पब-जी खेळणाऱ्या पोरांना सध्या काय वाटतय..?

साधारण २००६-०७ चा काळ होता. माझ्या एका मित्राचाच सायबर कॅफे होता. एकदा शाळेतुन येवून संध्याकाळी सहाला जीटीए व्हाईस सिटी खेळायला बसलो होतो. रात्री सव्वा एकला उठलो होतो. त्यानंतर त्याची आवड ओसरली आणि IGI ची नशा चढली. पुढे CS आली. त्यानंतर GOW आणि नंतर PUB-G.

भारतात दरवर्षी अशा शेकडो गेम लॉन्च होत असतात. आणि त्याचे युजर्स ही त्याच पटीत असतात.

२०१९ या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये पब-जी गेम ५ कोटी लोकांनी डाऊनलोड केली होती तर साडे तीन कोटींच्या जवळपास या गेमचे एक्टिव्ह युजर्स होते.

वर सांगितलेल्या चार-पाच आणि FIFA/Cricket/WWF/Blue Whale/Call of Duty/Ludo King या आणि अशा काही गेम आल्या आणि इथून पुढे ही येतील. या गेम ज्या काळात लॉन्च झाल्या त्या नव्याच्या नऊ दिवसात गेमर्सनी भरभरुन प्रेम केलं. शब्दशः गेमिंगच्या दुनियेत धुमाकूळ घालून जाती.

अशीच दोन वर्षांपूर्वी  आलेली PUB-G

PUB-G या गेमची कंन्सेप्ट होती ती आयरिशन गेमिंग कंपनी असणाऱ्या ब्रेन्डन ग्रीन ची. या कंपनीने क्रिएटिव डायरेक्टर ब्लूहोलच्या सब्सिडियरी PUB-G को-ऑपरेशन सोबत येऊन ही गेम तयार केली. २०१७ ला गेम रिलीज करण्यात आली होती.

गेमला प्रसिद्धी मिळाल्यानंतर चायनिझ कंपनी टेनसेंट गेम्स सोबत मिळून PUB-G चं मोबाईल व्हर्जन २०१८ साली लॉन्च करण्यात आलं.

PUB-G चायनिझ कंपनी आहे का ?

PUB-G च्या मोबाईल एपचं कोडींग चीनी कंपनी टेनसेंट ने केलय मात्र यातील मेजोरेटी शेअर होल्डिंग साऊथ कोरियन कंपनी ब्लू होल यांच्याकडे आहेत. याच कंपनीने डेस्कटॉप व्हर्जन तयार केलेलं. टेनसेंट यांची मोबाईल व्हर्जन मध्ये ११.५ टक्यांची भागिदारी आहे.

थोडक्यात काय तर PUB-G ना चायनिझ कंपनीने तयार केलय ना कोणतिही चायनिझ कंपनी याची पूर्णपणे मालक आहे. फक्त चायनिझ कंपनी टेनसेंट याच्यातील ११.५ टक्क्यांची भागिदार आहे.

पण काल चीनच्या ११८ ॲप्स बॅन करतानाच त्यात ही गेम देखील बॅन केली आणि तरुणांच्या काळजाचा ठोका चुकला. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने ही बंदी घालण्यात आल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ (अ) अंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे.

कोणी रॉयल पास घेतलेलं तर कोणी Crown 5 ला गेलं होतं. अशाच काहींशी बोलताना ‘बोल भिडू’ने PUB-G गेमर्सची मत जाणून घेतली.

याबाबत बोलभिडूने पब-जी लव्हर असणाऱ्या काही भिडूंची मते जाणून घेतली… 

 

कोल्हापूर येथे ग्राफिक्स डिझाईन करणारा आकाश भोसले. आकाश २७ वर्षांचा आहे तो म्हणतो, 

‘पहिल्यांदा तर १०-१२ शिव्या घालू वाटत आहेत चीनला. काय मर्दा.. दिवसभराचं फ्रस्ट्रेशन निघत होतं. दिवसभर काम करुन घरी गेल्यानंतर आम्ही ४ जण ऑनलाईन येवून PUB-G खेळायचो. कधी दिवसभरात कोणाशी भांडण झालं असेलं किंवा काही बिनसलं असेलं तर सगळा राग एकवटून गोळ्या घालायचो. DND मोड ॲक्टिव्हेट करुनच गेम खेळायला घ्यायचो”

असाच कराड येथे राहणारा २४ वर्षांचा वरद संपकाळ. वरद हा फायनान्स सेक्टरमध्ये काम करत आहे. तोे दिवसभर फिल्डवर काम करत असल्याने गेम खेळण्यासाठी त्याला मोकळा वेळ कमीच मिळायचा. मात्र लॉकडाऊनच्या काळात पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये त्यांच काम पूर्णपणे बंदच  राहिलं होतं. या काळात तो गेम खेळत रहायचा,

तो सांगतो,

गेम महत्वाची वाटतं नाही. देशाच्या नेतृत्वानं काही तरी विचार करुनचं निर्णय घेतला असणार. पण कोरोनाच्या काळात PUB-G नं खूप आधार दिला. लॉकडाऊनच्या काळात आजूबाजूला कोणीच बोलण्यासाठी नव्हतं तेव्हाचं ही गेम मदतीसाठी धावून आली

पुणे येथे राहणारा धीरज ताटे हा स्वत: ॲप्लिकेशन डेवलपर आहे. त्याने पब-जी आल्यानंतरच उत्सुकतेपोटी ही गेम डाऊनलोड केली होती तो म्हणतो, 

मी आहारी वगैरे काही गेलो नव्हतो. पण गेम खेळून भारी वाटायचं. मी स्वतः एक ॲप्लिकेशन डेव्हलपर असल्यामुळे मला हे सगळं नकली आहे आणि आपण त्याच्या आहारी जायचं नाही याचं भान असायचं. पण अनेक नवीन नवीन मित्रांची या गेममुळे ओळखं झाली असं पुण्यातील २८ वर्षीय धीरज ताटेनं सांगितलं.

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणजे चांगल्या आणि वाईट. ऑनलाईन खेळामुळे हिंसेला प्रोत्साहन मिळते. त्यातुन हत्या, आक्रमकता, व्यसन या गोष्टी समोर येत होत्या. विशेष म्हणजे याच आधारावर चीनमध्ये देखील या गेमवर बंदी घालण्यात आली होती.

काही ठिकाणी तर ह्या गेम खेळण्यासाठी स्पर्धा भरवल्या जात होत्या व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जात. PUB-G हा आता गेम राहिलेला नाही, तर हे व्यसन झालेलं आहे. हे मान्य करावचं लागेल. मात्र आपण चीन वर केलेला मास्टरस्ट्रोक म्हणून या गोष्टींकडे पहात असलो तर आपण चुकत आहोत हे ही तितकच खरं.

ज्याप्रमाणे GTA व्हाईससिटीची जागा IGI, CS, GOW आणि पब-जी ने घेतली त्याचप्रमाणे पब-जी ची जागा घेणारी दूसरी कंपनी येणारचं आहे. फक्त अशी कंपनी भारतीय आहे म्हणून आपण त्यांनी तरुणांना गेमचं व्यसन लावावं म्हणून स्वागत करणार असू तर मात्र नेमकं आपण चुकणारच आहोत हेच खरं.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. Swapnil says

    So nice.story..

Leave A Reply

Your email address will not be published.