडचाही प्रमुख असतो. हे धार्मिक महत्त्व जाणवून देऊन राजाचं देवत्त्व सिद्ध करण्यासाठी हा अनॉइंटिंगचा सोहळा करण्यात येतो. अनॉइंटिंग हा अध्यात्मिक सोहळा असून त्यामध्ये सुगंधी तेलाचे थेंब व्यक्तीच्या डोक्यावर सोडतात. इथे राज्याभिषेकाच्या वेळी आर्चबिश सोन्याच्या गडूतून ‘कोरोनेशन स्पून’वर सुगंधी तेलाचे काही थेंब घेतील.

मग चमच्यातलं तेल राजाच्या डोक्यावरून, छातीवरून आणि हातांवरून क्रॉसच्या आकारात सोडण्यात येईल. याला एक मौखिक कथा आहे, १२ व्या शतकात व्हर्जिन मेरी सेंट थॉमस बेकेटसमोर (इंग्लंडमधील आर्चबिशप) प्रकट झाली आणि तिने त्याला सोन्याचा गरूड असलेला अँप्युला दिला, असं म्हटलं जाते. ख्रिस्ती धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या जेरुसलेमच्या माउंट ऑफ ऑलिव्ह्जमधल्या शेतात पिकलेल्या ऑलिव्हपासून तयार केलेलं हे तेल आधी लंडनच्या चर्चमध्ये धार्मिक मंत्रांनी पवित्र केलं जातं आणि मग हे पवित्र तेल राज्याभिषेक सोहळ्यात वापरण्यात येतं. हा विधी फार पवित्र मानलं जात असल्यामुळे, इतर लोकांनी हा पाहू नये म्हणून राजाच्या डोक्यावर एक छत्र धरलं जातं.

  • त्यानंतर येतो मुकूट परिधान करण्याचा सोहळा तो म्हणजे द इन्व्हेस्टिचर..

आताचे राजे किंग चार्ल्स (तृतीय) ‘सेंट एडवर्ड क्राउन’ हा मुकुट चढवणारे सातवे राजे ठरणार आहेत. आधी राजांना सोव्हरिन रॉब, कोरोनेशन रिंग, क्रॉस चिन्हांकित राजदंड आणि कबुतराच्या प्रतिमेचा राजदंड या शाही वस्तू भेट देण्यात येतील. त्यानंतर आर्चबिशप यांच्या हस्ते सेंट एडवर्डचा मुकुट किंग चार्ल्स यांना चढवण्यात येईल.

ट्रम्पेटचा गजर होईल आणि संपूर्ण देशभरातून बंदुकांची सलामी दिली जाईल. जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेल्या टॉवर ऑफ लंडनमधून ६२ तोफांची सलामी देण्यात येईल. घोडदळाची परेडही राजांच्या सलामीसाठी असेल. यूकेमधील एडिंबरा, कार्डिफ आणि बेलफास्ट अशा आणखी ११ ठिकाणांहून २१ फैरी झाडून सलामी देण्यात येईल. रॉयल नेव्हीच्या जहाजांवरूनही अशा फैरी झाडण्यात येतील.

मुकूट परिधान करून राजाला राजसिंहासनावर बसवण्यात येते, त्याला द एन्थ्रोन्मेंट असं म्हणतात. शाही परिवारातील इतर सदस्य आणि राजगादीचे वंशज पुढे येऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन राजाच्या उजव्या हाताचं चुंबन घेतात. त्यानंतर राणी कॅमिला यांना मुकूट परिधान केला जाईल. राजा आणि राणी दोघांनाही राजेशाहीपदाची सर्व सूत्र दिल्यावर दोघंही पुन्हा बकिंगहम पॅलेसला जातील.

तिथून जमलेल्या सर्व नागरिकांना दोघंही अभिवादन करतील. आर्मी, रॉयल नेव्ही आणि रॉयल एअर फोर्स यांचं मिळून आकाशात संचालनाद्वारे नवीन राजा-राणींना सलामी दिली जाईल.
ब्रिटिश राजेशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध, हिंदू, ज्यू, मुस्लिम आणि शीख धर्मगुरूही राज्याभिषेकाच्या विधीत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक व त्यांची पत्नी उपस्थित राहतील. राजा चार्ल्स न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह १५ देशांचा सम्राट होणार या अर्थाने ही परंपरा खूप महत्त्वाची आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.