चाकू अन् कात्रीने सुरूंग खोदून लेफ्टनंट परुळकरांनी पाकीस्तानचं जेल फोडल होतं..
प्रिझन ब्रेक सिरीयल किती जणांनी पाहिली आहे? अमेरिकेच्या एका अतिशय कठोर सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या तुरुंगातून पळून जाण्याचा प्लॅन बनवणाऱ्या आणि त्यात यशस्वी ठरलेल्या एका कैद्याची हि कथा. जवळपास ५ सिझन आले. संपुर्ण जगात हि मालिका हिट आहे. जेलफोडी वर आजवर अनेक सिनेमे देखील येऊन गेले आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात अशा प्रिझन ब्रेकचे किस्से आपण कधी पाहिलेले नसतात.
असाच एक सिनेमा पेक्षाही थरारक किस्सा ज्यात थेट पाकिस्तानचा जेल फोडून तीन कैदी पळाले होते. हे कैदी कोणी साधे सुधे नव्हते तर ते होते भारतीय वायू दलाचे पराक्रमी पायलट.
गोष्ट आहे १९७१ सालची.
पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेश वरून घुसखोर भारतात प्रवेश करत होते आणि त्यामुळे चिडलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तान तोडून वेगळा देश बनवण्याची प्रतिज्ञा केली. भारत आणि पाकिस्तान दरम्यान मोठं युद्ध पेटलं.
भारताची तिन्ही दले जीव पणाला लावून लढत होती. फक्त पूर्व सीमाच नाही तर पश्चिम सीमेवर देखील युद्धाची आघाडी उघडण्यात आली. पाकिस्तानला अमेरिकेचे मोठे पाठबळ असल्यामुळे त्यांचा सुरवातीला जोर व आत्मविश्वास मोठा होता. भारताचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या कुशल रणनीती खाली जवानांनी मात्र त्यांना तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
अशाच एका घनघोर लढाई मध्ये पाकिस्तानात घुसून बॉम्ब हल्ला करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानांना पाकिस्तानने टिपले आणि जवळपास १६ पायलट त्यांच्या ताब्यात युद्धकैदी म्हणून सापडले.
आजवरचा इतिहास सांगत होता कि पाकिस्तानी लष्कर, पोलीस युद्धकैद्यांशी चांगले वर्तन कर करण्याबद्दल कुप्रसिद्ध होते.अशातच हा युद्धाच्या धामधुमीचा काळ होता, त्यात भारतीय हवाई दलाचे पायलट सापडले म्हणून पाकिस्तान प्रचंड खुश झाला.
या सर्व युद्ध कैद्यांना रावळपिंडीच्या भयंकर कारागृहात दाखल करण्यात आलं. त्या तुरुंगात गेलेला कैदी जिवंत बाहेर परतण्याची शक्यता अतिशय कमी होती. भारतीय पायलटनी आता आपल्यावर भयंकर अत्याचार होणार याची मनाची तयारी केली होती.
मात्र कारागृहात असूनही भारतीय पायलटांचे धाडस कमी झाले नाही.
या सोळा पायलट मध्ये होते फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळकर.
१० डिसेंबर १९७१ वेळी पाकिस्तानवर चालून गेलेल्या एसयू ७ या लढाऊ विमानाचे ते पायलट होते. दुर्दैवाने ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. १६ डिसेंबर १९७१ रोजी युद्ध संपून भारत विजयी झाला तरी या कैद्यांची सुटका झाली नाही.
जवळपास वर्षभर पाकच्या त्या जेलमध्ये दैनंदिन अत्याचाराला तोंड देत परळकर व त्यांचे साथीदार धीराने आपल्या सुटकेची प्रतीक्षा करत होते.
अशातच भारतातल्या जेलमध्ये एका पाकिस्तानी कैद्याचा मृत्यू झाला. त्यामुळे परुळकर व इतर कैद्यांमध्ये ही भीती पसरली की, भारतातल्या घटनेचा परिणाम पाकीस्तानात कैद असलेल्या भारतीय जवानांवर देखील होईल.
प्रश्न जीवन मरणाचा होता. त्यामुळे अखेर फ्लाइट लेफ्टनंट दिलीप परुळकर यांनी पाकिस्तानी तुरुंगातून पळून जाण्याची योजना आखली. यात त्यांच्या सोबत फ्लाइट लेफ्टनंट एम.एस. ग्रेवाल, फ्लाइंग ऑफिसर हरीशसिंग यांचा समावेश होता. पाकिस्तानी जेल फोडणे हि वाटते तेव्हढी सोपी गोष्ट नव्हती. रावळपिंडीचा तो जेल एखाद्या किल्ल्याप्रमाणे अभेद्य होता. शेकडो हत्यारबंद जवान तिथे निगराणी करत होते.
परूळकर ग्रेवाल आणि हरिसिंग यांनी एक गुप्त योजना आखली. १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. त्याच्या आधी एक दोन दिवस सुरक्षा यंत्रणेतील कमांडो थोडे सुट्टीच्या मुड मध्ये असतात. याचा फायदा घ्यायचं ठरलं.
चाकू, कात्री आणि काट्याच्या सहाय्याने या तिघांनी छावणीच्या भिंतीत छिद्र बनवायला सुरुवात केली. ते भोक खोदण्यास त्यांना सुमारे एक महिना लागला.
त्या भिंतीच्या पलीकडे पाकिस्तानी वायुदलाचे ऑफिस होते. तिथे त्यांच्या ऑफिसर्सचे गणवेश ठेवलेले होते. या तिघांनी ते पठाणी गणवेश पळवले आणि समोर पंधरा फुटांची मध्यरात्री उडी टाकून ओलांडली.
दिलीप पारुलकर यांच्याकडे पाकिस्तानचा नकाशा होता.
त्यांना माहीत होते की, पूर्वेकडे सीमेवरील युद्ध चालू आहे, ते तेथे पकडले किंवा मारले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तुरूंगात मिळालेला भत्ता जपून ठेवला होता. त्याच्याच मदतीने त्यांनी पेशावरची बस पकडली आणि तिथून जमरूद या गावी येऊन पोहोचले.
तिघांनीही दाढी वाढवली होती. धुळीने भरलेला चेहरा अंगात पठाणी सूट पाहून कोणालाही हे भारतीय युद्धकैदी असतील याची शंका येत नव्हती. कोणीही नाव विचारलं तर ते ख्रिश्नन नावे सांगायचे. कारण त्यांना नमाज पढायला येत नव्हतं आणि ते तिघेही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले होते. त्याकाळात पाकिस्तानी हवाईदलात अनेक ख्रिस्चन असायचे. याचा फायदा घ्यायचं ठरलं.
दिलीप परुळकर यांनी जेकब पीटर नावाचं नाव धारण केलं.
जमरूदवरून त्यांनी टांगा केला. पुढे एका मोडक्या बसच्या टपावर बसून ते मजल दरमजल करत अफगाणिस्तान सीमेवर जाऊन पोहचले. दिलीप परुळकर यांच्या जवळ असलेल्या नकाशाप्रमाणे त्यांना लंडीखाना या गावी पोहचायचं होतं.
ते अफगाण सीमेपासून ३४ मैलांवर तोरखम नावाच्या शहरात पोहचले. तिथे त्यांनी लंडीखाना स्टेशन कुठे आहे याची चौकशी सुरु केली.
एका माणसाला त्यांची शंका आली. त्याने थोड्या जरबेच्या आवाजात त्याने परुळकर व इतर दोघांची उलटतपासणी केली. ग्रेवाल यांनी त्यांना सांगितलं कि आम्हाला लंडीखाना येथे जायचं आहे. यावर तो माणूस म्हणाला,
“यहाँ तो लंडीखाना नाम की कोई जगह है ही नहीं…वो तो अंग्रेज़ों के जाने के साथ ख़त्म हो गई।”
पकडले जाताच दिलीप पारुलकर आणि त्यांच्या साथीदारांनी बहाणा बनवला की, ते पाकिस्तान एअर फोर्सचे पायलट आहेत आणि ते लंडी खानामध्ये रजेवर आले आहेत. पारूळकर यांनी धैर्याने आपले बंदिवान शिबिर कार्ड दाखवले, कारण बहुतेक स्थानिकांना इंग्रजी येत नव्हते. तरीही तहसीलदारांचा संशय कमी झाला नाही. जुन्या नकाशामुळे सुटण्याची योजना अयशस्वी झाली. त्यांना पुन्हा जेलमध्ये धाडण्यात आलं.
मात्र, पुढच्या तीनच महिन्यांनंतर म्हणजेच १ डिसेंबर १९७२ रोजी सर्व कैदी जवानांना सोडण्यात आले.
फ्लाइट लेफ्टनंट दिलीप परुळकर यांची पलायन योजना ही ७१ च्या युद्धकाळात भारतीय वायुसेनेने उचललेल्या धाडसी आणि प्राणघातक पाऊलांपैकी एक होती. ही योजना अयशस्वी ठरली, तरीही एक गोष्ट मात्र शिकवली की, दृढ इच्छाशक्ती असल्यास कठीण परिस्थितीतही नेहमीच मार्ग निघतो.
या घटनेवर आधारित ‘द ग्रेट इंडियन इस्केप’ हा चित्रपट देखील बनविण्यात आला होता. तसेच, २०१५ मध्ये विंग कमांडर धीरेंद्र एस. जाफा यांनी त्यांच्या ‘डेथ व्हॉजंट पेनफूल’ या पुस्तकात या घटनेविषयी सांगितले आहे.
हे ही वाच भिडू,
- लष्करप्रमुख जनरल करिअप्पांंचा मुलगा पाकिस्तानला युद्धकैदी म्हणून सापडतो तेव्हा..
- ७१ च्या युद्धात या खेडूत महिलांनी केलेली मदत भारतीय हवाई दल कधीही विसरू शकणार नाही..
- थेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, भारतावर हल्ला होणार आहे.
- निशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते.