या बिहारी शिक्षकाने विद्यार्थी प्रेमापोटी चक्क विमानच जमिनीवर उतरवलंय

भारतीय संस्कृतीत विद्यार्थी आणि गुरुच्या नात्याला वेगळंच महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून गुरु-शिष्याचं नातं आपण वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून ऐकतो. मग ते रामायण असो की महाभारत. पण या दोन्ही महाकाव्याचा विचार केला तर यामधून गुरु दक्षिणेचे किस्से आपल्याला समजतात. पण कधी गुरूने शिष्यप्रेमापोटी काही केल्याचं क्वचितच ऐकलं असेल.

आता काळ बदललाय तसं गोष्टीही बदलेल्या दिसतायेत. आता शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं खूपच व्यावसायिक झाल्याचं आपण बघतो. अगदी प्राणपणाने एकमेकांसोबत नातं निभावणारे सापडावे लागतील. अशात एका शिक्षकाचं विद्यार्थी प्रेम सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनलंय.  बिहारच्या एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी चक्क विमानचं जमिनीवर उतरवलंय.

बिहारच्या समस्तीपूर इथल्या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने हे करून दाखवलंय. मेघन साहनी असं या शिक्षकाचं नाव. मेघन साहनी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विमानाच्या आकाराची एक लायब्ररी तयार केली आहे. बाहेरून आणि आतून पूर्णपणे विमानाचं स्ट्रक्चर असणारी ही लायब्ररी आहे.

याची विशेष गोष्ट म्हणजे ही लायब्ररी मेघन सहानी यांनी स्वतःच्या पैशाने बनवली आहे. त्यांनी यामध्ये कुणाचीही मदत घेतलेली नाहीये.

ही लायब्ररी बनवण्यासाठी मेघन साहनी यांना तब्बल २ लाख रुपये खर्च आला. जो त्यांनी स्वतःच्या खिशातून केला.  तीन महिन्यांपूर्वी म्हणजे आक्टोबर २०२१ मध्ये मेघन साहनी यांनी या लायब्ररीच्या कामाची सुरुवात केली होती. आणि आता जानेवारी २०२२ मध्ये ही लायब्ररी तयार झाली आहे. या लायब्ररीचं नाव त्यांनी ‘शिक्षा उडान’ असं ठेवलं आहे.

अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आवड नसते. त्यांना शाळेतील वातावरणात अभ्यास करावा वाटत नाही. अशात मेघन साहनी यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करावा वाटेल, शिवाय त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांना नवीन आणि वेगळी स्वप्न बघायचा दृष्टिकोन लाभेल या उद्देशाने त्यांनी विमानाच्या आकाराची लायब्ररी बनवण्याचं ठरवलं. 

हा विचार त्यांच्या डोक्यात खूप आधीपासून होता. मेघन साहनी आधी ज्या शाळेत शिकवत होते तिथे त्यांच्या इतर ३ मित्रांसोबत मिळून लायब्ररी तयार करणार होते. मात्र नेमकं त्यांची बदली झाली. पण हा विचार त्यांनी सोडला नाही. शासनाची मदत जेव्हा मिळाली नाही तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेत कोरोना काळात या लायब्ररीची उभारणी केली. 

विमानाच्या आकाराची ही लायब्ररी संपूर्णपणे काँक्रीटने बनवलेली आहे. याची रचना अतिशय मजबूत आहे आणि विशेष म्हणजे ती बनवण्यासाठी बाहेरून कोणीही कारागीर मागवलेला नाही, तर गावातील गवंडीने ती बनवली आहे. या लायब्ररीचं विद्यार्थ्यांना इतकं आकर्षण वाटत आहे की याचा दरवाजा बंद ठेवला नाही तर सरळ विद्यार्थी आत जातात आणि गर्दी होते. शिवाय सामान्य लोकांनाही याचं खूप आकर्षण वाटत आहे. परिणामी दुरून लोक ही लायब्ररी बघायला येताय.

या लायब्ररीमध्ये २५ विद्यार्थी एकावेळी बसून अभ्यास करू शकतात. विद्यार्थ्यांना क्रमाक्रमाने यामध्ये अभ्यास करता येणार आहे. अजून तरी या लायब्ररीसाठी आवश्यक असलेली सर्व पुस्तक उपलब्ध होऊ शकलेली नाहीये. पण लोकांनाही मेघन सहानी यांनी उचललेल्या पावलाची जाणीव आहे आणि म्हणून अनेक जण स्वतः पुस्तकं देऊ करत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.

मेघन साहनी यांनी अजूनही अशा लायब्ररीज निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र नेहमी नेहमी स्वतःच्या पैशाने ते शक्य होणार नाही कारण ते साधारण गावातील शाळेचे शिक्षक आहेत. म्हणून त्यांनी आता लोकांना आवाहन केलं आहे. लोकांची मदत मिळाली तर मेघन सहानी अजून त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना विद्यार्थ्यांसाठी साकारतील, असं त्यांचं म्हणणं आहे. 

मेघन सहानी यांच्या या पावलाचं सोशल मीडियावरही भरपूर कौतुक केलं जात आहे. अनेकांनी त्यांच्या या कामाला ट्विटरवर चांगलंच व्हायरल केलं आहे. शिवाय माध्यमांनीही त्यांची दखल घेतली आहे. बिहारच्या या विद्यार्थी प्रेमी शिक्षकामुळे शैक्षणिक क्षेत्रात काही तरी नवीन हटके बघायला भेटलं आहे. आता त्यांच्या या कल्पनेवर अजून कुणी काम करेल का? त्यांचा आदर्श घेईल का? हे तर येत्या काळातच कळेल.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.