पृथ्वीराज चव्हाणांमुळे मागच्या वेळी रजनी पाटील बिनविरोध राज्यसभा खासदार बनल्या होत्या..

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा चालू आहे. राज्यसभा खासदारकीचं इलेक्शनच काय होणार ? काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्यसभेच्या पोटनिवडणुका लागल्या आहेत. आता हि एक निवडणूक म्हणजे गेल्या काही वर्षात झालेल्या सगळ्या राजकारणाचे उट्टे काढण्याची संधी समजली जात आहे.

झालं असं की जेव्हा काँग्रेसने रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,

“आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत”

पण याच्या उलट भाजपने विरोधी पक्षातर्फे संजय उपाध्याय यांची उमेदवारी जाहीर केली. या सगळ्या मागे विधानसभा अध्यक्षाची निवडणूक, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न, भाजपच्या निलंबित झालेल्या १२ आमदारांचा प्रश्न असे अनेक प्रश्न अशा अनेक गोष्टींचं राजकारण सुरु आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. एकूणच या निवडणुकीच्या पडद्या आड बरच राजकारण घडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

आज राजरकारणाची जी गळेकापू स्पर्धा सुरु आहे ती स्थिती काही वर्षांपूर्वी नव्हती.

गोष्ट आहे २०१३ ची. तेव्हा देखील राज्यसभेच्या पोटनिवडणुका लागल्या होत्या आणि काँग्रेस तर्फे उमेदवार होत्या रजनीताई पाटील.

१४ ऑगस्ट २०१२ राजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे झालेले दुःखद निधन म्हणजे काँग्रेस पक्षालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला बसलेला मोठा झटकाच होता. विलासराव तेव्हा केंद्रात विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. त्यांच्या या अकाली निधनामुळे काँग्रेसला राज्यसभेवर कोणाला पाठवायचं हा प्रश्न पडला.

विलासराव देशमुख हे मराठवाड्यातील सर्वोच्च नेते होते. त्यांच्या जागी मराठवाड्यातीलच एखाद्या नेत्याला संधी दिली जावी अशी मागणी समोर अली. यातूनच बीडच्या रजनी पाटील यांचं नाव समोर आलं.

आज सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या सर्वात विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी पाटील एकेकाळी शंकरराव चव्हाण यांच्या मानसकन्या म्हणून ओळखल्या जायच्या. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना रजनी पाटील यांच्या पतींना म्हणजेच अशोक पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्रीपद दिले होते.

पुढे राजीव गांधी यांच्या मृत्यूपासून पाटील घराणे काँग्रेसपासून दुरावू लागले.

१९९५ मध्ये राज्यात युती सरकार आले. केंद्रात देखील भाजपचा दबदबा  होता. १९९६  साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी बीडमध्ये सुरु केलेला उमेदवाराचा शोध रजनीताई पाटील यांच्यापाशी येऊन थांबला. स्थानिक गटातटाच्या राजकारणात रजनीताई काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्या आणि मुंडेंच्या मदतीने खासदार देखील झाल्या.

पुढच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं. सोनिया गांधींचं राजकरणात आगमन झालं होतं. भाजपच्या खासदार असल्या तरी रजनी ताई पाटील यांची नाळ काँग्रेसशी जोडली गेली होती. १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी शंकरराव चव्हाण यांच्या सल्ल्याने त्या काँग्रेसमध्ये परतल्या. सोनिया गांधी यांच्या पर्यंत त्यांची ख्याती पोहचली.

संभाषण कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व, गांधी घराण्याशी असलेले चांगले संबंध या बाबींमुळे रजनी पाटील यांना महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाचं अध्यक्षपद अशी अनेक महत्वाची पदे मिळाली.

यातूनच विलासरावांच्या मृत्यू नंतर रिक्त झालेल्या राज्यसभा खासदारकीच्या जागेवर रजनी पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर झाली.

त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात भाजप शिवसेना युती होती. भाजप तर्फे केंद्रातून दडपण होते कि रजनीताई पाटलांच्या विरोधात उमेदवार दाखल करण्यात यावा. पक्षाने उमेदवाराची चाचपणी देखील सुरु केली होती.

तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी रजनी पाटील यांच्या निवडणुकीची जबाबदारी  आपल्या शिरावर घेतली.  चव्हाण यांची राजकारणात एक सज्जन व प्रामाणिक नेता अशी प्रतिमा होती. त्याकाळी देखील राजकीय चढाओढ होती पण नेत्यांचा सुसंवाद होता. 

विलासरावांच्या मृत्यूमुळे लागलेली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा आग्रह धरण्यात आला.  

 पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप शिवसेनेचे मोठे नेते गोपीनाथ मुंडे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. केंद्रातल्या देखील भाजप नेत्यांनी व्हाण यांच्या विनंतीला मान देऊन विरोधी पक्षाने रजनी पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा नाही असं ठरवलं.

याचाच परिणाम रजनी पाटील यांची राज्यसभेला बिनविरोध निवड झाली.

आज या घटनेला काळ उलटला. मराठवाड्याचेच काँग्रेस नेते राजीव सातव यांचा अकाली मृत्यू झालाय आणि त्यांच्या जागी पुन्हा काँग्रेसने रजनी पाटील यांना तिकीट दिलंय. पण मागच्या वेळसारखा सुसंवाद नसल्यामुळे यंदा निवडणूक बिनविरोध होणार नाही अशीच चिन्हे आहेत. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकत्र येऊन यातून मार्ग काढावा अशीच इच्छा जनतेकडून व्यक्त होताना दिसतेय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.