मधुबाला पेक्षाही सुंदर म्हणवल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.

ती होती एक शापित अप्सरा. नाव प्रिया राजवंश. 

खर नाव वीरा सुंदर सिंग. जन्मली शिमल्याच्या आलिशान महालात. हिमाचलच सगळ सौंदर्य तिच्यात उतरलं होतं.वडील सरकारी अधिकारी. शिकली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. शाळेत सुद्धा प्रचंड पॉप्युलर होती. लोक म्हणायचे मोठी अभिनेत्री होणार. पोरगी कॉलेजमध्ये गेल्यावर शिमल्याच्या सर्वात प्रतिष्ठीत ग्रुपबरोबर इंग्लिश नाटकात काम करू लागली.

वडलांनां सरकारने युनोमधल्या एका कामासाठी युरोपला पाठवलं. ही सुद्धा वडलांसोबत लंडनला अली आणि जगातल्या सर्वात जुन्या आणि सर्वोत्तम म्हणून गणल्या जाणाऱ्या रॉयल अॅकडमी ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश मिळवला. तिथे देखील तिच्या नावाचीच चर्चा असायची. ती स्टेजवर आली तरी सगळेजण तिच्या सौंदर्याने दिपून जायचे.

अस म्हणतात ना की कस्तुरीचा सुगंध किती जरी लपवायचा म्हटला तरी तो लपू शकत नाही. 

प्रियाच्या बाबतीत तसच घडलं. लंडनमध्ये तिचा काढलेला फोटो बॉलीवूडच्या एका प्रोड्युसरला मिळाला. ठाकूर रणबीर सिंग त्याच नाव. त्याने काही इंग्लिश सिनेमे देखील बनवले होते. त्याच्या इंग्लिश मित्राने प्रियाचे फोटो त्याला लंडनवरून पाठवले आणि तो उडालाच.

इतक्या सुंदर मुलीला घेऊन सिनेमा बनवला तर तो सुपरहिट होणार हे धंदेवाईक गणित त्याने मांडल.

ठाकूर रणबीरसिंगला काही सिनेमा बनवन जमल नाही पण त्याने तिची ओळख एका मोठ्या माणसाशी करून दिली. त्या भेटीमुळ तिचं आयुष्य बदलून गेल. त्या व्यक्तीच नाव चेतन आनंद. सुपरस्टार देव आनंद याचे मोठे बंधू. पण त्यांची एवढीच ओळख सांगणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे.

ते स्वतः एक मोठे फिल्ममेकर होते. खर तर त्यांच्याच सिनेमाच्या वेडामुळेच देव आनंद फिल्मइंडस्ट्रीमध्ये आला होता. दोघांनी मिळून नवकेतन फिल्म ही संस्था सुरु केली होती. चेतन आनंद यांच दिग्दर्शन आणि देव आनंद चा अभिनय असेल तर सिनेमा हमखास हिट आणि वरून भरपूर अवार्ड अस त्या काळच गणित होतं.

फ्रान्सच्या कानमध्ये त्यांच्या सिनेमाला बेस्ट फिल्मचा अवार्ड मिळाल्या मुळे संपूर्ण जगातले फिल्म रसिक त्यांचं नाव ओळखत होते.

अशा या चेतन आनंदना आता देवआनंदच्या प्रोडक्शनच्या बाहेर एखादा सिनेमा बनवायचा होता. थोडक्यात स्वतःला परत एकदा सिद्ध करून दाखवायचं होतं. त्यांनी हिमालय नावाची वेगळी चित्रपट संस्था काढली आणि पहिला सिनेमा एक मल्टीस्टारर वॉर फिल्म बनवायचं ठरवलं. यात धर्मेंद्र होता, बलराज साहनी होते, संजय खान होता. पिक्चरच नाव ठरल हकीकत.,

याच हकीकतची हिरोईन म्हणून त्यांनी प्रिया राजवंशला निवडलं.

प्रिया असेल अगदी विशीबाविशीतली. चेतन आनंद होते आपल्या चाळीशीत. पण हकीकतच्या सेटवर दोघांचे सूर जुळले.

चेतन आनंद यांचं आपल्या पत्नीशी पटेनास झालं होतं. दोघे वेगळे राहात होते. प्रियाला अभिनय शिकवता शिकवता ते तिच्या प्रेमात पडले. ती सुद्धा त्यांच्यात गुंतत गेली. हकीकत बनला आणि सुपर हिट झाला. या सिनेमासाठी चेतन आनंद यांना भरपूर पैसा, मानसन्मान मिळवून दिला.

प्रियाची सुद्धा फिल्मइंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा झाली. लोक तिच्या दारात सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन रांग लावू लागले. पण प्रियाने सगळ्यांना नकार दिला. कारण होते तिचे सर्वस्व बनलेले चेतन आनंद. आता दोघे एकत्र रहात होते. अस म्हणतात की दोघांनी गुपचूप लग्न देखील केलं होतं.

चेतन यांची एकच इच्छा होती की प्रियाने आपण सोडून दुसऱ्या कोणासोबतही काम करायचं नाही. 

प्रिया प्रेमात एवढी बुडालेली होती की ती यासाठी तयार झाली. चेतन आनंद यांचा पुढचा सिनेमा रिलीज होण्यासाठी ६ वर्ष उलटून गेले. हिर रांझा या सुप्रसिद्ध उर्दू प्रेमकथेवर बेतलेला हा रोमांटिक सिनेमा. अर्थात हिर चा रोल प्रियाने केला होता तर रांझा झाला होता राजकुमार. हा सिनेमादेखील चांगला चालला.

प्रिया आता फक्त चेतन आनंद यांची हिरोईन उरली नव्हती तर त्यांची सेक्रेटरी, असिस्टंट सगळ काही तिचं होती. स्क्रिप्ट लिहिण्यापासून संगीत कोणत असाव यात ती त्यांची मदत करायची.

भारत पाकिस्तान युद्धावर आलेला प्रिया आणि राजकुमार जोडीचा हिंदुस्तान की कसम सुपरहिट झाला. 

पण यानंतरचा काळ म्हणजे अमिताभचा होता. दिलीपकुमार-राज कपूर-देव आनंद यांच्या स्टाईलचे सिनेमे आणि त्यांचा काळ उलटून गेला होता. चेतन आनंद यांचे पुढचे सिनेमे तिकीटबारीवर सणकून आपटले. देवआनंदला घेऊन बनवलेला साहब बहादूर देखील चालला नाही.

पण चेतन आनंद यांनी जेवढे सिनेमे बनवले त्या प्रत्येकात प्रिया राजवंश हमखास होती. तिने राजेश खन्ना, हेमामालिनी, राज कुमार अशा तगड्या अभिनेत्यांसमोर आत्मविश्वासाने काम केले.

त्याकाळात रॉयल अॅकडमी मध्ये शिकून हिंदी सिनेमात काम करणारी ती एकमेव अभिनेत्री होती. पण तिच्या टॅलेंटचा योग्य वापर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी झालाच नाही.

 दुर्दैव म्हणजे तिच्या २२ वर्षाच्या कारकिर्दीत तिने फक्त ६च सिनेमे केले आणि तेही चेतन आनंद यांच्या सोबतच.

मधुबाला पेक्षाही सुंदर आहे असं जिच्या बद्दल वर्णन केलं जायचं, हॉलिवूडच्या निर्माते तिच्यासाठी टाचा घासायचे अशी ही रुपगर्वीता मात्र दुर्दैवाने कधी तिची पाठ सोडली नाही.

ज्यांच्या साठी आपलं अख्ख करीयर वेचलं त्या चेतन आनंद यांच्याशी तिचं लग्न कधीच अधिकृत होऊ शकल नाही कारण चेतन यांच्या पहिल्या पत्नीने कधीच त्यांना घटस्फोट दिला नाही. चेतन आनंद यांच्या मृत्यू पर्यंत दोघे एकत्रच राहिले.

मात्र त्यांच्या मृत्यू नंतर सगळी परिस्थिती बदलली. चेतन आनंद यांनी आपल्या प्रोपर्टीचा काही भाग तिच्या नावे केला होता. पण हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांना म्हणजेच केतन आनंद आणि विवेक आनंद यांना पटल नाही. त्यांचे प्रियाशी बरेच वाद विवाद व्हायचे.

अशातच एकदिवस प्रियाची डेडबॉडी तिच्या बाथरूममध्ये सापडली.

अनेकांना वाटलं की ही आत्महत्या असावी. पण नंतर कळाल की मालकीहक्काच्या वादातून आनंद बंधूनी आपल्या सावत्र आईचा निर्घुण खून केला होता.

देव आनंदच्या या दोन्ही पुतण्यानां जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वरच्या कोर्टात मात्र त्याला स्थगिती मिळाली. आज प्रिया राजवंशला जाऊन वीस वर्षे होत आली तरी अजून तिच्या मृत्यूच गूढ कायम आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.