कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही असं म्हणणाऱ्या इंग्रज क्लबला प्रितिलता वड्डेदारने धडा शिकवला.

२३ सप्टेंबर १९३२, पहाडतली युरोपियन क्लब. चितगाव शहर. तेव्हाचं पूर्व बंगाल , आजचा बांगलादेश

रात्रीची रंगीत वेळ. मोठे मोठे ब्रिटीश अधिकारी, त्यांचे यार दोस्त दिवसभराचा शिणवटा घालवण्यासाठी  क्लब मध्ये जमले होते. हास्य विनोद गप्पा टप्पा सुरु होत्या. पाठीमागे मंद इंग्लिश संगीत वाजत होतं. हातातले मदिरेचे ग्लास रिकामे व्ह्याच्या आत परत भरले जात होते.

पहाडतली हा टिपिकल इंग्लिश क्लब होता. इथे येणाऱ्याला आपण लंडनमधल्याच एखाद्या उंची क्लब मध्ये आलोय की काय असे वाटावे असं वातावरण खास बनवण्यात आलेलं. या क्लबच्या दारात एक बोर्ड लावण्यात आला होता. त्यात ठळक शब्दात लिहिले होते,

Dogs and Indians are not allowed.

भारताच्याच भूमीत असलेल्या या क्लबमध्ये आत जाण्यास भारतीयांना मनाई होती. इतकेच नव्हे तर या बोर्डवरच्या मेसेजमध्ये भारतीयांची तुलना कुत्र्याबरोबर करण्यात आली होती. ते पाहून कोणत्याही सर्वसामान्य देशप्रेमी व्यक्तीच पित्त खवळण सहाजिक होतं . झालं ही तसचं.  

रात्रीच्या साडे दहाच्या सुमारास पहरतेली क्लबच्या बाहेर हिंदुस्तान सोशालीस्ट रिपब्लिकन आर्मी तीन गटात सशस्त्र क्रांतिकारक गोळा झाले  होते. आत बसलेल्या जवळपास ४० इंग्रज अधिकाऱ्यांना कल्पनाच नाही.

या क्रांतिकारकांच नेतृत्व करत होता एक छोटासा दाढीवाला पंजाबी मुलगा. 

क्रांतिकारकांनी अंधाराचा फायदा घेऊन क्लबवर तिन्ही बाजूनी फायरिंग सुरु केलं. अचानक झालेला हा गोळीबार पाहून क्लबमध्ये असलेल्या प्रत्येक ब्रिटीश अधिकाऱ्याची भीतीने दाणादाण उडाली. अंधारातून येणाऱ्या गोळ्या क्लबला भाजून काढत होत्या. हातबॉम्ब फेकले जात होते. अखेर काही वेळाने ब्रिटीश सावरले. कोणीतरी धीराने लढायचं ठरवलं. काही अधिकाऱ्यांजवळ बंदुका होत्या. दारातील रखवालदाराकडेही शस्त्र होती.

इंग्रजांनी क्रांतीकारकांना उलट उत्तर द्यायला सुरवात केली. दोन्ही बाजूनी बराच वेळ फायरिंग झाली. एव्हाना गोळ्यांचा आवाज चितगावमधल्याच नव्हे तर कलकत्त्याला असणाऱ्या पोलीस हेड क्वार्टर पर्यंत पोहचला होता. शेकडो पोलीस गाड्या पहाडतली क्लबच्या दिशेने निघाल्या. 

पोलीस गाड्यांची कुणकुण लागताच क्रांतीकारकांची पांगापांग झाली. पिसाळलेले पोलीस त्यांच्या मागावर होते.  अधांरात या क्रांतिकारकांच नेतृत्व करणारा पंजाबी मुलगा सापडला. त्याला गोळी लागली असल्यामुळे तो जायबंदी झाला होता. जसे पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले तसे त्याने आपल्या खिशातून एक गोळी काढली आणि ती खाल्ली. काही क्षणात तो गतप्राण झाला.

इंग्रजांनी त्याच पार्थिव शरीर ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा मुलगा नव्हता तर ती एक मुलगी होती. तीच नाव प्रितिलता वड्डेदार. 

एकेकाळी शिक्षिका असलेली प्रितिलता  देशप्रेमाने प्रेरित होऊन आपली शाळकरी मैत्रीण कल्पना दत्त हिच्या सोबत सुर्य सेन यांच्या संघटनेमध्ये सामील झाली होती. लहानपणापासून झाशीच्या राणीच्या कथा ऐकून त्यांच्यात ही आपल्या मायभूमीसाठीला ब्रिटीश मगरमिठीतून सोडवण्याची जिद्द होती.

kalpana and surya
सूर्य सेन आणि कल्पना दत्त

चितगाव मध्ये मास्टर सूर्य सेन यांच्या संघटनेमध्ये आल्यावर या दोघीनाही सशस्त्र क्रांतीच प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यांच्यातली उर्जा आणि देशासाठी कोणतेही बलिदान करण्याचे महत्वाकांक्षा पाहून सूर्यसेन यांनी त्यांच्यावर पहाडतली युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची जबाबदारी दिलेली. 

कल्पना दत्त आणि प्रितिलता या दोघींनी मिळूनच पहाडतलीवरचा हल्ला प्लॅन केला होता. पण हल्ल्याच्या काहीचं दिवस अगोदरच कल्पनाला पोलिसांनी अटक केली. पण काहीही झाले तरी हा मिशन रद्द करायचा नाही अशी प्रतिज्ञा प्रितिलताने केली होती.  इतर कालीशंकर डे, प्रफुल्ल दास, सुशील डे अशा अनुभवी क्रांतीकारकांना सोबत घेऊन तिने पहाडतली क्लब मिशन तिने पार पाडले.

या वेळी झालेल्या चकमकीमध्ये तिला फक्त एकच गोळी लागली होती. पण तिला ब्रिटीश जेलच्या बंदिवासात खितपत पडायचं नव्हत.स्वातंत्र्यासाठी तडफडणार हे वादळ चार भिंतीत कोंडल जाणार नव्हत. पोलीसानी जखमी प्रितीलताला हात लावण्यापुर्वीच अवघ्या एकवीस वर्षाच्या या क्रांतीकारीकेने सायनाईडची गोळी खाऊन मायभूमीच्या मांडीवर आपले प्राण सोडले.

देशासाठी हौतात्म्य स्वीकारलेली ती सर्वात लहान वयाची क्रांतिकारका होती. तिच्या कार्याचा सन्मान म्हणून आजही पश्चिम बंगाल पासून ते बांगलादेशपर्यंत अनेक ठिकाणी तीचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.