मध्यरात्री ३ वाजता आलेला फोन पृथ्वीराज चव्हाणांचं आयुष्य बदलून गेला.

“कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय” हे मागील पाच पन्नास वर्षातलं भारतीय लोकशाहीवर सर्वाधिक प्रभाव टाकणार वाक्य असावं. जसं हे वाक्य महत्वाचं आहे तसच या वाक्याचं टायमिंग देखील खूप महत्वाचं आहे. हायकमांडचा निर्णय कधी येईल याची वाट पाहत एकनिष्ठतेचा कडेलोट झाल्याची देखील अनेक उदाहरणं आहेत.

अशाच हायकमांडच्या निर्णयाचं टायमिंग आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा एक अनोखा किस्सा आहे.

तर पृथ्वीराज चव्हाण यांना १९९१ साली पहिल्यांदा कॉंग्रेसची लोकसभेची निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं होतं.
राजीव गांधी यांना तेव्हा तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्चशिक्षीत आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असणाऱ्यांची टिम निवडायची होती. लोकसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यातील सर्किट हाऊसवर मुक्कामी होते. त्याच्या सोबत प्रेमलाताई म्हणजेचं पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री देखील मुक्कामास पुण्याच्या सर्किट हाउसवरतीच होत्या.

त्याच रात्री अचानक मधरात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास सर्किट हाऊसवरील फोन खणाणलां. तो फोन होता राजीव गांधीचा..

राजीव गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाणांना तातडीने कराडला जावून कराड लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरण्यास सांगितलं त्याचबरोबर ते स्वत: पृथ्वीराज चव्हाणांचा प्रचार करण्यासाठी कराडला येतील अस देखील राजीव गांधीनी सांगितलं. पुढे पृथ्वीराज चव्हाणांनी कराड मतदारसंघातून अर्ज भरला आणि ते निवडून आले. राजीव गांधींनी केलेल्या मध्यरात्री दोन वाजता केलेल्या फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचा राजकारणात श्रीगणेशा झाला.

यानंतरचा प्रसंग तो १० नोव्हेंबर २०१० च्या मध्यरात्रीचा. मध्यरात्रीचे तीन वाजलेले. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा PMO ऑफिसचा कारभार पाहत होते. मध्यरात्री ३ वाजता पृथ्वीराज चव्हाण यांना सोनिया गांधीचा फोन आला. फोनवर त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याचं कळवण्यात आलं.

पृथ्वीराज चव्हाणांनी या दोन रात्रीचा उल्लेख आपल्या मुलाखतीमध्ये केला आहे. एका रात्रीनं त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरवात झाली तर दूसऱ्या रात्रीनं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा मिळवून दिला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.