पठाणचा गल्ला २२ दिवसात ५०० कोटी… हे बॉक्स ऑफीस कलेक्शन नेमकं मोजतात कसं?

कपड्याच्या रंगावरून झालेली कान्ट्रोव्हर्सी, सोशल मीडियावर चाललेला बॉयकॉटचा ट्रेंड या सगळ्यावर मात करत पठाण काल रिलीज झालाय. प्री-बुकिंगला तर पठाणने धमाका केलाच होता. त्यात आता पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई समोर आली आहे.

पठाणने भारतात पहिल्याच दिवसात तब्बल ५२-५५ कोटी रुपयांची कमाई केली होती… दुसऱ्या दिवशी ७० कोटीच्या आसपास आणि असंच सुरू राहिलं. पहिल्याच दिवशी वर्ल्डवाईड कलेक्शन १०० कोटी करणाऱ्या पठाणनं वर्ल्डवाईड ५०० कोटींचा आकडा पहिल्या ६ दिवसांच्या आतच पार केला होता.

आता रीलीझच्या २२व्या दिवशी पठाणने इंडियन बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला केलाय आणि असं करणारा बॉलीवूडचा पहिला सिनेमा ठरलाय.

या बॉयकॉट वगैरेच्या ट्रेंडला शाहरूखचा पठाण पुरून उरलाय हे या आकड्यांवरून लक्षात येतंय. पण विषय हा आहे की, हे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन असतं ते नेमकं मोजतात कसं? ते काय असतं? हेच बघुया…

मल्टिप्लेक्समध्ये गेल्यावर आपण जिथून तिकीट घेतो तिथं वर मोट्ठ्या अक्षरात लिहिलेलं असतंय, बॉक्स ऑफिस.

पण पिक्चर बघायला जाताना जे तिकीट काढतो, तेच बॉक्स ऑफिस कलेक्शन असतंय. पण हे मोजलं कसं जातं आणि त्यात शेअर कुणाकुणाचा असतो.. हे सगळं गणित जरा किचकटच आहे. ते समजून घ्यायचं असेल तर, आधी सिनेमाचा बिझनेस कसा चालतो हे बघावं लागेल.

तर पिक्चर बनवायला पैसे लावणारे कार्यकर्ते असतात, ते म्हणजे प्रोड्युसर्स. त्यांनी लावलेल्या पैशातून पिक्चर तयार होतो, त्याची जाहिरात आणि मार्केटिंग होतं, आता पुढचा विषय असतो तो पिक्चर थिएटरमध्ये लावायचा. ते काम करतात डिस्ट्रिब्युटर कार्यकर्ते. प्रोड्युसर आपल्या पिक्चरचे थिएटर राईट्स डिस्ट्रिब्युटरला विकतात. मग डिस्ट्रिब्युटर कार्यकर्ते थिएटरवाल्यांशी करार करुन पिक्चर थिएटरमध्ये लावतात.

आता या सगळ्यात पिक्चर पडला, तर लॉस डिस्ट्रिब्युटरला सहन करावा लागतो. प्रॉफिट झाला तरी पैसे डिस्ट्रिब्युटरच्याच खिशात जातात.

अजून दोन कार्यकर्त्यांचा रोल राहिलाय. पहिले म्हणजे थिएटर मालक. डिस्ट्रिब्युटर आणि मालकांमध्ये एक करार झालेला असतो. त्यानुसार डिस्ट्रिब्युटर लोक थिएटरमध्ये पिक्चर लावतात. आपल्या भारतात दोन टाईप्सची थिएटर्स आहेत, पहिलं म्हणजे मल्टिप्लेक्स जिथं आपण फॅमिली सोबत किंवा आपल्या खड्यासोबत जातो, तिथं पिक्चर बघणं हा रॉयल कारभार असतो. दुसरं म्हणजे सिंगल स्क्रीन थिएटर, जिथं कितीपण रद्दी पिक्चर बघण्यात, आपल्या दोस्तांसोबत जाण्यात एक वेगळीच शान असते, बरं हा कारभार मात्र स्वस्तात मस्त.

या गणितात सगळ्यात महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही, अर्थात प्रेक्षक.

आपण थिएटरला गर्दी केली, की बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढतंय, नायतर पिक्चर पडला. आपण समजा पहिल्याच आठवड्यात लय गर्दी केली, तर पिक्चर दुसऱ्या आठवड्यात जाणार. पहिल्याच आठवड्यात गर्दी नाय झाली, तर पिक्चरचे शो कमी होतात आणि त्याला थिएटर मिळत नाय.

आता समजा पुष्पा पिक्चर आहे, ज्याचं तिकीट आहे शंभर रुपये, आठवड्याला शो लागलेत शंभर आणि प्रत्येक शोला जातायत शंभर लोकं. तर एका आठवड्यात त्या थिएटरमध्ये पुष्पाचं कलेक्शन झालं, १० लाख रुपये.

आपल्या भारतात डिस्ट्रिब्युशनचे १४ सर्किट्स आहेत, त्या १४ सर्किट्समधल्या सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स थिएटर्सचं कलेक्शन एकत्र केलं जातं आणि मग शंभर कोटी, दोनशे कोटी असे आकडे फुटतात. जे काय कलेक्शन होतं त्यातून राज्यानं ठरवल्यानुसार एन्टरटेन्मेंट टॅक्स कट होतो. मग उरलेले पैसे म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

आता हे पैसे डिस्ट्रिब्युट कसे होतात, याचं पण एक गणित असतंय.

सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये अर्थातच शो कमी लागतात, त्यामुळं होणारा प्रॉफिट थोडा कमी असतो. त्यामुळं डिस्ट्रिब्युटर आणि सिंगल स्क्रीन थिएटर मालकांमधला करार थोडा वेगळा असतो. ज्या आठवड्यात पिक्चर लागतो, तेव्हापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत जे कलेक्शन थिएटरमध्ये होईल त्यातली ७० ते ९० टक्के रक्कम डिस्ट्रिब्युटरला दिली जाते.

मल्टिप्लेक्सवाले मात्र पहिल्या आठवड्यातल्या कलेक्शनमधली ५० टक्के रक्कम डिस्ट्रिब्युटरला देतात. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा असतो ४२ टक्के, तिसऱ्या आठवड्यात ३७ टक्के आणि त्यानंतर पिक्चर सुरू आहे तोवर आठवड्याला ३० टक्के रक्कम डिस्ट्रिब्युटरला दिली जाते.

आता डिस्ट्रिब्युटर लोकं फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनमधूनच नाही, तर ओटीटी राईट्स, म्युझिक आणि सॅटेलाईट राईट्स यातून पण पैसे छापतात. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसची स्वतःचीच डिस्ट्रिब्युशन कंपनीही असते.

आता यात आपल्याला पैसा दिसत असला, तरी पिक्चरचे राईट्स महागात घेतले आणि पिक्चर पडला, तर नुकसानाची रिस्क पण तेवढीच असते. पण कसंय ना लाला, रिस्क है तो इष्क है… या डायलॉगच्या बळावरच तर इतकी वर्ष सिनेमाचा हा बिझनेस सुरू आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.