वडिलांना धोका देणाऱ्या काकाचं प्रियांका गांधी यांनी डिपॉझिट जप्त करून दाखवलं

उत्तरप्रदेशमध्ये सध्या काँग्रेस पक्षाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी प्रियांका गांधी यांच्या करिष्म्यावर अवलंबून आहे असं राजकीय विश्लेषक सांगतायत. अमेठी आणि रायबरेली या गांधी घराण्याच्या परंपरागत मतदारसंघातून बाहेर पडून प्रियांका गांधीही आज अख्खा उत्तरप्रदेश पिंजून काढतायत.

 काँग्रेसला पण प्रियांका गांधींचा अमेठी आणि रायबरेली इथलाच स्ट्राइक रेट पूर्ण राज्यात रिपीट करतील अशी अपेक्षा असणार. 

प्रियांका गांधींचं आक्रमक व्यक्तिमत्व आणि लोकांत सहज मिसळण्याचं कौशल्य यामुळं लोक त्यानं आत दुसऱ्या इंदिरा गांधीही म्हणू लागलेत.

प्रियांका गांधींचा इंदिरा गांधींसारखाच रूथलेस ॲटीट्यूड रायबरेलीकरांनी मात्र १९९९ मध्येच पहिला होता. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी ह्यावेळी बीजीपीनं जोरदार तयारी केली होती. राजीव गांधींच्या हत्येनंतर अमेठीतून निवडून येणाऱ्या कॅप्टन सतीश शर्मा यांना काँग्रेसनं रायबरेलीमधून तिकीट दिलं होतं. कॅप्टन सतीश शर्मा यांनी सोनिया गांधी यांच्यासाठी सोडल्यानं गांधी घराण्यानं आता शर्मा यांना निवडून आणण्याची जबाबदार घेतली होती. भाजपनं कॅप्टन शर्मा यांच्या विरोधात अरुण नेहरू यांना उमेदवारी दिली होती.

अरुण नेहरू तसे नात्यानं राजीव गांधी यांचे भाऊच लागत होते.

इंदिरा गांधी यांनी एक यशस्वी उद्योगपती असलेल्या आपल्या भाच्याला राजकारणात आणलं होतं. पुढे जाऊन ते राजीव गांधी यांच्या ‘किचन कॅबेनेटचा’ भाग झाले. त्यांना राजीव गांधी सरकारमध्ये गृहराज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं.

पण जेव्हा व्हीपी सिंग यांनी राजीव गांधींवर बोफोर्स तोफा खरेदीत दलाली केल्याचा आरोप करत देशव्यापी मोहीम सुरू केली तेव्हा अरुण नेहरू यांनी व्हीपी सिंग यांची बाजू घेतली.

येथूनच त्यांचे गांधी घराण्याशी संबंध बिघडले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

१९९९ मध्ये जेव्हा अरुण गांधींनी रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रियांका गांधींना त्यांच्या वडिलांशी झालेल्या धोक्याचा सूड उगवायचं ठरवलं होतं. कॅप्टन सतीश शर्मा आणि अरुण नेहरू यांच्यात निकराची लढत होणार होती. मात्र अटीतटीच्या निवडणुकीत अरुण नेहरूंचं बाजी मारतील असं सांगण्यात येत होतं.

मात्र अवघ्या तीनच दिवसांपूर्वी निवडणुकीत उतरलेल्या प्रियंका गांधी मात्र भल्याभल्यांचे अंदाज चुकवणार होत्या. प्रियंका गांधींच्या सभेतील एका भाषणाने संपूर्ण निवडणूकिचा निकाल फिक्स केला होता.

 त्या सभेत प्रियांका गांधी गरजल्या ”ज्यानं माझ्या कुटुंबाचा नेहमी विश्वासघात केला, ज्यानं मंत्रिमंडळात असताना माझ्या वडिलां विरोधात कट रचला, ज्यानं काँग्रेसमध्ये असताना जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली, ज्यानं आपल्या भावाच्या पाठीत चाकू खुपसला, तो तुमच्यासाठी कधीही विश्वासूपणे काम करू शकत नाही”

प्रियांका गांधींच्या या भाषणानं रात्रीत जनमतात बदल झाला. कॅप्टन सतीश शर्मा यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे अरुण नेहरू यांचा दारुण पराभव झाला होता. प्रियांका गांधींच्या झंझावातापुढं अरुण नेहरूंना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही. आपल्या वडिलांशी झालेल्या धोक्याचा प्रियांका गांधी यांनी बरोबर हिशोब चुकता केला होता.

मात्र त्यांनतर वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अरुण नेहरू यांच्याबद्दल कोणताच आकस ठेवला नव्हता. जेव्हा अरुण नेहरू यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या देहाला प्रियंका गांधी यांच्या मुलानेच मुखाग्नी दिला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.