ते पुन्हा आले, पण त्यांच्यासोबत मंत्री म्हणून झळकणारे हे चेहरे ही आत्ता रोज दिसू लागतील..

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर पडदा पडला. नेमकं काय होणार ? याचं उत्तर मिळालं आणि सोबतच देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार का ? याचंही उत्तर मिळालं.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होण्याची आता औपचारिकता उरलीये. साहजिकच त्यांच्या मंत्रीमंडळात काही नवे चेहरे येतील आणि काही जुने चेहरे नव्यानं दिसतील.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर रोज सकाळी बातम्यांमध्ये काही चेहरे हमखास दिसायचे, ते म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत. मलिक सध्या अटकेत आहेत, तर आमदारांच्या बंडानंतर, सरकार कोसळल्यानंतर राऊतांवरचं दडपण वाढलेलं आहे. त्यामुळं हे दोघं माध्यमांसमोर कितपत येतील यावर शंका आहेच.

साहजिकच माध्यमांमध्ये दिसणारे चेहरे असतील, ते नव्या मंत्रीमंडळातले.

येणाऱ्या काही दिवसात भाजपचं सरकार स्थापन झाल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत माध्यमांमध्ये कुणाचे चेहरे पाहायला मिळतील, याचा अंदाज पाहुयात…

पहिलं नाव येतं, चंद्रकांत पाटील

फडणवीस सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूलमंत्रीपद होतं. सध्या ते महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. नव्या सरकारमध्ये चंद्रकांत दादांकडे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी निश्चितच दिली जाऊ शकते.

दुसरं नाव आहे, सुधीर मुनगंटीवार

२०१४ ते १९ या काळात अर्थमंत्री, वनमंत्री आणि नियोजनमंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार भाजपची सत्ता गेल्यानंतर काहीसे बॅकफूटला गेले होते; मात्र त्यांनी सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागणं काही सोडलं नाही. नवं मंत्रीमंडळ स्थापन झालं, तर मुनगंटीवारांना नवी जबाबदारी अर्थातच मिळेल.

तिसऱ्या आहेत, पंकजा मुंडे

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात सतत पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतोय का? अशी चर्चा सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होण्यामागेही भाजपच असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांना ना राज्यसभेत संधी मिळाली आणि ना विधान परिषदेत. त्यामुळं पंकजा मुंडे नाराज असून, त्या वेगळा विचार करतील असं बोललं जात होतं.

त्यामुळं भाजपसमोर पंकजा मुंडे यांचं पुर्नवसन कसं करायचं ? हा प्रश्न आहेच. त्यामुळं त्यांना महत्त्वाचं मंत्रिपद देऊन राजकीय पुर्नवसन केलं जाणार का? हा चर्चेचा विषय आहे.

चौथे आहेत, गिरीश महाजन

महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गिरीश महाजन. फडणवीस सरकारच्या काळात जलसंधारण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी महाजन यांच्याकडे होती. नव्या मंत्रिमंडळातही त्यांना मोठ्या जबाबदारीचं मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे.

पाचवं नाव येतं, विनोद तावडे यांचं

भाजपच्या पहिल्या फळीतले नेते अशी ओळख असणाऱ्या विनोद तावडेंकडे फडणवीस सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्री पद होतं. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं मंत्रिपद काढून आशिष शेलार यांची तिथं वर्णी लागली. राज्यातल्या इतर भाजप नेत्यांचं महत्त्व वाढत असताना तावडे मात्र झाकोळले गेले होते. राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती, मात्र तिथंही तिकीट मिळालं नाही.

भाजपनं त्यांची राष्ट्रीय महासचिव पदावर निवड केली, सोबतच पक्षाच्या राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये तावडे यांना स्थान मिळालं. त्यामुळं मंत्रीपद देऊन तावडेंना मुख्य प्रवाहात आणण्यात आलं तर त्यांचा चेहरा पुन्हा बातम्यांमध्ये दिसू शकतो.

सहावं नाव म्हणजे आशिष शेलार

मंत्रीमंडळ विस्तारात शेलार यांना शालेय शिक्षणमंत्रीपद मिळालं. त्यांची गणनाही राज्य भाजपच्या पहिल्या फळीत घेतलं जातं. राज्यातली सत्ता मिळाल्यानंतर भाजपचं मुख्य ध्येय असेल, ते म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवणं. यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल यात शंका नाहीच, त्यामुळं वांद्रे पश्चिमचे आमदार आणि मुंबईत वर्चस्व असलेल्या आशिष शेलार यांना मंत्रीपद देऊन भाजप त्यांची ताकद नक्कीच वाढवेल.

सातवं नाव येतं, राधाकृष्ण विखे पाटील यांचं

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर, भाजपच्या काही अंतर्गत बैठकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात राधाकृष्ण विखे पाटील आवर्जून उपस्थित होते. काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षणमंत्री, कृषीमंत्री अशी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. पुढं विरोधी पक्षनेते असतानाच त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही महिन्यांसाठी त्यांना गृहनिर्माण मंत्रीपद सांभाळलं.

अहमनगरवर असलेलं एकहाती वर्चस्व आणि ज्येष्ठता पाहता, विखेंना महत्त्वाचं मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आठवे नेते म्हणजे सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं. त्यानंतर विधानपरिषदेत त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना भाजप पुन्हा संधी देईल असं सांगितलं जात होतं. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळं सदाभाऊ खोत यांचंही पुनर्वसन करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.

फक्त ही आठ नावंच नाहीत, तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर वारंवार टीका करणारे किरीट सोमय्या सुद्धा सातत्यानं माध्यमांमध्ये दिसू शकतात. प्रवीण दरेकर, राम कदम यांनाही संधी मिळू शकते. सोबतच एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांनाही मंत्रिपदाची संधी मिळेल.

फक्त हा आकडा किती असेल आणि नावं कुठली असतील, याचे मात्र सध्या तरी फक्त अंदाजच व्यक्त केले जातील, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.