राष्ट्रपती असतांना कलामांनी त्यांचा संपूर्ण पगार हा एका चॅरिटेबल ट्रस्टला दान दिला होता.

ए.पी.जे अब्दुल कलाम हे आपल्या देशातील प्रत्येकांसाठीच प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण ऐकलेत, वाचलेत त्याचप्रमाणे त्यांचा अजून एक व्यक्तिमत्व गुण म्हणजे काटकसरीपणा !

राष्ट्रपती भवन ला पैशांची बचत करणं शिकवलं ते अब्दुल कलामांनीच !

कारण जसे ते राष्ट्रपती पदावर नियुक्त झाले तसे त्यांनी राष्ट्रपती भवनात होणारे अतिरिक्त खर्चाला आळा बसवला होता. एकदा त्यांनी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या इफ्तार पार्ट्यादेखील बंद केल्या होत्या. आणि त्यासाठी बाजूला काढलेला पैसा त्यांनी भवनाच्या माध्यमातून ८८ अनाथालयांना दान म्हणून दिला होता.

इतकेच नाही तर डॉ. कलाम यांनी त्यांचा संपूर्ण पगार आणि सेविंग हि एका चॅरिटेबल ट्रस्टला दान दिली होती. 

खरं तर यामागे त्यांची भावना होती कि, भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य सरकार त्यांची काळजी घेईल, सर्व सोयी-सुविधा पुरवेल तर मग मिळत असलेला पगाराचा वापर चांगल्या गोष्टींसाठी का केला जाऊ नये म्हणून त्यांनी हि आर्थिक मदत देऊ केली.

बरं ज्या संस्थेला त्यांनी हि मदत दिली होती ती प्रोवेडींग अर्बन ऍमेनिटी टू रूरल एरियाज PURA ही संस्था कलामांच्याच संकल्पनेतून निर्माण झाली होती.

थोडक्यात हि संस्था ग्रामीण भागात नागरी सुविधांची तरतूद पुरवते म्हणजेच ग्रामीण भागातील विकासाची ही एक रणनीती आहे. ही संकल्पना माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचीच आहे. याचा उल्लेख त्यांनी ‘टार्गेट ३ बिलियन’ या पुस्तकात केलाय. त्यांनी लिहिले कि, स्वयंपूर्ण आणि विकसित तालुका आणि जिल्हा हा ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगार व चांगल्या सुविधांच्या बाबतीत नवीन विकासाचे मॉडेल ठरू शकतो.

शहराबाहेरील आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शहरी पायाभूत सुविधा व सेवा पुरविल्या जाव्यात असा PURA चा प्रस्ताव आहे. रस्ते बांधून ग्रामीण-शहराचा संपर्क साधणे, संप्रेषण नेटवर्क पुरवून इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी आणि व्यावसायिक व तांत्रिक संस्था स्थापन करायची.  याचबाबतीत भारत सरकार २००४ पासून अनेक राज्यात हा पायाभूत कार्यक्रम चालविला जातोय. श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन याच मिशनचा एक भाग आहे.

याची पार्श्वभूमी पाहता, भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ग्रामीण विकासासाठी कल्याणकारी योजना आणि उपक्रम लागोपाठ आणले. तरीही पंचवार्षिक योजना असूनही ग्रामीण आणि शहरी भागातील असमानता वाढवणार्‍या एक विकासात्मक मॉडेलचा प्रसार वाढला. रोजगाराच्या संधींचा अभाव असल्यामुळे तसेच आधुनिक सुविधा उपभोगणाऱ्या ग्रामीण लोकांचे शहरी भागात स्थलांतर होत गेले.

ग्रामीण आणि शहरी भागातील्या सामाजिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमध्ये मोठी तफावत आढळून येते. आणि याच मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारताचे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरविण्यासाठी मिशन सुरू केले.

आणि उद्देश होता फक्त ग्रामीण भारताच्या परिवर्तनाच्या दृष्टीवर प्रकाश टाकणारा !

PURA हे थोडक्यात PPP च्या सूत्रानुसार चालते… म्हणजेच पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप.

PURA चे मिशन आणि व्हिजन हे अनुभव आणि कौशल्याचे एकत्रीकरण होय. आणि ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी ग्रामपंचायती आणि खाजगी क्षेत्राची भागीदारी यांच्यात पीपीपीच्या चौकटीत साध्य केली जातात.

या योजनेचा पायलट प्रोजेक्ट केला गेला तो महाराष्ट्रातल्या बासमथ, उत्तर प्रदेश भरथना, आसाममधील गोहपूर, उडीसामध्ये कुजंगा, बिहारमधील मोतीपूर, आंध्र प्रदेशमधील रायदुर्ग आणि राजस्थानमधील  शाहपुरामध्ये दहाव्या पंचवार्षिक योजनेत सात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट (एनआयआरडी) द्वारे या पथदर्शी प्रकल्पांचा मूल्यांकन केलं गेलं तसेच त्याचा  अभ्यास केला गेला ज्यामध्ये समुदाय आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग हा आवश्यक घटक म्हणून ओळखला गेला.

या विशाल आणि महत्त्वपूर्ण योजनेचा भविष्यात त्याचा काय परिणाम होईल आणि भारतासारख्या विकसनशील देशातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी योग्य पार्श्वभूमी संशोधन आणि नियोजन हाती घ्यावे लागेल.

PURA प्रकल्प हाती घेण्यात येणाऱ्या आर्थिक आणि परिचालन क्षमतांचे योग्य विश्लेषण केल्यावर निवडण्यात आलेल्या खाजगी भागीदाराने जवळपास २५०००-४०,००० लोकसंख्येसाठी भौगोलिकदृष्ट्या एक गट, एक ग्रामपंचायत असं विभाजन केलं गेलं.

तर अशाप्रकारे एखादा राष्ट्रपती आपल्या ग्रामीण भारताच्या विकासाचा इतका बारकाईने विचार करीत होते तर हे आपल्या देशाच्या विकासासाठी खूपच नशिबाची गोष्ट म्हणावी लागेल

२०२० पर्यंत आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्र होण्यासाठी भारताने ग्रामीण भागातील शहरी सुविधा देऊन खेड्यांच्या शाश्वत विकासावर भर देण्याची गरज असल्याचे माजी अध्यक्ष ए पी जे अब्दुल कलाम यांनी वेळोवेळी सांगितले होते. परंतु २०२१ च साल अर्ध संपत आलं तरी आपण ग्रामीण भागाचे विकासकामे आणि त्याची गती पाहतच आलो आहोत.

विकसित भारतासाठी ६,००,००० खेड्यांचा विकास महत्वाचा आहे. ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाचा पाया म्हणजे ग्रामीण भागातील शहरी सुविधा पुरविणे होय.

कलाम आपल्या भाषणात नेहमीच सांगायचे कि, भारतातील सुमारे ८०० दशलक्ष लोकं खेड्यांमध्ये राहतात आणि त्यांना चार मूलभूत सुविधा भौतिक पायाभूत सुविधा जसं कि, रस्ते, इलेक्ट्रॉनिक, कनेक्टिव्हिटी हि PURA द्वारे सक्षम करता येईल.

थोडक्यात ग्रामीण भागाला शहरी सुविधा पुरवल्या तेव्हा कुठे ग्रामीण भागाची उन्नती होऊ शकते आणि त्यामुळे आपण मोठ-मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकतो….खरंच इतका दूरदृष्टी दृष्टीकोन हा फक्त कलामांकडेच होता….!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.