गेल्या काही दिवसात युपी सरकारला धडक देण्याची प्रियांका गांधींची ही ५ वी वेळ आहे…

सध्या लखीमपूर घटनेबद्दल विरोधक योगी सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. यात अगदी काँग्रेसच्या नेत्यांपासून समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. पण या सगळ्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या त्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी.

प्रियांका गांधी लखीमपूरला निघाल्या असता वाटेतच त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेत सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. पुढे त्यांना अटक देखील करण्यात आलं. कलम १४४ च्या उल्लंघनामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर आज अखेरीस त्यांना राहुल गांधींसह घटनास्थळी जाण्याची परवानगी मिळाली.

मात्र प्रियांका गांधी यांची अशा पद्धतीने आक्रमक होण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. विशेषतः योगी सरकारच्या विरोधात.

कारण गेल्या काही दिवसात युपी सरकारला धडक देण्याची प्रियांका गांधींची ही ५ वी वेळ आहे…

१. हाथरस बलात्कार पिडीत कुटुंबीय भेट : 

हाथरस सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित कुटुंबाच्या भेटीवेळी प्रियंका गांधी-राहुल गांधी आणि उत्तरप्रदेश पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हाथरसच्या पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी करत देशभरातील लोकांनी आवाज उठवला होता. अशा स्थितीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरसला रवाना झाले होते, पण त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी ग्रेटर नोएडामध्येच थांबवले होते.

या दरम्यान उत्तरप्रदेश पोलीस आणि प्रियांका गांधींसहित काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बरीच वादावादी झाली होती.

यानंतर दोघेही काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांसह चालत हाथरसकडे रवाना झाले होते. त्यावेळी उत्तरप्रदेश प्रशासनाने हाथरसमध्ये कलम १४४ लागू करत जिल्ह्याच्या सीमा सील केल्या होत्या. मात्र अखेरीस हाताबाहेर जात असलेली परिस्थिती बघून स्वतः पोलिसांनी प्रियांका आणि राहुल गांधी यांची पीडित कुटुंबियांशी भेट घडवून दिली होती.

२. सोनभद्र प्रकरणात २६ तास प्रियांका हटून बसल्या होत्या : 

सोनभद्रमधील घोरावळच्या उम्भा गावात जमिनीच्या वादातून हत्याकांड घडले होते. या घटनेत १० जणांची हत्या करण्यात आली होती. तर २५ जण जखमी झाले. या घटनेबाबत प्रियांका गांधींनी योगी सरकारविरोधात मोर्चा उघडला होता. घटनेच्या तिसऱ्याच दिवशी प्रियांका गांधी पीडितांना भेटण्यासाठी पोहोचल्या होत्या. पण यासाठी त्यांना तब्बल २६ तास संघर्ष करावा लागला. त्या रात्रभर त्यांच्या समर्थकांसह धरण आंदोलनावर बसल्या होत्या.

पोलीस प्रशासनाने प्रियांकांच्या ताफ्याला सोनभद्रला जाण्यापासून रोखले होते, त्यानंतर काँग्रेस समर्थकांसह त्या रस्त्यावरच धरणे आंदोलनावर बसल्या होत्या. यानंतर प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले आणि अधिकारी स्वतः त्यांना गाडीतून चुनार गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले होते. प्रशासनाने त्यावेळी बरेच स्पष्टीकरण दिल्यानंतरही प्रियंका गांधी पीडितांना भेटण्यास ठाम होत्या.

प्रियंका पीडित कुटुंबाला भेटण्यावर ठाम असलेलं पाहून अधिकाऱ्यांनी गेस्ट हाऊसवरच पीडित कुटुंबीयांची भेट घालून दिली होती. यामुळे योगी सरकार बरचं बॅकफूटला गेलं असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. अखेरीस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः सोनभद्र पीडितांना भेटण्यासाठी गेले होते आणि प्रत्येकी १० लाखांची भरपाई जाहीर केली होती.

३. स्कुटीवर बसून दारापुरींना भेटण्यासाठी पोहोचल्या होत्या. 

माजी पोलीस अधिकारी एसआर दारापुरी यांना भेटायला गेले असताना देखील प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेश पोलिस आमने-सामने आले होते. काँग्रेस स्थापना दिनानिमित्त त्या लखनऊला गेल्या होत्या. त्यावेळी माजी पोलीस अधिकारी एसआर दारापुरी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ निदर्शन करताना पोलिसांनी अटक केली होती. 

प्रियंका जेव्हा दारापुरी यांच्या घरी जात होत्या, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले होते. त्यावेळी देखील पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. प्रियांका गांधींनी आरोप केला होता कि पोलिस त्यांना ठिकठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या अंगाला हात लावत धक्का दिला होता. 

यानंतर प्रियंका गांधी काँग्रेसचे नेते धीरज गुर्जर यांच्यासह स्कूटीवर आणि पायी चालत इंदिरानगर इथल्या दारापुरी यांच्या घरी पोहचल्या आणि कुटुंबीयांना भेटल्या. मात्र, या प्रकरणात प्रियांका आणि धीरज यांना विदाउट हेल्मेट गाडी चालवल्याबद्दल दंडही ठोठावण्यात आला होता.

४. मेरठमध्ये प्रियांका-राहुल गांधी यांना अडवण्यात आलं होतं

प्रियांका आणि राहुल गांधी उत्तरप्रदेशमधील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनावेळी मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना भेटत होत्या. याच भेटी दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मेरठला गेले होते. परंतु पोलिसांनी त्यांना मेरठ शहराच्या बाहेरील परतपूर पोलीस स्टेशनजवळच थांबवून ठेवले होते.

त्यावर उपाय म्हणून त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी पोलिसांना सांगितले की फक्त तीनच लोक जातील, पण तरीही पोलिसांनी त्यांना शहरात येऊ दिलं नव्हतं. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावरुन योगी सरकारविरोधात बरीच घोषणाबाजी केली होती.

त्याच्या काही दिवस आधीच प्रियांका गांधी यांनी बिजनौर जिल्ह्यातील नाहटौर हिंसाचारात मारल्या गेलेल्या अनस आणि सुलेमान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती आणि योगी सरकारला काही प्रश्न विचारले होते. याच कारणामुळे पोलिसांनी त्यांना मेरठला जाऊ दिलं नव्हतं असं बोललं गेलं होतं. त्यामुळे त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिल्लीला परतले होते.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.