पृथ्वी शॉ आणि त्याचा बाप…

“भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आलाय”

बऱ्याचवेळा अनेक खेळाडूंबद्दलच्या आपल्या ‘क्रिटिक’ल मतांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल वॉन याने पृथ्वी शॉच्या धडाकेबाज शतकीय डेब्यूनंतर ट्विटरवरून दिलेली ही प्रतिक्रिया पृथ्वी शॉबद्दल बरंच काही सांगणारी आहे.

आजचा दिवस निर्विवादपणे फक्त आणि फक्त पृथ्वी शॉचा आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत राजकोटच्या मैदानावर आज जे काही घडलं त्यासाठी  “He came, he ‘show’ and he conquered”  हे वर्णन चपखलपणे लागू होतं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय संघात निवड आणि पदार्पणातच वेस्ट इंडीजसारख्या तेजतर्रार आक्रमणाच्या चिंधड्याचिंधड्या उडवत झळकावलेलं आक्रमक शतक हे फक्त पृथ्वीच्याच नाही, तर संपूर्ण भारतीय क्रिकेटच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

भारतीय क्रिकेटच्या पटलावरचा नवा ‘सुपरस्टार इन मेकिंग’ समजल्या जात असलेल्या पृथ्वीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची यापेक्षा ‘शॉ’नदार सुरुवात होऊच शकत नव्हती. पण असा कारनामा करण्याची ही काही पृथ्वीची पहिली वेळ नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी आणि दुलीप या दोन्हीही ट्रॉफीमध्ये देखील शतक झळकावत त्याने एवढंच धडाकेबाज पदार्पण केलं होतं.

राजकोटचं ग्राउंड तर त्याला कदाचित अधिक भावत असावं. कारण २०१६-१७ सालच्या रणजी ट्रॉफीमधला डेब्यू करताना देखील त्याने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात याच ग्राउंडवर शतक झळकावलं होतं. त्यानंतर आतापर्यंत रणजीमध्ये खेळलेल्या १४ मॅचेसमध्ये ७ शतकं झळकावत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली दावेदारी सादर केली होती.

Screen Shot 2018 10 04 at 7.28.14 PM
Social Media

पृथ्वी शॉने सर्वप्रथम महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली ती २०१३ साली. हॅरीस शिल्ड ट्रॉफीत आपल्या ‘रिझवी स्प्रिंगफिल्ड स्कूल’कडून खेळताना त्याने ३३० बॉल्समध्ये  ५४६ रन्सचा पाऊस पाडला आणि अनेकांना सचिन तेंडूलकरची आठवण झाली. तेव्हाचपासून पृथ्वीची गाडी सुसाट जी सुटली ती सुटलीच.

त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेला १९ वर्षांखालील विश्वचषक हा तर त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सुवर्णमुकुटच. त्यानंतर तो आयपीएलमध्ये आला आणि तिथेही त्याचा परफॉर्मन्स लक्षवेधक राहिला. जगभरातील दादा गोलंदाजांना तो आयपीएलमध्ये जितक्या सहजपणे समोरा गेला, ते बघून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली.

आयपीएलमध्ये तो ज्या संघाकडून खेळला त्या दिल्लीच्या संघाची संपूर्ण सिझनमधली कामगिरी यथातथाच राहिली पण पृथ्वीने मात्र आपल्या जबरदस्त कामगिरीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. हैदराबादविरुद्ध साकारलेली ६५ रन्सची इनिंग हे त्याचं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरलं. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कोटलाच्या मैदानावर फटकावलेल्या ४४ बॉल्समधील ६२ रन्सची  इनिंग तर कम्माल होती.

त्याच्या या कमी वयातल्या भल्यामोठ्या यशाच श्रेय निर्विवादपणे त्याच्या वडलांकडे जातं !

पंकज शॉ अस त्यांच नाव. लहानपणीच आपली आई गमावलेल्या पृथ्वीसाठी त्यांनी आई-बाबा अशी दुहेरी भूमिका निभावली. वयाच्या पाचव्या वर्षी पृथ्वीच्या हातात बॅट देण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्या अर्थाने पंकज हे या हिऱ्याची पारख करणारे पहिले पारखी ठरतात.

मुलाच्या संगोपनापासून ते त्याच्या क्रिकेटच्या मॅचेस, प्रॅक्टिसचं शेड्यूल या सगळ्या गोष्टींवर त्यांची बारीक नजर असायची. पृथ्वीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कायमच भक्कमपणे आपल्या मुलाच्या पाठीशी राहिलेल्या पंकज यांच्यामुळेच पृथ्वीचा ‘विरार ते भारतीय संघ’ हा अतिशय खडतर प्रवास सुकर होऊ शकला.

“आपण जेव्हा कधी एखाद्या सामन्यासाठी जायचो, त्यावेळी पप्पा कायमच सोबत असायचे. मग मॅच क्लब लेव्हलवरची असो, किंवा फर्स्ट क्लास क्रिकेटमधली. जितकं हार्डवर्क मी घेतलंय तितकंच हार्डवर्क माझ्यासाठी पप्पांनी देखील घेतलंय.”

असं पृथ्वीनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

लहानपणी पृथ्वीच्या हातात क्रिकेटची बॅट देताना या पोराचा इतक्या लवकर भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदय होईल आणि आपल्या अविश्वसनीय क्रिकेटिंग टँलेंटच्या जोरावर तो अल्पावधीतच जागतिक क्रिकेटला आपली दखल घ्यायला भाग पाडेल, असा विचार पंकज यांनीही सुरुवातीच्या काळात केला नसेल, पण त्यांनी आपल्या मुलासोबत एक स्वप्न बघितलं आणि फक्त स्वप्न बघून ते थांबले नाहीत तर गेली जवळपास १८ वर्षे ते हे स्वप्न जगत राहिले. या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी खस्ता खाल्ल्या. त्यांचं हेच स्वप्न आज सत्यात उतरलंय.

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आपल्या शाळेकडून खेळताना उभारलेली ५४६ रन्सची इनिंग, मुंबईच्या संघाकडून गाजवलेलं प्रथमश्रेणी क्रिकेट, पृथ्वी वापरत असलेली ‘एमआरएफ’ कंपनीची बॅट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दस्तरखुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेच या ‘वंडरबॉय’च्या उज्ज्वल भविष्याची दशकभरापूर्वी केलेली भविष्यवाणी या सगळ्याच गोष्टींमुळे क्रिकेटरसिकांना आता भारतीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या सचिनचा जन्म झाल्याचा साक्षात्कार होऊ लागलाय.

क्रिकेटरसिक म्हणून आपण मात्र आताच पृथ्वीची तुलना सचिनशी करण्याचा मोह टाळायला हवा. या तुलनेचा दबाव त्याच्या खेळावर होऊ नये म्हणूनही आणि ‘पृथ्वी शॉ’ म्हणूनच त्याचा खेळ अधिक बहरावा, भारतीय क्रिकेटमधील हा उगवता तारा स्वतंत्र्यपणे अधिक तेजाने तळपता राहावा म्हणूनही.

पृथ्वीसमोर अजून भली-मोठी क्रिकेटिंग कारकीर्द पडलीये. ही आताशी कुठे सुरुवात आहे. या शानदार सुरुवातीनेच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत. अनेक नवीन विक्रम त्याला खुणावताहेत देखील. पण सध्यातरी आपण त्याची ही खेळी एन्जॉय करूयात आणि त्याच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देऊयात.

अजित बायस

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.