राष्ट्रपतींसोबत वाद घालणाऱ्या तिला पृथ्वीराज चव्हाणांनी ऑस्करला जायला मदत केली…

लंचबॉक्स, गँग्ज ऑफ वासेपूर, मसान, गर्ल इन द येलो बूट्स, जल्लीकट्टू, पिरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स, पगलेट या सिनेमांमध्ये काय साम्य आहे? तुम्ही म्हणाल सगळेच्या सगळे सिनेमे ऑफबीट आणि भारी आहेत. विशेष म्हणजे हे सगळे सिनेमे अतिशय कमी खर्चात पण दर्जाशी कोणतीही तडजोड न करता बनवलेले आहेत.

हे सोडून या सिनेमांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रोड्युसर आहे गुनीत मोंगा ही अवघी तिशीतली मुलगी. 

गुनीत मोंगा मूळची दिल्लीची. लहानपणापासून सिनेमाचं वेड होतं. फक्त सिनेमा आवडत होता असं नाही तर तो कसा बनवतात, त्याच्या सुरवातीपासून शेवट्पर्यंत काय प्रोसेस असते याची तिला उत्सुकता असायची.

म्हणून अगदी कमी वयातच तिने प्रोडक्शन कॉर्डीनेटर इंटर्न म्हणून काम करायला सुरवात केली. या काळात तिने गुरुगोबिंद इंद्रप्रस्थ विद्यापीठात मास कम्युनिकेशनसाठी ऍडमिशन घेतलं होतं. तिच्या मैत्रिणीची आई सिनेमांच्या प्रोडक्शन मध्ये काम करायची. तिच्या मदतीने गुनीत देखील कॉलेजमध्ये असतानाच वेगवेगळ्या सिनेमांशी जोडली गेली.

वयाच्या एकविसाव्या वर्षी तिने पार्टीशन या इंग्रजी सिनेमाच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतला. अगदी छोट्या छोट्या कामांपासून तिने सिनेमाचं प्रोडक्शन कस असतं हे शिकून घेतलं. २००६ साली मायानगरी मुंबईला आली.

येताना तिने एक काम केलं. तिचा एक शेजारी मोठा पैसेवाला होता. गुनीतने त्याला त्याच्या लहानमुलांचे वाढदिवसाचे वगैरे कार्यक्रम शूट केले आणि मी कशी भारी सिनेमे बनवणार आहे वगैरे सांगितलं. तिच्या बिझनेस प्लॅनला भाळून त्या शेजाऱ्याने गुनीतला तब्बल ७५ लाख रुपये दिले.

हे पैसे घेऊन सुभाष कपूर दिग्दर्शित से सलाम हा लहान मुलांचा क्रिकेटवरील सिनेमा तिने बनवला. पण दुर्दैवाने हा पिक्चर रिलीज झाला त्याच दिवशी भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप मधून बाहेर पडली. याचा मोठा फटका से सलामला बसला आणि तो तिकीटबारीवर सुपरफ्लॉप झाला. 

गुनीतने शेजाऱ्याकडून आणलेले सगळे पैसे बुडाले. तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती. पण गुनीतने हार मानली नाही. तिने एक आयडिया केली. शाळाशाळांमध्ये फिरून या सिनेमाचं प्रमोशन केलं. त्यांना हा सिनेमा पाच रूपये तिकीट घेऊन दाखवला.

गुनीत मोंगा या नावाची चर्चा तेव्हा मुंबईच्या फिल्मी वर्तुळात होऊ लागली. पुढच्या वर्षी तिने स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरु केलं, नाव दिल सिख्या एन्टरटेन्मेंट. या बॅनर खाली तिने पहिला सिनेमा बनवला दस विदानिया. हा सिनेमा स्लीपिंग हिट ठरला.

२००९ साली गुनीत मोंगा ने एक शॉर्ट फिल्म बनवली, कवी. 

ही एका बालकामगाराची आणि त्याच्या छोट्याशा विश्वाची साधी सोपी कहाणी होती. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन ग्रेग हेल्व्ही या मुलाने केलेलं तर प्रोडक्शन गुनीत मोंगाने केलेलं. गंमत म्हणजे हा कवी सिनेमा ऑस्करच्या स्टुडण्ट सेक्शनमध्ये विजयी ठरला. इतकंच नाही तर अकॅडमी अवॉर्डच्या शॉर्ट फिल्म सेक्शनमध्ये देखील त्यांना नॉमिनेशन मिळालं.

Kavi S 940580680 large

गुनीत साठी आकाश ठेंगणं झालं होतं. ऑस्करचा भव्य कार्यक्रम आपल्याला अटेंड करता येणार, तिथे जमलेल्या तारे तारकांना भेटता येणार याची गुनीतला स्वप्नं पडू लागली होती. पण एक प्रॉब्लेम होता. लॉस एंजलिसला जाण्यासाठी गुनीतकडे तिकिटाचेही पैसे नव्हते. नुकतेच तिच्या आई वडिलांचं निधन झालं होतं, दिल्लीतील त्यांचं दुकान देखील तिने विकून टाकलं होतं. 

ऑस्कर नॉमिनेशन मिळून सुद्धा तिला फक्त पैसे नसल्यामुळे संधी गमवावी लागणार होती.

गुनीत मोंगा मातुर जिद्दीला पेटली. तिने अमेरिकेतल्या इंडस्ट्रियलिस्ट पासून ते भारतातल्या रतन टाटांपर्यंत प्रत्येकाला पत्रे पाठवली, मेल मोहिले. ती आपल्या पत्रात लिहायची

” I am pride of India. My short film is been nominetd for oscar. Please support me to go.”

पण दुर्दैवाने कोणाचाच रिप्लाय आला नाही. गुनीत आणि तिची टीम अगदी रडायच्या घाईला आली. ऑस्कर साठी आता फक्त तीन आठवडे उरले होते. एवढ्या दिवसात तिकिटे, अमेरिकी व्हिसा यातील काहीच होणे शक्य नव्हतं. गुनीतने तर सगळ्या आशा सोडून दिल्या.

पण नियतीच्या मनात काही तरी वेगळंच लिहिलेलं. एक दिवस अचानक गुनीतने सहज आपल्या कॉम्प्युटरमध्ये ईमेल चेक केले तेव्हा तिला दिसलं की भारताच्या राष्ट्र्पतींकडून तिला रिप्लाय आला आहे. गुनीतने जे हजारो मेल पाठवले होते त्यापैकी एक मेल तिने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याना देखील पाठवला होता.

राष्ट्रपती भवन कार्यालयातून तिला उत्तर आलं की तुम्हाला आम्ही कोणती मदत करू शकतो?

गुनीतच्या मनात आलं की अमेरिका जायचं होईल न होईल कमीतकमी राष्ट्रपती भवन तरी पाहूया. तिने त्यांना रिप्लाय दिला की मला राष्ट्रपतींना माझी शॉर्ट फिल्म दाखवायची आहे. प्रतिभा ताईंकडून तिला दिल्लीला बोलावणं आलं. गुनीत आपल्या टीमसह रहट्र्पती भवनात पोहचली.

पण योगायोग असा की नेमकं राष्ट्रपतींना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. त्यांनी गुनीतची आणि तिच्या टीमची विचारपूस केली आणि त्या निघाल्या. त्या सिनेमा न बघताच जात आहेत हे बघितल्यावर गुनीतच्या संयमाचा बांध कोसळला. वयाने अल्लड असलेल्या गुनीतने राष्ट्रपतींशी वाद घालायला सुरवात केली, कि आम्हाला इतकं दूर बोलावून तुम्ही सिनेमा न बघता जाऊच कसे शकता? राष्ट्रपतींचे कर्मचारी तिला समजावून सांगत होते पण ती ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती.

नेमके तेव्हा तत्कालीन विज्ञान तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण काही कामानिमित्त राष्ट्रपती भवनात आले होते. त्यांनी हा सगळं गोंधळ पाहिला, गुनीतला शांत केलं आणि नेमकं काय प्रकरण आहे हे विचारलं.

तिने आपल्या कवी या शॉर्ट फिल्म बद्दल आणि ऑस्कर नॉमिनेशन बद्दल सांगितलं. राष्ट्रपतींनी हा सिनेमा पाहायला हवा असं देखील सांगितलं. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,

“आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी या तिथे हा सिनेमा पाहण्याचा कार्यक्रम करू.”

ठरल्याप्रमाणे गुनीत आणि तिची टीम संध्याकाळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिल्लीतल्या बंगल्यात गेली. तिथे असलेल्या छोट्याशा स्क्रीनवर कवी सिनेमा दाखवण्यात आला. सोबत ढोकळा समोसा अशी छोटीशी पार्टी देखील ठेवली होती. पृथ्वीराज चव्हाण यांचे काही मित्र देखील तिथे हजर होते. सिनेमा त्यांना सगळ्यांना खूप आवडला. चव्हाणांनी तीच कौतुक केलं. तिला विचारलं आता नेमका प्रॉब्लेम काय आहे?

गुनीत म्हणाली आम्हाला अमेरिकेला जाण्यासाठी पैसे नाही आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांनी विचारलं तुम्ही एअर इंडियामध्ये विचारलं नाही का? गुनीत म्हणाली आम्ही सगळे प्रयत्न केले पण कोणीच उत्तर दिलं नाही. चव्हाणांनी लगेचच एअर इंडियाच्या सीएमडी यांना फोन केला. वेगाने चक्रे हलली. गुनीत मोंगा, तिचा असिस्टंट दिगदर्शक विकास आणि शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिका साकारणारा लहान मुलगा सागर साळुंखे यांचे तिकीट, तिथला खर्च आणि व्हिसा यांची तातडीने सोय केली.

गुनीत मोंगा म्हणते कोणतीही ओळख वशिला नसताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीमुळे आम्ही ऑस्करला जाण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो.

1200x 1

पुढे गुनीतने कार्यकारी निर्माता म्हणून अनेक सिनेमासाठी काम केलं. अनुराग कश्यपसोबत तिचे सूर जुळले. त्यांनी एकत्र भारतातील सर्वोत्कृष्ट दर्जेदार सिनेमांची निर्मिती केली. ज्या स्त्रियांनी भारतीय सिनेमा सृष्टीला बदलून टाकलं त्यात तीच देखील नाव अग्रभागी घेतलं जातं.

याच गुनीत मोंगाने आपलं घर विकून पिरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स हा सिनेमा बनवला आणि चक्क त्या सिनेमाने ऑस्कर देखील मिळवला. एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या गुनीत मोंगा या मुलीने पाहिलेल्या स्वप्नाचं एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.