एका भारतीयाने बनवलेल्या सूत्रामुळे जगाला आईन्स्टाईनचा सिद्धांत सोडवायला मदत झाली.
जगातला सर्वात हुशार माणूस म्हणून ओळखला जाणारा अल्बर्ट आईन्स्टाईन. गेल्या शतकात त्याने मांडलेल्या अनेक सिद्धांतांमुळे संपूर्ण जगाचं चित्र बदलून गेलं असं म्हणतात. आपल्या काळाच्याही पुढचा विचार करणारा असा हा संशोधक. अनेकदा असं व्हायचं कि त्याने मांडलेल्या कित्येक थिएरी कोणाला समजायच्याच नाहीत.
आईन्स्टाईनने मांडलेल्या थियरीला सोपे करून सांगण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता देखील त्याच्या तोडीस तोड हवी. भारतातल्या अशाच एका शास्त्रज्ञाने आईन्स्टाईनचे सिद्धांत जगाला सोपे करून दिले.
त्यांचं नाव प्रल्हाद चुन्नीलाल वैद्य
प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ प्रल्हाद चुन्नीलाल वैद्य यांचे गणिताच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान आहे. सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांतातील योगदानाबद्दल त्यांची विशेषतः आठवण काढली जाते.
प्रल्हाद चुन्नीलाल वैद्य यांचा जन्म 23 मे 1918 रोजी गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील शाहपूर येथे झाला. तर प्राथमिक शिक्षण भावनगर येथे झाले. गणिताची विशेष आवड असल्याने त्यांनी मुंबई विद्यापीठातून लागू गणितातील विशेषीकरणासह एम.एस.सी ची डिग्री मिळवली.
त्यांच्या काळातील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ विष्णू वासुदेव नारळीकर यांचा वैद्यांवर फारच प्रभाव होता.
त्यावेळी विष्णू वासुदेव नारळीकर यांच्याबरोबर काम करणाऱ्या संशोधकांच्या गटाला सापेक्षतेचे केंद्र म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य यांनाही या क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा होती. म्हणून वैद्य बनारस हिंदू विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी विष्णू वासुदेव नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापेक्षतेच्या सिद्धांतावर संशोधन सुरू केले आणि ‘वैद्य समाधान’ सादर केले.
आइनस्टाइनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत अवघड गणिती समीकरण म्हणून समोर येतो. ही समीकरणे सोडवणे कठीण होते. प्रल्हाद चुन्नीलाल वैद्य यांनी हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले.
आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सिद्धांतामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज त्यांच्यामार्फत विकसित केलेली पद्धत ‘वैद्य मैट्रिक’ म्हणून प्रसिद्ध आहे. या पद्धतीत त्यांनी रेडिएशन उत्सर्जित करणाऱ्या कोणत्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणा संदर्भात आइन्स्टाईनची समीकरणे सोडविली. त्यांच्या या कार्यामुळे आइन्स्टाईनचा सिद्धांत समजण्यास मदत झाली.
साठच्या दशकात जेव्हा खगोलशास्त्रज्ञांनी उर्जेचे घन शक्तिशाली उत्सर्जक शोधले. तेव्हा सापेक्षतावादी खगोलशास्त्राला मान्यता मिळाली, आईन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्व संपूर्ण जगाला कळालं. आणि हा सिद्धांत जगाला उलगडून दाखवणाऱ्या “वैद्य सॉल्यूशन”ला विज्ञान क्षेत्रात सहजपणे आपले स्थान मिळाले.
जगभरातल्या नेचर, फिजिकल रिव्हिव्ह लेटर्स, ऍस्ट्रॉफिजिकल जर्नल व करंट सायन्स अशा मान्यता प्राप्त मासिकांमध्ये वैद्य यांचे संशोधन छापून देखील आले.
वैद्य एक प्रसिद्ध गणितज्ञ तसेच एक शिक्षणतज्ज्ञ होते. मुलांना गणितात आवड निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांचा असा विश्वास होता की गणित शिकवणे कदाचित अवघड आहे, परंतु गणित शिकणे अवघड नाही कारण ते आपल्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहे. त्यांनी गुजराती आणि इंग्रजी भाषेतील विज्ञान आणि गणिताची अनेक प्रसिद्ध पुस्तके लिहिली, जसे की ‘अखिल ब्राह्मणमन’, ज्याचा अर्थ म्हणजे संपूर्ण विश्व, आणि ‘व्हॉट इज मॉडर्न मॅथमेटिक्स’.
1947 पर्यंत त्यांनी सूरत, राजकोट, मुंबई इत्यादी येथे गणिताचे शिक्षक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी आपले शिक्षणही सुरू ठेवले. 1948 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केले. त्यांनी नव्याने स्थापित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक रिसर्चमधून त्यांचे संशोधन केले. इथेच त्यांनी प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा यांची भेट घेतली.
काही काळानंतर ते मुंबई सोडून आपल्या गुजरात राज्यात परतले.
1948 मध्ये त्यांनी बल्लभनगरमधील विठ्ठलभाई पटेल कॉलेजमध्ये काही काळ काम केले. त्यानंतर त्यांची गुजरात विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. वैद्य यांनी आपले संपूर्ण आयुष्य एकनिष्ठ शिक्षक म्हणून व्यतीत केले. त्यांना गणिताचे शिक्षक म्हणून अभिमान वाटायचा. प्रशासकीय बांधिलकी असूनही, ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ काढत असत.
1971 मध्ये त्यांची गुजरात लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते 1977-78 दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्यही होते. 1978-80 दरम्यान ते गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठात त्यांना अनेकदा गेस्ट लेक्चरर म्हणून निमंत्रित करण्यात येत असे.
गुजरात मॅथेमॅटिकल सोसायटीच्या स्थापनेत वैद्य यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटरच्या विकासातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. इंडियन असोसिएशन फॉर जनरल रिलेटिव्हिटी अँण्ड ग्रॅव्हीटेशन (आयएजीआरजी) स्थापनेतही वैद्य यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. 1969 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर विष्णू वासुदेव नारळीकर होते.
स्वातंत्र्योत्तर भारतात ते गांधीवादी तत्वज्ञानाचे अनुयायी म्हणून ओळखले जातात. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित स्वातंत्र्य चळवळीत वैद्य देखील सहभागी झाले होते. गांधीवादी विचारांना ग्रहण करीत त्यांनी खादी कुर्ता आणि टोपी घातली. कुलगुरू असूनही त्यांनी सरकारी गाडी वापरण्यास नकार दिला आणि विद्यापीठात जाण्यासाठी सायकलचा वापर सुरू ठेवला.
प्रल्हाद चुन्नीलाल वैद्य यांचे 12 मार्च 2010 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. प्रल्हाद चुन्नीलाल वैद्य यांचे योगदान पाहता विज्ञान प्रसार या संस्थेने त्यांच्यावर एक माहितीपटही तयार केला आहे.
हे ही वाच भिडू.
- भारतीयांची विचार करण्याची क्षमता कमी आहे म्हणणाऱ्या आईन्स्टाईनने पुढे टागोरांना गुरु मानले.
- या मराठी नेत्याच्या सुटकेसाठी आईनस्टाईनने आपला शब्द टाकला होता
- आईनस्टाईन यांच्या स्टडीरूमच्या भिंतीवर एका भारतीयाचा फोटो होता.