प्रियांका गांधीचा बच्चनवर राग तिच्या लग्नापासून आहे.

कॉंग्रेसपक्षाचे कार्यकर्ते ज्यांना आपला तारणहार, इंदिरा गांधीचा पुढचा अवतार वगैरे वगैरे समजतो त्या प्रियांका गांधी यावेळी राजकारणात आल्या. मोदींविरुद्ध त्यांनी चर्चा होती त्याप्रमाणे निवडणूक लढवली नाही मात्र प्रचारावेळी मोदींना चांगलेचं धारेवर धरले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र त्यांनी आपल्या भाषणात एका दगडात दोन पक्षी मारले.

“अब आप समझ लीजिए कि आपने दुनिया के सबसे बड़े अभिनेता को अपना प्रधानमंत्री बना दिया है, इससे अच्छा तो आप अमिताभ बच्चन को ही बना देते, करना तो किसी ने कुछ नहीं है आपके लिए।”

यात मोदीवर टीका तर होतीच पण त्याबरोबर बच्चन यांच्यावर हलकासा टोला होता. प्रियांका यांच्यावर यानिम्मिताने बरीच टीका देखील झाली. या सगळ्या चर्चेला गांधी-बच्चन घराण्याच्या वादाची किनार होती. अमिताभ बच्चन यांचं कुटुंब म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात शक्तिशाली घराण्या पैकी एक तर प्रियांका गांधी यांची फॅमिली म्हणजे भारताच्या राजकारणावर गेली सत्तर वर्षे प्रभाव असणार कुटुंब.

काय आहे नेमका यांच्या वादाचा इतिहास??

एकेकाळी हे दोन्ही कुटुंब अगदी एकमेकांच्या जीवाभावाचे होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं आणि अमिताभच्या वडीलांचं  गाव एकच ते म्हणजे अलाहाबाद. सरोजिनी नायडू या हरिवंशराय आणि तेजी या बच्चन दांपत्याची ओळख पंडितजीशी करून दिली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,

“हे कविराज आणि ही त्यांची कविता”

तेव्हा पंडितजींची मुलगी इंदिरा गांधी तिथे उपस्थित होती. पुढे त्यांची आणि तेजी बच्चन यांच्या घनिष्ट मैत्री वाढली. त्यांची मुलेही एकमेकांचे मित्र बनले. अमिताभ आणि त्याचा भाऊ अजिताभ हे सुट्टीच्या काळात राजीव गांधी संजय गांधी बरोबर खेळायला पंतप्रधान निवास मध्ये जायचे. पुढे तरुण पणाथी ही मैत्री वाढली.

ही मैत्री एवढी गाढ होती की जेव्हा राजीव आणि सोनिया यांच प्रेमप्रकरण सुरु होतं तेव्हा अमिताभच्या आईने इंदिरा गांधीना या लग्नासाठी तयार केलं होत. सोनिया गांधी भारतात आल्या तेव्हा त्यांना विमानतळावर रिसीव्ह करण्यासाठी स्वतः अमिताभ आला होता. तेव्हा पासून राजीवसोबत लग्न होईपर्यंत  सोनिया दिल्लीमध्ये तेजी बच्चन यांच्या घरात राहायला होत्या. एकाअर्थी सोनिया यांची पहिली सासू तेजी बच्चन या होत्या. त्यांनीच तिला भारतीय संस्कृती, हिंदी भाषा शिकवली.  हरिवंशराय बच्चन यांनी तिचं कन्यादान केलं होतं.

असं म्हणतात की अमिताभने सिनेमात भूमिका मिळवण्यासाठी इंदिरा गांधींचा वशिला वापरला होता. राजीव गांधी स्वतः मुंबईत येऊन फिल्म इंडस्ट्रीमधल्या मोठमोठ्या कलाकारांना अमिताभसाठी भेटले होते.  अमिताभवर भारतातल्या सर्वात शक्तिशाली कुटुंबाचा वरदहस्त आहे हे सगळ्यांना कळाले होते. 

पुढे अमिताभ सुपरस्टार झाला. राजीव गांधी तेव्हा इंडियन एयरलाईन्स मध्ये पायलट म्हणून जॉईन झाले. अमिताभ, संजय, अजिताभ हे सगळे तो पर्यंत विवाहित झाले होते. राजीव गांधीना तेव्हा राजकारणात रस नव्हता. अनेकदा सिनेमाला जाणे, नाटकाला जाणे , सहलीवर जाने अशा अनेक गोष्टीमध्ये बच्चन कुटुंब त्यांच्यासोबत असायच. राहुल , प्रियंका,वरुण या भावडांसाठी अमिताभ त्यांचा मामू होता.

जेव्हा संजय गांधींचे अपघाती निधन झाले, राजीव गांधी राजकारणात आले तेव्हा त्यांच्या बरोबर राजकीय वर्तुळात अमिताभचं दर्शन देखील होऊ लागलं. असं म्हणतात की बच्चनमुळेचं राजीव गांधीनी रेखाचे वडील जेमिनी गणेशन यांच्या राज्यसभेच्या खासदारकी ऑफर केली होती. पण त्यांनी ती नाकारली.

इंदिराजींचा खलिस्तानवादी अतिरेक्यांनी खून केला आणि राजीव गांधीना कमी वयात अनपेक्षितपणे पंतप्रधानपद आलं. राजीव यांना राजकारणाचा पुरेसा अनुभव नव्हता. त्यांना राजकारणाची जुनी पठडी मोडायची होती. म्हणूनच त्यांनी आपल्या उच्चशिक्षित मित्रांना आपल्या सोबत राजकारणात आणले. याचं बरोबर अमिताभही होता.

अलाहाबाद मधून निवडणूक लढवून तो खासदार ही झाला. राजीव गांधीच्या सल्लागारात त्याचे नाव येऊ लागले. त्याच्यावर टीका ही होऊ लागली. एकदा राजीव गांधी आणि बच्चन कुटुंबीय सुट्टीसाठी अंदमान येथे एकत्र गेले असता काही वृत्तपत्रांनी त्यांच्यावर लष्कराच्या युद्धनौकेचा गैरवापर केला म्हणून आवई उठवली. बोफोर्स मध्ये राजीव गांधी यांच्या बरोबर अमिताभ व अजिताभ या भावांच देखील नाव आलं. अमिताभने खासदारकीचा राजीनामा दिला आणि राजकारणाला रामराम ठोकला.

ही अमिताभ आणि राजीव यां दोस्तांच्यात कटुता येण्यास सुरवात होती. पुढे काहीच वर्षात जेव्हा राजीव गांधी यांचा खून झाला तेव्हा अंत्यसंस्कारावेळी अमिताभ राहुल गांधी यांना धीर देत सर्वात पुढे उभा असलेला दिसला. राजीव गांधीच्या मृत्यूनंतर सोनिया यांनी राजकारणात जाऊ नये हे त्यांना पटवून देणारा अमिताभचं होता.

amitabh rahul 660 082912053516

पण पुढे हळूहळू बच्चन कुटुंब गांधीपासून दूर होऊ लागल. त्याकाळात अमिताभला सिनेमात यशही मिळत नव्हते, एबीसीएलच्या अपयशाने बच्चन कर्जबाजरी झाला होता. पण नेहमी प्रमाणे त्याला वाचवायला गांधी कुटुंब आले नाही. याचा त्याला राग आला. जया बच्चन आणि सोनिया गांधी यांचेही आपापसात पटत नव्हते. तिने  बोफोर्स खटल्यामध्ये बच्चनला कॉंग्रेसने मदत केली नाही असा सरळ आरोप केला. दोन्ही कुटुंबातले वाद बाहेर येऊ लागले.

या दोन्ही कुटुंबाच्या मैत्रीचा शेवट प्रियांका गांधी यांच्या लग्नावेळी झाला.

१८ फेब्रुवारी १९९६ रोजी प्रियंका गांधीचं लग्न रॉबर्ट वद्रा या उद्योगपतीशी होणार होता. सगळ्या निमंत्रणपत्रिका वाटून झाल्या होत्या. आणि अचानक बातमी आली की अमिताभने आपल्या मुलीचा श्वेताचा विवाह प्रियांकाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी करायचं ठरवलं आहे. हे लग्न चट मंगनी पट ब्याह या पद्धतीने ठरलं होत.

श्वेताच लग्न १७ तारखेला संध्याकाळी मुंबईमध्ये तर प्रियांकाचं लग्न १८ तारखेला दिल्लीमध्ये. अनेक जण या दोन्ही कुटुंबाचे कॉमन फ्रेंड होते ज्यांना हे दोन्ही लग्न अटेंड करताना खूप तारांबळ उडणार होती.  अमिताभच्या मुलीच्या लग्नाला अनेक फिल्मस्टार उपस्थित राहणार होते पण त्यांना प्रियांकाच्या लग्नाला जायला मिळणार नव्हते. मिडियामधल्या काही जणानी मत व्यक्त केले की अमिताभने मुद्दामने ही तारीख निवडली.

काही का असेना हीच गोष्ट प्रियांकाच्या मनाला खूप लागली असणार. त्या भांडणानंतर गांधी आणि बच्चन घराणे अधिकृतपणे एकमेकापासून दूर गेले. पुढे अभिषेकच्या लग्नाचे निमंत्रण गांधी कुटुंबाला दिले गेले नाही. राजकारणाचे पडसाद घरगुती नात्यावर पडले.

जया बच्चन यांनी समाजवादी पक्षाच्या मंचावरून सोनिया यांच्यावर बऱ्याचदा टीका केली. राहुल व सोनिया यांनीदेखील त्यांना अनेकदा प्रत्युत्तर दिले. अमिताभला कॉंग्रेस सरकारच्या काळात बऱ्याचदा कायदेशीर अडचणी आणण्यात आल्या होत्या पण समाजवादी नेते अमरसिंह यांनी बच्चन कुटुंबाला या कचाट्यातून बाहेर काढले.

आज या गोष्टीला अनेक वर्षे झाली. अमिताभ बच्चन राजकारणापासून दूर आहेतचं पण जया बच्चन यांनी देखील राजकारणाला रामराम ठोकला आहे.  या दोन्ही कुटुंबाचे नाते अजूनही सुधारलेले नव्हते.  अमिताभ यांनी ट्विटर वर राहुल व प्रियांका याना फॉलो करून पहिले पाउल टाकले. राहुल यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला. पण प्रियांका गांधी ही जास्त आक्रमक आहे. ती आपल्या आईचा अपमान विसरणारी नाही आणि याचीच झलक तिने परवा प्रचारावेळी दिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.