राजघराण्याचा विरोध डावलून शाहू महाराजांनी आपल्या सूनबाईंना शिकवलं होतं

लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पुष्कळदा असे दिसते की त्याच्या चरित्रातले व्यक्तिगत असे संदर्भही त्यांच्या कार्याच्या संदर्भात बोलके ठरतात, महत्त्वाचे ठरतात आणि मौलिक ही ठरतात.

राजर्षी शाहू छत्रपतींच्या बाबतीत ही गोष्ट त्याच्या सूनबाईच्या संदर्भात लक्षात येते. आणि राजर्षींचे स्त्री शिक्षणासंबंधीचे विचार त्यांच्या वास्तव आयुष्याशी असे जोडलेले दिसतात की त्यातून त्याची थोरवी सहज प्रतीत होत राहते.

राजर्षी शाहू प्रवृत्तीन जसे उदार होते, समंजस होते तस ते काळाची पावले ओळखणार द्रष्टे ही होते.

शिक्षणाच्या बाबतीत विशेषता स्त्री शिक्षणाच्या बाबतीत अशा प्रकारचे अनुकूल आणि प्रोत्साहक विचार बाळगणाऱ्या राजांना आपली सून बुद्धिमान असावी असे वाटायचे. इंदुमती राणीसाहेबांची निवड सून म्हणून केली ती केवळ त्यांच्या रूपामुळे नव्हे तर त्यांच्या हुशारीमुळे, धिटाईमुळे, बुद्धिमत्तेमुळेही.

इंदुमती राणीसाहेब राजर्षींच्या घरात सून म्हणून आल्या त्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी. लग्नाआधी ती नऊ वर्षांची जमना जगताप होती. सासवडला शंकरराव जगताप हे शिवरायांच्या सेवेतल्या घराण्याचे वंशज होते. पुरंदर गडाच्या पागेचे काम सांभाळणाच्या जगताप घराण्याला लहानसे इनामही शिवकाळापासून मिळत होते.

छत्रपतींचे चिरंजीव शिवाजीराजे यांच्यासाठी राजधानी जमनाची निवड केली पण ही निवड नुसता मुलगी पाहून, घरदार पाहून नक्कीच नव्हती. त्यांना कागलच्या खासबागेत दिवाण सर रघुनाथराव सबनीसांकरवी जमनाची वधुपरीक्षा घेतली.

दिवाणबहादुरांनी जमनाला विचारले, ‘ बोका’ चे स्त्रीलिंग काय ? जमनाने अचूक उत्तर दिले ‘माटी’ मग एक साधासा पण चकवणारा प्रश्न तिला विचारला गेला ‘चमचा’ ची विभक्ती सांग. जमनाने प्रथमा असे उत्तर देऊन तिथेही सर्वांचे समाधान केले.

वडीलाबरोबर कागलला आलेली जमना परत सासवडला परतली ती कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घरची सून होण्याची निश्चिती होऊनच.

जून, १९१७ मध्ये मोठ्या थाटाने राजर्षींच्या घरात ती आली आणि वर्ष उलटून सहाच दिवस झाले तो ती विधवाही झाली. रानडुकराच्या शिकाराला गेलेले शिवाजीराजे घोड्यावरून पडले ते पुन्हा उठलेच नाहीत.

इंदुमती अवघी अकरा वर्षांची होती. आत्ताच्या हिशेबाने अवघी सहावीतली मुलगी लग्नाचा अर्थसुद्धा तिला पुरता कळला नसेल किती कोवळ वय आयुष्याची नुकतीच कुठे सुरुवात व्हायची होती अशावेळी विधवाच झाली. आणि त्या काळची विधवा म्हणजे अपार दुर्दैवाची धनीण. तिला अपशकुनी समजले जायचे संसारातील कोणतीही सुखे तिच्यासाठी नसायची, अपमान उपेक्षा आणि दुःख हेच तिचे भाग्य.

राजर्षी पुत्र निधनाने व्याकुळ झाले तसेच सुनेच्या चिंतेने व्याकुळ झाले. उभ आयुष्य या लहानग्या मुलीने काढायचे तरी कसे? एक सहकारी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ दादासाहेब तोफखाने राजर्षींच्या दरबारी होते. राजर्षी त्यांना म्हंटले,

तोफखाने, आता सुनबाईचे मी काय करू?

दादासाहेबानी सुचविले आपण त्यांना शिक्षण द्यावे. विचारांती राजर्षींनी इंदुमती देवींना शिकवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय काही सोप्पा नव्हता.

सामान्य कुटुंबामधल्या स्त्रियांना होत्या त्याहीपेक्षा अधिक मर्यादा राजघराण्यातील स्त्रियांना होत्या. इंदुमती राणीसाहेबांना शिक्षण द्यावे, त्यांना इंग्रजी आणि संस्कृत दोन्ही भाषा आणि साहित्य यांच शिक्षण देऊन संस्थाच्या शिक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे द्यावी असा विचार राजर्षींनी केला. त्यांच्या निकटवर्तीय माणसांपुढं ही कल्पना मांडली.

तेव्हा प्रथम राजकुटुंबातून होणाऱ्या विरोधाची काळजी त्यांनी बोलून दाखवली. शिक्षण ही गोष्ट बाईला वर्ज्य. छत्रपतींनी मात्र या विरोधासाठी मनाची पूर्ण तयारी केली. भास्करराव जाधव, बंधू बापूसाहेब महाराज यांच्यासारख्या जाणत्या मंडळाशी चर्चा केली आणि सूनबाईना शिकविण्याचा निर्णय घेतला.

त्या दृष्टीने योग्य शिक्षकांची निवड करण्याचे काम त्यांनी तोफखाने यांच्यावर सोपविले. पाच शिक्षकांची निवड केली आणि इंदुमती राणीसाहेबांबरोबर शिकण्यासाठीही आणखी चार मुली निवडल्या गेल्या. त्या मुलीमध्ये एक तर ख्रिस्ती मुलगी होती.

इथवर सारे तर ठरविले. पण कोल्हापूरला राहून राजवाड्यातच या प्रकारची गोष्ट काही वर्ष सातत्याने चालू ठेवणे अशक्य होते. खुद्द लक्ष्मीबाई राणीसाहेबांचा या गोष्टीला तीव्र विरोध होता. अशा परिस्थितीतून राजधींनी निग्रहाने मार्ग काढला. कोल्हापूरजवळ सोनतळीला राजर्षींचा एक बंगला होता.

त्या बंगल्यात त्यांनी इंदुमती राणीसाहेबांची शाळा सुरू केली. राणी साहेबांसाठी जे शिक्षक नेमले होते त्यातले एक शिक्षक भार्गवराम कुलकर्णी हे थोडे तापट आणि विक्षिप्त होते. राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काही काळ कामही केले होते. ते शिक्षक म्हणून फार उत्तम होते. शिक्षक म्हणून त्यांच्या विक्षिप्त स्वभावाची कल्पना जेव्हा दिली गेली तेव्हा राजर्षी चटकन म्हणाले,

माझ्या सुनेला ते जोवर उत्तम विद्या देत आहेत तोवर त्यांनी माझा मान राखला नाही तरी चालेलं. उलट मीच त्यांना नमस्कार करीन. राजर्षीचे हे उदगार विलक्षणच म्हटलं पाहिजेत.

एका मोठ्या हेतूने ते इंदुमतीदेवीच्या शिक्षणाची तजवीज करीत होते. आणि तो हेतू त्याच्यासाठी खरोखर थोर होता. तो साध्य करताना वैयक्तिकाची थोडी देखील परवा त्यांनी केली नाही. घरातल्या नाराज मंडळांनी काही काळ राजर्षींना मुजरा करायचेही बंद केले. पण ती नाराजी त्यांनी ठामपण स्वीकारली आणि सर्व प्रकारच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा, मानापमानाचा, राजेपणाचा कोणताही प्रश्न मध्ये न आणता इंदुमती राणीसाहेबांच्या शिक्षणाचा निर्णय अंमलात आणला.

राजर्षींना राणीसाहेबांना डॉक्टर बनवायचं होत. आणि राणीसाहेब होत्याच जात्याच बुद्धिमान. त्यांनी इंदुमती राणीसाहेबांना सर्व बाजूनी विकसित करण्याचे प्रयत्न चालवले. घोड्यावर बसणे, बंदूक चालविणे, मोटार ड्रायव्हिंग, शिकार या सगळ्या सगळ्याच शिक्षण राजर्षींनी राणीसाहेबांना दिल. एक लहानशी वाघीण सुद्धा राणीसाहेबांनी सांभाळली होती. 

राजर्षींच्या जाण्यानं राणीसाहेबांना डॉक्टर बनवायचं स्वप्न अपूर्णच राहील. राजर्षींच्या पश्चात रूढी समजुतीचे पक्के अडसर इंदुमती महाराणींच्या प्रगतीच्या दाराला घातले गेले. राजर्षी असते तर ते अडसर त्यांनी कठोर निग्रहाने दूर केले असते पण त्यांच्या निधनाने सारीच परिस्थिती बदलली. इंदुमती राणीसाहेब मात्र शांत राहिल्या. त्यांनी बंड केलं नाही, संघर्ष केला नाही.

आपला राहता बंगला सध्याचे सर्किट हाऊस त्यांनी शासनाला दिले. त्यांचे कार्य पुढील पिढीस निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांचे ३० नोव्हेंबर १९७१ रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.