आज पृथ्वीराजनं गदा उंचावली आणि जालिंदर आबांच्या घामाचं सोनं झालं…

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गदेचा मानकरी कोण होणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. मोठमोठ्या पैलवानांना अस्मान दाखवत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा जिंकली. कोल्हापूरच्याच शाहू विजयी गंगावेश तालमीत सराव करणाऱ्या विशाल उर्फ प्रकाश बनकरला त्यानं अंतिम सामन्यात ५-४ अशा फरकानं पराभूत केलं.

देशाला ताठ मानेनं कुस्तीचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरचा २२ वर्षांचा गदेचा दुष्काळ संपला.

पृथ्वीराज हा प्रचंड ताकदीचा आणि त्याहून जबरदस्त चपळतेचा मल्ल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव काढलेल्या पृथ्वीराजकडे मॅटवर खेळण्याचा जबरदस्त अनुभव आहे, त्याचाच फायदा त्याला विशालसोबत झुंजताना झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणे गावातल्या पृथ्वीराज पाटीलच्या डीएनएमध्येच कुस्ती आहे. त्याचे वडील, चुलते, भाऊ सगळेच पैलवान. चुलते संग्राम पाटील उपमहाराष्ट्र केसरी.

पृथ्वीराजचं शरीरही मोतीबाग तालमीच्या मातीत कसत होतं. हा पठ्ठ्या मोठी स्वप्न बघणारा होता, त्यानं रशियात झालेल्या ज्युनिअर फ्री स्टाईल स्पर्धेत ब्रॉंझ मेडल जिंकलं. अनेक नॅशनल स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला.

शेतकरी कुटुंबातून पुढं आलेला पृथ्वीराज भारतीय सैन्यात हवालदार आहे. त्याला चांगल्या दर्जाच्या सरावाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून आर्मीनं त्याला भरती करुन घेतलंय. त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं श्रेय जितकं त्याच्या मेहनतीला जातं, तितकंच त्याच्या वस्तादांनाही. 

आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये राम पवार आणि अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज सराव करतोय.

पृथ्वीराजचं आंतरराष्ट्रीय मेडल असेल किंवा त्यानं आज उंचावलेली मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, प्रसिद्धी पासून लांब असलेल्या एका माणसाच्या प्रामाणिक कष्टांशिवाय हे शक्यच नव्हतं…

वस्ताद जालिंदर आबा मुंढे

जालिंदर आबांचं नाव तुम्ही आज पहिल्यांदा ऐकलं असू शकतं, आज पहिल्यांदा त्यांचा फोटो पाहिला असाल… पण आबांनी घडवलेल्या मल्लानं महाराष्ट्र केसरी जिंकण्याची ही काय पहिलीच वेळ नाही.

 राजर्षी शाहू कुस्ती केंद्राचे संस्थापक असणाऱ्या जालिंदर आबांनी कुस्तीसाठी आणि कुस्तीगीरांसाठी काय केलं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

आबा मूळचे मराठवाड्यातल्या बीडचे. त्यांची पावलं कुस्ती पंढरी कोल्हापूरकडे वळली, ती पैलवान बनण्याच्या स्वप्नानं. पैलवान म्हणून आबांची कारकीर्द फारशी गाजली नाय. आयुष्यात अनेक संकटं उभी राहिली, परिस्थितीचे डाव पलटत राहिले, पण जालिंदर आबा ताकदीचा माणूस.. ते काय चीत झाले नाहीत.

मोठा नावाजलेला पैलवान बनण्याचं आपलं स्वप्न हुकलं असलं, तरी आबांनी नव्या पिढीला घडवायचं ठरवलं. या मराठवाड्यातल्या माणसानं कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं कुस्ती केंद्र उभारलं. यासाठी पैसा स्वतःच्या कष्टानं उभा केला, मिळेल तो रोजगार स्वीकारला, आपल्याला मिळालेला एक एक पैसा तालीम उभारण्यासाठी लावला, कारण ध्यास एकच होता… कुस्ती.

महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या कुस्तीचे आश्रयदाते असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं त्यांनी शिंगणापूरमध्ये तालीम सुरु केली. एकही पैसा न घेता जालिंदर आबा इथं पैलवान घडवतायत. कित्येक आव्हानांना धोबीपछाड देत त्यांनी अद्ययावत तालीम उभी केलीये.

आबांनी घडवलेला पहिला महाराष्ट्र केसरी म्हणजे, समाधान घोडके.

२०१० चा महाराष्ट्र केसरी ठरलेला समाधान हा काहीसा बारीक चणीचा मल्ल. इतर मल्ल त्याच्यासमोर धिप्पाड वाटत असले, तरी समाधान ज्या वेगानं आणि ताकदीनं त्यांच्यावर तुटून पडतो, ते पाहून आपल्या मनात आपसूक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे याचे वस्ताद कोण असतील. जालिंदर आबांनी समाधानला असं काही घडवलं, की त्याची बारीक उंची ही त्याची कमजोरी नाही तर ताकद बनली.

आजही जालिंदर आबांच्या तालमीत एखादा पैलवान मेहनत घेतोय पण त्याच्याकडे खुराकाला पैसे नसतील. तरीही त्याचा खुराक थांबत नाही, जालिंदर आबा आपल्या पोरांच्या खुराकात कशाचीच कसूर सोडत नाहीत. कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबादमधून कित्येक पैलवान आबांकडे येतात. ग्रामीण भागातल्या कित्येकांचा ओढा त्यांच्या तालमीकडे आहे. 

महाराष्ट्राचा नामवंत मल्ल राहुल आवारेवर राष्ट्रीय पातळीवर जेव्हा अन्याय झाला, तेव्हा राज्यभरातल्या मल्लांना एक करत राहुलच्या न्यायासाठी लढण्यात आबा मागं नव्हते.

पण एवढे पैलवान घडवूनही, त्यांची नावं आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकूनही… जालिंदर आबा मात्र, प्रसिद्धीच्या झोतापासून, उथळ चर्चांपासून कित्येक कोस दूर आहेत.

 कारण त्यांचा घाम फक्त पैलवान घडवण्यासाठीच झडतोय… याच घामाचं आज पृथ्वीराज पाटीलनं सोनं केलं.

संदर्भ: पै. गणेश मानुगडे (कुस्ती मल्लविद्या), पै. मतीन शेख, पै. गजानन पाटील  

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.