आणि प्रमोद महाजनांनी चीनच्या नेत्याला भारतीय लोकशाहीचा अर्थ समजावून सांगितला.

भारतीय राजकारणात कै.प्रमोद महाजन यांना मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जायचे. खास त्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी लोक सभांना गर्दी करायचे. या सभा त्यांनी जशा गाजवल्या. तसेच आपल्या संसदेमधल्या भाषणांनी विरोधकांनाही जिंकले.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली.

तेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे तिसऱ्या आघाडीच विविध पक्षाच कडबोळ सरकार सत्तेत होतं. अत्यंत अनपेक्षितपणे पंतप्रधानपदी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.देवेगौडा यांची निवड झाली होती .

एकदा भारतीय सर्व-पक्षीय संसदीय मंडळ चीनच्या दौऱ्यावर गेले होते. यात प्रमोद महाजन व बरेच खासदार होते. त्यावेळी चीनच्या संसदेतील नेते मंडळींशी त्यांची ओळख झाली. गप्पा मारताना तिथल्या एका नेत्याने भारतीय लोकशाही बद्दल उत्सुकतेने प्रश्न विचारले.

तेव्हाचे कायदे मंत्री रमाकांत खलप यांनी प्रमोद महाजनांना सांगितलं की यांना भारतीय लोकशाही समजावून सांगा.

महाजन म्हणाले,

मी तुम्हाला भारतीय लोकशाही समजावून सांगू शकेन की नाही सांगता येत नाही पण आमच्या खासदारांची ओळख करून देतो यातून तुम्हाला लोकशाही समजून येईल.

सर्वात आधी माझी ओळख सांगतो. मी प्रमोद महाजन मी भारतीय लोकसभेचा सदस्य आहे. माझा पक्ष सभागृहातील सर्वात मोठा पक्ष आहे तरीही आम्ही विरोधात आहोत. आमची सत्ता नाही.

हे ऐकून त्या चीनी नेत्याला धक्का बसला. त्याला काही समजेना.

प्रमोद महाजन हसले, त्यांनी काँग्रेसच्या चिंतामणी पाणिग्रहींकडे हात केला आणि सांगितलं,

हे भारतीय लोकसभेच्या दोन नंबरच्या पक्षाचे खासदार आहेत पण हे सुद्धा सत्तेत मध्ये नाहीत. त्यांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे.

मग प्रमोद महाजनांनी जनता दलाच्या एका खासदाराकडे बोट केलं आणि म्हणाले,

हे अहमद बेदी. यांचा पक्ष संसदेतला तिसरा मोठा पक्ष आहे, पण तरी हे सुद्धा सरकारमध्ये नाहीत.

सगळ्यात शेवटी प्रमोद महाजनांनी शेजारी बसलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या रमाकांत खलप यांची ओळख करून दिली,

हे रमाकांत खलप. हे यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत. पण हेच सध्या सरकारमध्ये आहेत.

भारतीय लोकशाहीच हे गुंतागुंतीच रूप ऐकून त्या प्रश्न विचारणाऱ्या चीनी माणसाला वेड लागायची पाळी आली असेल. चीन मध्ये फक्त एकच पक्ष आहे आणि गेली कित्येक वर्षे या कम्युनिस्ट पक्षाची सत्ता चालू आहे. भारताची अजब लोकशाही जगभरात अनेकांना बुचकाळ्यात पाडत असते.

 

भारताची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमजोरी ही लोकशाही आहे.

हा विनोदी किस्सा स्वतः प्रमोद महाजन यांनी ११ एप्रिल १९९७ रोजी देवेगौडा सरकार विरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर गरमागरम चर्चा सुरू असताना केलेल्या सुप्रसिद्ध भाषणावेळी सांगितला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.