पुरी बसनं वाढवलीये लालपरीची चिंता

एसटीचा प्रवास हा सामान्य माणसासाठी सुखाचा प्रवास असतो. जिथं गाव तिथं एसटी म्हणत, ही लाडकी लालपरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचली. दोन शहरांना जोडण्यातही एसटी मागं राहिली नाही. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीला आधीच तोटा सहन करावा लागला आहे. आता त्यात नव्या चिंतेची भर पडली आहे.

कुठल्याही रस्त्यांवर सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चलती आहे. नाय म्हणलं तरी पेट्रोल डिझेलचे सध्याचे भाव सामान्य माणसांना परवडत नाहीतच. त्यामुळे बाईकपासून बसपर्यंत इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर फॉर्मात आहे. इव्हेट्रान्स नावाच्या कंपनीनं सुरत, सिल्वासा, गोवा आणि डेहराडून या शहरांनंतर आता पुणे-मुंबई महामार्गावर धावणारी खासगी इलेक्ट्रिक बस रस्त्यावर आणली आहे. ‘पुरी बस’ नावाच्या या बसनं १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीला सुरुवातही केली आहे. या कंपनीनं लांबपल्ल्याचा प्रवास उत्सर्जन आणि ध्वनी प्रदूषणाविना होणार असल्याचा आणि हा आरामदायक प्रवास लोकांना परवडेल असा दावा केला आहे.

एसटीचा वांदा का होतोय?
पुण्याची पीएमपी असेल किंवा मुंबईची बेस्ट राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्ट्रिक बस आणण्यासाठी आग्रही आहेत. राज्यात सार्वजनिक बस वाहतूक पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा मानस राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. दुसरीकडे एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बस गाड्यांचं निविदा प्रक्रियेवरच घोडं अडल्यानं एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस रस्त्यावर येण्यापूर्वीच खासगी इलेक्ट्रिक बस रस्त्यावर आल्या आहेत. या खासगी बस प्रवाशांना आकर्षित करण्यात यशस्वी झाल्या तर एसटीच्या इलेक्ट्रिक बसना प्रतिसाद कसा मिळणार याची चिंता आहेच.

राज्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण सांगतं की, एसटीच्या ताफ्यात एकूण दोन हजार इलेक्ट्रिक बस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० बसेसची निविदा काढण्यात आली आहे. पण अवघड नियम आणि अटींमुळे आजवर कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिला नाही. एका कंपनीला कंत्राट दिलं असून, महामंडळाच्या गलथान कारभारामुळे पुन्हा इलेक्ट्रिक बसगाड्या रस्त्यावर येण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

आता एवढ्या वेळात खासगी इलेक्ट्रिक बसेसनं आपली पोळी भाजून घेतली, तर एसटीच्या खिशात पुन्हा प्रश्नचिन्हच येणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.